Next
‘बांबूच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे’
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांची अपेक्षा
BOI
Friday, October 05, 2018 | 05:07 PM
15 0 0
Share this article:

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बांबू हस्तकला व कला केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी राज्यपाल सी. विद्यासागरराव,सुधीर मुनगंटीवार,  गिरीश बापट, दिलीप कांबळे, मुक्ता टिळक, डॉ. नितीन करमळकर, डॉ. के. पी. विश्वनाथा, डॉ. मुरलीधर चांदेकर, विकास खारगे आदी. 
पुणे : ‘राज्यातील तीन विद्यापीठांमध्ये स्थापन करण्यात आलेल्या बांबू हस्तकला व कला केंद्रांच्या माध्यमातून बांबूविषयक संशोधन व्हावे तसेच, नाविन्यपूर्ण कल्पना राबवल्या जाव्यात. त्याद्वारे राज्यात तयार होणाऱ्या बांबूंच्या वस्तूंना आंतरराष्ट्रीय मार्केट उपलब्ध व्हावे’,अशी अपेक्षा राज्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी व्यक्त केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या बांबू हस्तकला व कला केंद्राचे तसेच, ग्रंथालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन शुक्रवारी, ५ ऑक्टोबर रोजी राज्यपालांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याच्या वित्त, नियोजन व वने या खात्यांचे मंत्री सुधीर मुनगंटीवार होते. पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे, पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे हेही उपस्थित होते.

‘बांबूच्या वस्तूंच्या विक्रीची क्षमता प्रचंड आहे. राख्यांपासून, स्वयंपाकघरात वापरावयाच्या वस्तू, घरांसाठी उपयोग असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे बांबूचे उपयोग आहेत. यामध्ये विद्यापीठांनी संशोधन केले आणि नाविन्यपूर्ण कल्पना लढवल्या, तर आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी उलाढाल करणे शक्य आहे. ई-कॉमर्स साईट्सच्या माध्यमातूनही त्यांची विक्री व्हावी. अशा प्रकारे बांबू संशोधन केंद्रे ही ग्रामीण आणि आदिवासी व्यक्तींच्या विकासाची केंद्रे बनावीत. सध्या घरात फर्निचर करावयाचे असल्यास लोकांचा चीनकडे जाण्याचा ओढा असतो, मात्र बांबूच्या वस्तूंचा चांगला उपयोग करून घेतल्यास चिनी व्यावसायिकांना या वस्तूंसाठी महाराष्ट्रात यावे लागावे, अशी परिस्थिती निर्माण करायला हवी’, अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली.

राज्यपालांकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गौरव
‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. येथे देशातून तसेच, जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात. या विद्यापीठाचा देशातील पहिल्या दहा दर्जेदार विद्यापीठांमध्ये समावेश होतो. या विद्यापीठाकडून माझ्या अनेक अपेक्षा आहेत. विद्यापीठाच्या सर्वच विभागांनी प्राविण्य (एक्सलन्स) मिळवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखावा. त्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत’, अशा शब्दांत राज्यपालांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा गौरव केला.

या वेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले,‘बांबूच्या माध्यमातून राज्यातील जनतेचा विकास करण्याची योजना आहे. त्यासाठी राज्यपाल महोदयांकडून प्रोत्साहन मिळाले आहे. त्याचाच परिणाम म्हणून केवळ चार महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील तीन विद्यापीठांमध्ये बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरू करणे शक्य झाले.बांबू हा कल्पवृक्ष असून, त्याचा योग्य प्रकारे उपयोग केल्यास या केंद्रांच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. हेच प्रयत्न राज्य सरकारकडून केले जात आहेत.’

या वेळी राज्यपालांच्या उपस्थितीत बांबू केंद्रांविषयक चार सामंजस्य करारांना मूर्त स्वरूप देण्यात आले;तसेच  बांबूविषयक प्रशिक्षण घेतलेल्या तीन महिला अंकिता सांबरे, वैशाली दांडेकर आणि संजना सांबरे यांचा सत्कार करण्यात आला. 

कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी प्रास्ताविक केले, तर वन खात्याचे सचिव विकास खारगे यांनी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामागची भूमिका स्पष्ट केली. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search