Next
गर्भवती महिलांसाठी धावून आला तालुका टास्क फोर्स
गडचिरोली जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कक्षाची अनोखी यशोगाथा
BOI
Tuesday, July 30, 2019 | 11:41 AM
15 0 0
Share this article:


गडचिरोली : आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत करणारी यंत्रणा; पण गडचिरोली जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला एक वेगळीच कामगिरी पार पाडावी लागली आणि अर्थातच त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली. या यंत्रणेने केलेल्या प्रयत्नांमुळे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात राहणाऱ्या दोन गर्भवती महिलांचे प्राण वाचले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांपासून ते तालुका पातळीवरील कृती दलापर्यंत सर्वांनी केलेल्या अथक प्रयत्नांचे चीज झाले असून, यातील एका महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दुसरी गर्भवती महिला डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, लवकरच तिचीही यशस्वी प्रसूती होईल, अशी सर्वांना आशा आहे. प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 


गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम रेगडी प्राथमिक रुग्णालयाच्या कक्षेत येणाऱ्या एका वस्तीवरील मीना नरोटे व लता गावडे दोन गर्भवती महिलांना जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांची बिकट परिस्थिती पाहून ताबडतोब जिल्हा महिला व बाल रूग्णालयात भरती होण्याच्या सूचना दिल्या होत्या; पंरतु प्रसूतीसाठी दवाखान्यात जाण्याची त्यांची व घरच्यांची तयारी नव्हती. प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होणे म्हणजे खर्च, प्रवास तसेच अन्य गैरसमजांमुळे प्रकृती चांगली नसतानादेखील या दोन्ही गर्भवती महिला रुग्णालयात दाखल होण्यास तयार नव्हत्या. आपल्याच म्हणण्यावर अडून बसलेल्या या महिलांना आणि त्यांच्या घरच्या मंडळींना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता समजावून सांगणे आणि वेळेत या महिलांना रुग्णालयात दाखल करणे हे अतिशय कठीण आव्हान आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासकीय यंत्रणेसमोर होते. 

आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या दोघींनाही तीन जुलै रोजी प्रसूती प्रक्रियेतील अडथळे लक्षात आणून देत, दवाखान्यात भरती होण्याच्या सूचना दिल्या. त्या दोघींचीही प्रकृती चांगली नव्हती, तरीही त्यांनी दवाखान्यात भरती होण्यास नकार दिला. दहा जुलै रोजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुन्हा त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; पण या वेळीही या दोघींनी दाद दिली नाही. रेगडी प्राथमिक आरेाग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेश्राम यांनीही या महिलांना व कुटुंबीयांना परिस्थितीच्या गांभीर्याची जाणीव करून दिली; तरीही काही उपयोग झाला नाही. अखेर डॉ. मेश्राम यांनी हा विषय जिल्हा प्रशासनाकडे मांडण्याचे ठरविले. सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री यांच्या मदतीने ही घटना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली.


त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्कालीन कक्षाने तालुका टास्क फोर्सची मदत घेऊन या आगळ्या वेगळ्या कामगिरीला सुरुवात केली. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कृष्णा रेड्डी यांनी विविध विभाग व यंत्रणेशी संपर्क साधून त्यांचा सहभाग व घटनेचे गांभीर्य लक्षात आणून दिले. महसूल यंत्रणा, आरेाग्य विभाग व पोलीस यांचा समावेश असलेल्या या टास्क फोर्सने सर्व सूत्रे हातात घेत, गावात पाऊल ठेवले आणि या दोघींच्याही घरच्यांचे मन वळवून अखेर त्यांना रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात यश मिळवले. बुधवार, २४ जुलै रोजी रात्री दोघींनाही रेगडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. गुरुवारी, २५ जुलै रोजी मीना नरोटे यांची सुखरूप प्रसूती झाली, एका सुदृढ बाळाला त्यांनी जन्म दिला, तर लता गावडे डॉक्टरांची निगराणीखाली असून, त्यांना गडचिरोली येथे नेण्याचे नियोजन सुरू आहे.

इच्छा नसताना एखाद्या गर्भवती महिलेला सरकारी दवाखान्यात आणणे ही सोपी गोष्ट नाही; मात्र प्रशासनाला त्यांच्या प्रसूतीमधील गुंतागुंतीची  जाणीव असल्याने या यंत्रणेने आपली सर्व मेहनत पणाला लावून या दोघींना रुग्णालयात आणण्यात यश मिळवले. या दोन्ही महिलांचे कुटुंबीय प्रसूतीत या महिलांच्या आणि बाळाच्या जीवाला धोका होऊ शकतो, हे समजून घेण्यास तयार नव्हते. त्यांचा विरोध असल्याने या दोघी महिलाही दवाखान्यात येण्यास तयार होत नव्हत्या. त्यांना वेळेत रुग्णालयात दाखल करणे आवश्यक होते. ही सगळी तणावाची परिस्थिती प्रशासन यंत्रणेने अत्यंत कौशल्याने हाताळली आणि अखेर या दोघींना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात यश मिळवले. 

आरोग्य, महसूल व पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचारी; तसेच गावातील पोलीस पाटील, सरपंच यांच्यासह उपजिल्हाधिकारी विजया जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर, पोलीस उप अधीक्षक गायकवाड, मुलचेराचे तहसिलदार तलांडे यांनी ही कामगिरी यशस्वी करण्यात मोलाची भूमिका बजावली.  

या घटनेबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, ‘आपत्ती व्यवस्थापन कक्षाने तालुका टास्क फोर्सच्या मदतीने चांगले काम केले आहे. मान्सून काळात दुर्गम गावातील गर्भवती स्त्रियांची प्रसूती तारीखनिहाय यादी बनवून नियमित सनियंत्रण करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला मान्सून पूर्व बैठकीतच देण्यात आल्या आहेत.’

सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी विनोद मशाखेत्री म्हणाले, ‘दुर्गम भागात गर्भवती महिला व त्यांच्या कुटुंबीयांची अशी इच्छा असते की, प्रसूती ही घरीच व्हावी. विनाकारण दवाखान्यात जाऊन खर्च किंवा इतर बाबी वाढवण्यापेक्षा घरी प्रसूती करण्याकडेच त्यांचा कल असतो. त्यातील धोका त्यांच्या लक्षात येत नाही. सरकारी यंत्रणेलाही ते सहकार्य करत नाहीत, अशावेळी सर्वांनी एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांचा फायदा झाला आणि या दोन महिलांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्यात यश आले. त्यांच्या जीवाला असलेला धोका टळला, ही खूप आनंदाची, समाधानाची बाब आहे.’ 

जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे व तालुका प्रशासनाच्या अंमलबजावणीमुळे गेल्या वर्षी नऊ अत्यवस्थ गर्भवती महिलांना वेळीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुर्गम भागातील नागरिकांना वेळेत मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि प्रशासन एकमेकांच्या सहायाने हिरीरीने कार्यरत असल्याने या भागातील गर्भवती महिला मृत्यू, नवजात बालक मृत्यूचे प्रमाण घटण्यास मदत झाली आहे. जनमानसातील प्रशासन यंत्रणेची प्रतिमा बदलण्यास यामुळे मदत होत आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search