Next
‘विज्ञान हसतखेळत आत्मसात करा’
प्रेस रिलीज
Wednesday, February 28, 2018 | 04:11 PM
15 0 0
Share this article:

पुणे : ‘विज्ञान सक्तीने नाही, तर समजून घेऊन शिकण्याचे शास्त्र आहे. विज्ञानात खूप गंमतीजमती आणि कुतूहल आहे. त्यामुळे हसतखेळत विज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे,’ असा सल्ला आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्राचे (आयुका) संचालक डॉ. सोमक रायचौधरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

भारतीय विद्या भवनच्या मुक्तांगण विज्ञानशोधिका केंद्रातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित शालेय विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रकल्प स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. रायचौधरी यांच्या हस्ते झाले. प्रसंगी राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ डॉ. दीपा सुब्रमण्यम, भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे, विज्ञानशोधिका केंद्राचे मानद संचालक अनंत भिडे, इनोव्हेशन हबचे उपसंचालक संदीप नाटेकर, विज्ञानशोधिकेच्या उपसंचालक नेहा निरगुडकर आणि भारती बक्षी यांच्यासह इतर मान्यवर व विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

डॉ. सोमक रायचौधरी म्हणाले, ‘शास्त्रज्ञ कोणीही होऊ शकते. त्यासाठी तुमच्यात कुतूहल असायला हवे. सतत नवीन शोधण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ज्याच्या मनात वेगळा आणि नाविन्यपूर्ण विचार येईल, तो शास्त्रज्ञ बनू शकतो. विज्ञानाची आवड विद्यार्थ्यांतील शास्त्रज्ञ वृत्ती विकसित करीत असते. त्यामुळे केवळ अभ्यासक्रमाचा भाग म्हणून विज्ञान शिकण्यापेक्षा आवडीने विज्ञान शिकायला हवे. आज या प्रदर्शनातील विविध प्रकल्प पाहून मला आनंद झाला आहे. तुमच्यातील कल्पकता आणि सर्जनशीलता अफाट आहे. प्रयोग करताना वारंवार अपयश आले, तरी प्रयत्न सोडू नका. पुन्हा पुन्हा प्रयोग करून पहा."

डॉ. दीपा सुब्रम्हण्यम म्हणाल्या, ‘विज्ञानशोधिकेच्या ‘रिच अँड थिंक’ या उपक्रमात चार विद्यार्थी माझ्याकडे शिकताहेत. त्यांच्यातील चिकाटी पाहून मी प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांतील उत्सुकता आणि प्रयोगशीलता उल्लेखनीय आहे. विज्ञान शिकण्यात मोकळेपणा मिळाला, तर हे विद्यार्थी अधिक चांगले संशोधन करू शकतील. मनोरंजनातून विज्ञान शिका. शिक्षक-पालकानी त्यासाठी प्रोत्साहन द्यावे. इथले प्रकल्प अतिशय नाविन्यपूर्ण आहेत.’

अनंत भिडे यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संचिता पालकर यांनी सूत्रसंचालन केले. नेहा निरगुडकर यांनी आभार मानले.

‘हायपरलूप’, ‘एडिबल क्रोकरी’ अन बरंच काही...
प्रकल्प प्रदर्शनात पुणे आणि ग्रामीण भागातील एकूण ६० प्रकल्प सादर झाले आहेत. पुणे-मुंबई दरम्यान प्रस्तावित ‘हायपरलूप’चे प्रारूप, प्लास्टिकला पर्याय म्हणून खाद्योपयोगी भांडी, सायकलवरील मोबाईल चार्जर, ऍटोमेटिक व्हेंडिंग मशीन, फोल्डेबल इलेक्ट्रिकल बाईक, स्मार्ट सिटीचे प्रारूप, विज्ञानातील संगीत, अंडी उबवणी, भूकंपरोधक इमारती, १० इन १ रोबोट असे विविध प्रकल्प या प्रदर्शनात मांडण्यात आले आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search