Next
‘संगीतामुळे दृष्टी सौंदर्यमयी होते’
ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे यांचे प्रतिपादन
BOI
Tuesday, March 19, 2019 | 04:01 PM
15 0 0
Share this article:

ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे यांच्या सत्कारप्रसंगी (डावीकडून) प्रकाश पायगुडे, शैला मुकुंद, निर्मला गोगटे, प्रा. मिलिंद जोशी व सुनिताराजे पवार.

पुणे : ‘माणूस सर्व कला शिकतो तेव्हा त्याला सौंदर्यदृष्टी येते; पण संगीत शिकतो तेव्हा दृष्टीच सौंदर्यमयी होते. नाटक हे करणाऱ्याच्या मनात असावे लागते. ते नसेल तर नाटकातील गाणे सुरेल होऊ शकत नाही. कारण, नाटकात गाणे हे सोपे काम नाही. संगीत नाटकातले गद्यही सुरात म्हणावे लागते. सूर असतील तरच नाटक यशस्वी होते,’ अशा शब्दात संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री निर्मला गोगटे यांनी नाटकातील संगीताचे मर्म उलगडले. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ कार्यक्रमात निर्मला गोगटे यांच्याशी निवेदिका शैला मुकुंद यांनी संवाद साधला. या वेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार उपस्थित होत्या.


निर्मला गोगटे आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या ‘नमन नटवरा’ या नांदीने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. त्यानंतर निर्मला गोगटे यांनी ‘संगीत मानापमान’मधील भामिनीच्या भूमिकेतून सशक्त अभिनयाचे दर्शन घडविले. गोगटे यांनी अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंदराव टेंबे यांच्या संगीत नाटकांचे अनुभव कथन करीत गप्पांचा अवकाश खुला केला. 

गोगटे म्हणाल्या, ‘संगीत नाटकातील ताना घेणे लोकांना आवडते. गाणे सुमार असले आणि तानेची तयार असली, तरी नाटक निभावून जाते. ‘मानापमान’ मध्ये केशवराव भोसले यांची तान गायकी होती. त्यामुळे बालगंधर्वांपेक्षा त्यांची सरशी झाली असे त्या वेळी वृत्तपत्रांमध्ये छापून आले; पण एका समीक्षकाने ‘बालगंधर्व’ भामिनीप्रमाणेच गायले असे प्रामाणिकपणे म्हटले.

‘मला सूर कुणी शिकवले नाहीत, गाण्याबाबत मी संस्कारशून्य आहे. तरीही मी कधी बेसूर झाल्याची घटना आठवत नाही, अशी प्रांजळ कबुली देत, ‘सूर निसटणारा असतो, तो कळायला दहा बारा वर्ष जातात. तरीही कलाकाराने आलेली संधी घेतली पाहिजे. मनात जिद्द धरली, तर अशक्य काहीच नाही. आनंदात राहायचे असेल तर सारखं शिकत राहायला हवे. हेच मनात पक्के ठेवले,’ असेही गोगटे यांनी सांगितले. 

नेहरूंकडून कौतुकाची थाप
‘दिल्लीमध्ये नाट्य महोत्सवात संगीत शाकुंतल सादर झाले. ते पहायला तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आले होते. ते अर्ध्याच तासात जाणार, असे अगोदर त्यांनी सांगितले होते; पण ते नाटक पाहण्यासाठी पूर्णवेळ थांबले. नाटक संपल्यावर त्यांनी आत येऊन सर्वांना गुलाबाची फुले दिली आणि कौतुकही केले,’ ही आठवणही निर्मला गोगटे यांनी सांगितली.

प्रकाश पायगुडे यांनी प्रास्ताविक केले. वि. दा. पिंगळे यांनी सूत्रसंचालन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search