Next
सायकलच्या रूपात मिळाले ‘तिच्या’ स्वप्नांना पंख
प्रेस रिलीज
Wednesday, January 30, 2019 | 01:32 PM
15 0 0
Share this article:

निकिता मोरे हिला सायकल देतेवेळी डावीकडून निकिताच्या शाळेतील मुख्याध्यापिका विनिता पवार, निकिताची आई राजेश्री मोरे, निकिता मोरे आणि अनिरुद्ध देशपांडेपुणे : लहानपणी पाहिलेले डॉक्टर होण्याचे स्वप्न साकार करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या निकिता कृष्णा मोरे या नववीत शिकणाऱ्या मुलीला शाळेत जाण्यासाठी जंगलातून रोज सात किलोमीटरची पायपीट करावी लागायची.  या संदर्भातील माहिती पुण्यातील सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांना समजताच त्यांनी निकितासाठी निबे मोटर्स कंपनीची बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक सायकल नुकतीच देऊ केली. यामुळे निकिताच्या स्वप्नांना भरारी घेण्यासाठी पंखच मिळाले आहेत.

पोलादपूर तालुक्यातील (जि. रायगड) मोरेवाडी येथे राहणारी निकिताला आपल्या गावातील पहिली डॉक्टर व्हायचे आहे. त्यासाठी सात किमी अंतरावर असणाऱ्या पळचिल गावातील सैनिक विकास मंडळ, फौजी, आंबवडे संचालित स्व. शांताराम शंकर जाधव न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिकते. तेथे जाण्यासाठी तिला रोज जंगली भागातून पायपीट करावी लागते. तिच्या या खडतर प्रवासाबद्दल देशपांडे यांना समजताच त्यांनी तिला मदत करण्याचा निर्णय घेतला आणि तिला इलेक्ट्रिक सायकल भेट म्हणून दिली. ही सायकल घेण्यासाठी निकिता नुकतीच पुण्यात आली होती. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विनिता पवार, निकिताची आई राजेश्री आणि भाऊ निवेश हेदेखील तिच्यासोबत होते.   

ही सायकल दोन तासांत पूर्ण चार्ज होते आणि १०० किमीपर्यंत ताशी २५ किमीच्या वेगाने दुचाकीसारखी चालते. चार्जिंग संपल्यास ही सायकल पॅडलनेदेखील चालविता येते. या सायकलला ऑन-ऑफचे बटण असून, मागे करिअर चार्जर लावून ती चार्जदेखील करता येते.

‘निकिताची शिकण्याची जिद्द पाहून मी भारावून गेलो. या सायकलमुळे निकिताची शिक्षणाची ही वाट काही अंशी सोपी होईल म्हणून तिला ती देण्याचा निश्चय केला. या सायकलमुळे तिचा उत्साह नक्की वाढेल,’ असा विश्वास देशपांडे यांनी या वेळी व्यक्त केला.                  

‘आठवड्यातले सहा दिवस माझी शाळा असते. शाळेच्या वेळेच्या दोन तास आधी मी घरातून निघावे लागते. जंगली भागातून जाताना डुक्कर, साप हेच काय ते माझे सोबती. मनातून भिती वाटत असली, तरी शाळेत जायचंय ही एकच इच्छा चालताना माझ्या मनात असते. पावसाळ्यात पाण्यातून वाट काढत, उन्हाळ्यात ऊन आणि शाळा सुटल्यावर घरी येताना समोर असणारा मिट्ट काळोख माझी शिक्षणाप्रती असलेली आस्था कमी करू शकला नाही आणि आज माझ्या याच प्रयत्नांना मदतीचा मिळत असलेला हात माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनिरुद्ध सरांनी केलेली ही मदत मी पाहिलेल्या स्वप्नांकडे आणखी खंबीरपणे पुढे घेऊन जाणारी आहे याचा मला आनंद आहे,’ अशा भावना व्यक्त करत निकिताने देशपांडे यांचे आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search