Next
आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी रत्नागिरीत
BOI
Wednesday, October 03, 2018 | 12:07 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरी : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र आणि रत्नागिरीतील खल्वायन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेची प्राथमिक फेरी २१ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी नऊ वाजता रत्नागिरीतील गुरुकृपा मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा मुंबई, पुणे, शिवाजीनगर, नागपूर, मराठवाडा, एसएनडीटी, बडोदा, मध्यप्रदेश आणि गोवा या विद्यापीठांच्या कनिष्ठ, वरिष्ठ महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे. आकाशवाणी, दूरदर्शन मान्यताप्राप्त कलावंत, तसेच या स्पर्धेत पूर्वी अंतिम फेरीत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवणारे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाहीत. स्पर्धेत फक्त मराठी किंवा हिंदी भाषेतील गीत, गझल, भावगीत, भक्तिगीत, अभंग सादर करता येईल. चित्रपट गीतांना व नाट्यसंगीताला परवानगी नाही. प्रत्येक स्पर्धकाला गीत सादरीकरणासाठी पाच मिनिटांचा वेळ मिळेल. हार्मोनियम, तबला आणि तानपुरा इतकीच वाद्ये साथ संगतीसाठी वापरता येतील. हार्मोनियम, तबल्याची आणि वादकांची व्यवस्था संस्थेतर्फे केली जाईल. स्पर्धक स्वखर्चाने स्वत:च्या पसंतीचे वादक आणू शकतील. हार्मोनियम व तबला या साथीशिवाय स्पर्धेत भाग घेता येणार नाही. गीतांच्या लिखित शब्दांची प्रत समोर ठेवून गाता येणार नाही. संपूर्ण भरलेली प्रवेशिका प्राचार्यांच्या स्वाक्षरीसहित खल्वायन संस्थेकडे १९ ऑक्टोबर २०१८पूर्वी १०० रुपये प्रवेश शुल्कासह पोहोचणे आवश्यक आहे. बाहेरगावातील स्पर्धकांनी १०० रुपये मनीऑर्डरने पाठवावेत.

स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम अशा दोन फेर्‍यांत घेण्यात येईल. सर्व स्पर्धकांनी स्पर्धेसाठी गुरुकृपा मंगल कार्यालय या केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. प्राथमिक स्पर्धेतून निवडलेल्या स्पर्धकांची अंतिम फेरी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे २३ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी नऊ वाजता घेण्यात येईल. अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांनी स्पर्धेच्या दिवशी सकाळी ८.३० वाजता उपस्थित राहावे. मुंबईबाहेरील स्पर्धकांना जाण्यायेण्याचे द्वितीय वर्गाचे शयनयानाचे रेल्वेभाडे देण्यात येईल. निवासाची व्यवस्था स्पर्धकाला करावी लागेल. अंतिम स्पर्धेसाठी निवडलेल्या स्पर्धकांना त्यांच्या पसंतीच्या तीन गीतांची यादी २५ नोव्हेंबरपूर्वी सादर करावी लागेल. त्यापैकी परीक्षकांनी निवडलेले गीत स्पर्धकाला सादरीकरणापूर्वी दहा मिनिटे आधी सांगण्यात येईल. परीक्षकांच्या निवडीत बदल करून मिळणार नाही.

अंतिम स्पर्धेतील प्रथम पारितोषिकास पाच हजार रुपये व गुणवत्तापत्रक, दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र व कामेरकर कुटुंबीय फिरता चषक, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये व गुणवत्तापत्र, तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये व गुणवत्तापत्रक, उत्तेजनार्थ पारितोषिक पाचशे रुपये व गुणवत्तापत्रक, प्रथम पारितोषिक विजेत्या स्पर्धकाच्या महाविद्यालयास विष्णू रामचंद्र केळकर स्मृती फिरती ढाल प्रदान करण्यात येईल.

जास्तीत जास्त महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेण्याचे आवाहन दादर माटुंगा कल्चरल सेंटरचे स्पर्धाप्रमुख चंद्रकांत बापट, रवींद्र आवटी आणि खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांनी केले आहे.

प्राथमिक फेरीविषयी :
दिवस :
रविवार, २१ ऑक्टोबर २०१८
वेळ : सकाळी नऊ वाजता
स्थळ : गुरुकृपा मंगल कार्यालय, पर्‍याची आळी, बाजारपेठ, रत्नागिरी
संपर्क : श्रीनिवास जोशी : ९४२२४ ७३०८०, ९४०४३ ३२७०५
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link