Next
‘अभंगवाणी’त रंगले रत्नागिरीकर रसिक
BOI
Saturday, July 13, 2019 | 04:48 PM
15 0 0
Share this article:



रत्नागिरी :
आषाढी एकादशीला उदयोन्मुख, युवा कलाकारांनी सादर केलेल्या अभंगवाणी कार्यक्रमात रत्नागिरीकर रसिक रंगून गेले. ‘सप्तसूर म्युझिकल्स’ची निर्मिती असलेला हा कार्यक्रम अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात झाला. विविध संतांच्या रचना गायकांनी सुरेल आवाजात सादर केल्या.



विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, तीर्थ विठ्ठल, अबीर गुलाल, माझे माहेर पंढरी, बोलावा विठ्ठल अशी गाजलेली भक्तिगीते या कार्यक्रमात सादर करण्यात आली. अमेय आखवे, विशारद गुरव, प्राजक्ता लेले-जोगळेकर, मनाली जोशी, गौतमी वाडकर या गायक कलाकारांनी साक्षात विठूरायाचे चित्र अभंगवाणीतून रसिकांसमोर उभे केले. त्यांना निखिल रानडे (तबला), विकास धामणस्कर (पखवाज), संतोष आठवले (हार्मोनियम), प्रा. सुहास सोहोनी (तालवाद्य), निरंजन गोडबोले (ऑर्गन) यांनी साथसंगत केली. 



वामन जोग यांनी ओघवत्या शैलीत कार्यक्रमाचे निवेदन केले. ‘सप्तसूर म्युझिकल्स’चे संस्थापक निरंजन गोडबोले यांनी नवोदित कलाकारांना या कार्यक्रमाद्वारे पुन्हा संधी दिली आणि यापुढेही नवोदित कलाकारांना संधी देणार असल्याची ग्वाही दिली.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, हरी भजनावीण काळ, आदि देवा पांडुरंगा ही गाणी प्राजक्ता जोगळेकरने सादर केली. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, सुखाचे सुख, माझे माहेर पंढरी, ऐसे पंढरीचे स्थान ही गाणी विशारद गुरवने गायली. अबीर गुलाल, विठ्ठल विठ्ठल नामाचिये, जय अंबे जगदुद्धारिणी ही गीते अमेय आखवे याने सादर केली. पांडुरंग नामी लागलासे ध्यास, खेळ मांडियेला वाळंवटी, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल ही गाणी गौतमी वाडकरने सादर केली. मागे उभा मंगेश, कोटी कोटी रुपे तुझी आदी गीते मनाली जोशीने गायली. 



चित्पावन मंडळाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे यंदा पाचवे वर्ष होते. कार्यक्रमाला रसिकांनी भरपूर गर्दी केली होती. मंडळाचे कार्यवाह राजन पटवर्धन, कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी, कोषाध्यक्ष राधिका वैद्य, खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी, अविनाश काळे यांच्यासमवेत ज्येष्ठ कलाकारांनी या वेळी दीपप्रज्ज्वलन आणि विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन केले.

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search