Next
स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची वाढती पसंती
नाविन्यपूर्ण अनुभव देण्यास स्वित्झर्लंड सज्ज
BOI
Tuesday, October 30, 2018 | 12:31 PM
15 0 0
Share this story


पुणे : ‘स्वित्झर्लंडमध्ये पर्यटनासाठी अनेक पर्याय उपलब्ध होत असल्याने स्वित्झर्लंडला भारतीय पर्यटकांची संख्या वाढत आहे. एरवी रोमँटिक डेस्टीनेशन म्हणून लोकप्रिय असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये साहसी पर्यटन, खाद्य संस्कृती, नवीन स्थळे लोकांसमोर आणण्याचा स्वित्झर्लंड  टुरिझम प्रयत्न करत आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग याची ब्रँड अॅॅम्बेसिडरपदी नियुक्ती करण्यात आली व त्याच्याबरोबर सुरू केलेल्या मोहिमेमुळे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येवर चांगला प्रभाव पडला. २०१७ मध्ये भारतीयांनी स्वित्झर्लंडमध्ये केलेल्या पर्यटनासाठी अनुभवलेल्या दिवसांमध्ये २३.४ टक्क्यांनी वाढ झाली. या वर्षी जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान दहा टक्के वाढ झाली आहे’, अशी माहिती स्वित्झर्लंड  टुरिझमचे भारतातील संचालक क्लाऊडीओ झेंप आणि स्वित्झर्लंड टुरिझम  इंडियाच्या उपसंचालिका रितू शर्मा यांनी दिली.

 
रितु शर्मा म्हणाल्या, ‘भारतीय पर्यटक फक्त हॉटेलमध्येच नव्हे, तर अपार्टमेंटमध्ये राहायलादेखील पसंती देत आहेत. भारतातून स्वित्झर्लंडला सर्वाधिक पर्यटक हे पश्चिम भागातून म्हणजेच महाराष्ट्र व गुजरातमधून येतात. फक्त निसर्ग पाहण्यासाठी नव्हे, तर साहसी पर्यटन व इतर  अॅक्टीव्हिटीजसाठीदेखील पर्यटक स्वित्झर्लंडला जात आहेत. त्याशिवाय तेथील स्थानिक पदार्थांचादेखील पर्यटक आनंद लुटत आहेत. एरवी स्थिरस्थावर झालेले म्हणजेच ३० ते ५५ वर्षे वयोगटातील लोक स्वित्झर्लंडला जायचे, मात्र आता तरूण पिढीच्या वाढत्या उत्पन्नामुळे; तसेच रिटायर्ड लोकांमध्येदेखील स्वित्झर्लंड पाहण्याची रूची असल्यामुळे सर्वच वयोगटातील लोक स्वित्झर्लंडला पसंती देत आहेत. एरवी रोमँटिक डेस्टीनेशन म्हणून लोकप्रिय असलेल्या स्वित्झर्लंडची प्रतिमा बदलण्याचा आम्ही प्रयत्न करीत असून, पर्यटकांना विविध पर्यायांबाबत माहिती देत आहेत. त्यामध्ये गेल्या वर्षीपासून सुरू करण्यात आलेले सेंट मॉरिटस येथील हिवाळ्यातील गोठलेल्या तलावावरील आईस क्रिकेटचा समावेश आहे. पहिल्या आईस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये वीरेंद्र सेहवाग, लसिथ मलिंगा, झहीर खान, महंमद कैफ अशा अनेकांनी आपला सहभाग नोंदवला होता.


स्वित्झर्लंड  टुरिझमचे भारतातील संचालक क्लाऊडीओ झेंप म्हणाले, ‘ब्रँड अॅम्बेसिडर रणवीर सिंग सोबत आम्ही स्वित्झर्लंडमधील साहसी पर्यटन, क्रीडा संस्कृती, नवीन स्थळे व अनुभव लोकांपर्यंत पोहचवित आहोत. इंटरलाकेन ते माँट्रीयाक्स दरम्यानच्या ट्रेनला रणवीर सिंग ट्रेन (तात्पुरते)असे नाव दिले गेले आहे.स्वित्झर्लंडमध्ये चार्ली चॅप्लीनचे तब्बल वीस वर्ष वास्तव्य होते. त्यांच्या येथील घराचा अनुभव पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटकांनी सर्व मौसमांचा खास करून हिवाळ्याचा अनुभव येथे घ्यावा. झ्युरिकसारखी मोठी शहरे नव्हे, तर छोटी शहरे व गावांमध्ये देखील पर्यटनाचा अनुभव घ्यावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’


रितू शर्मा म्हणाल्या, ‘स्वित्झर्लंड हे ३६५ दिवसांचे पर्यटन स्थळ असून, पर्यटकांचे वर्षात कधीही स्वागत करण्यास आम्ही तयार आहोत.स्विस ट्रॅव्हलपासमुळे पर्यटकांची अधिक सोय होणार आहे. या एकाच तिकीटामध्ये सर्व प्रकारच्या सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्याचबरोबर स्विस इंटरनॅशनल एअरलाईन्सने नुकताच स्टॉपओव्हर स्वित्झर्लंड प्रोग्राम सादर केला आहे. ज्यामुळे पर्यटकांना एका स्थळावरून दुसऱ्या  स्थळाकडे जाताना स्वित्झर्लंडला थांबून एक ते चार  दिवसांचा पर्यटनाचा चांगला अनुभव मिळू शकेल.’
स्वित्झर्लंड टूरिझमचे भारतातील संचालक क्लाऊडीओ झेंप आणि स्वित्झर्लंड टूरिझम इंडियाच्या उपसंचालिका रितु शर्मा
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link