Next
पुण्यात बहरतोय मुलांचा वाचनकट्टा!
BOI
Saturday, August 04, 2018 | 11:00 AM
15 0 0
Share this article:


पुणे : मुले आणि वाचनात दंग... काहीतरीच काय? आजकालची मुलं वाचतात कुठे? सारखी मोबाइल आणि टीव्हीवर काहीतरी पाहण्यात दंग झालेली असतात, अशी तक्रार अनेक पालक करत असतात. पुण्यातील हर्षदा पेंढारकर आणि काही समविचारी पालकांनी यावरच एक चांगला उपाय शोधून काढला आहे आणि त्याचा चांगला परिणामही दिसू लागला आहे. मोठ्यांच्या वाचनकट्ट्याप्रमाणे त्यांनी मुलांचाही वाचनकट्टा सुरू केला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुलांमध्ये वाचनाची गोडी वाढत असून, कट्ट्यावर येणाऱ्या मुलांची संख्याही वाढत आहे. 

या कट्ट्यासंदर्भात जाणून घेण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने हर्षदा पेंढारकर यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी त्यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली. ‘हा कट्टा दर महिन्यातून एकदा कधी कोणाच्या घरी किंवा विषयानुसार एखाद्या ठिकाणी भरतो. सर्वांच्या सोयीने ठिकाण ठरवले जाते. मनापासून यायची तयारी असलेली आणि वाचनाची आवड असणारी मुले यात सहभागी होऊ शकतात. या कट्ट्यावर आम्ही एखादा लेखक किंवा विषय ठरवतो आणि त्या संदर्भातील वाचन मुलांनी महिनाभर घरी करायचे असते. मुले घरी जे काही वाचतील, त्यापैकी स्वत:ला आवडलेल्या आणि इतरांनी आवर्जून वाचायला हवे असे त्यांना वाटते, त्या साहित्याचे वाचन मुलांनी कट्ट्यावर सादर करायचे असते. जो विषय, लेखक निवडलेले असतात त्यांचे कोणत्याही प्रकारचे साहित्य चालते. काही लेखकांचे साहित्य इतके आहे, की त्यासाठी मुलांना एक महिना कमी पडतो. मग सलग दोन ते तीन कट्ट्यांवर एकाच लेखकाच्या लेखनासंदर्भातील वाचन होते. सध्या आठवी ते दहावीतील १० ते १५ मुले यात सहभागी होत असून, ती खूप आनंदाने यात भाग घेत आहेत,’ असे हर्षदा म्हणाल्या.

याची कल्पना कशी सुचली, याबाबत विचारले असता, त्या म्हणाल्या, ‘आजकालच्या स्पर्धेच्या, धावपळीच्या युगात वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताकद थोडी कमी पडते, असे दिसते. वाचनातून त्यांना चांगले विचार देता येऊ शकतात. मुलांना चांगले, त्यांच्या आवडीचे वाचायला दिलं, तर ती मनापासून वाचतात. मग त्या ‘पुलं’च्या हसवणाऱ्या व्यक्तिरेखा असोत, की धारप-मतकरींपासून हृषीकेश गुप्तेंपर्यंतच्या भयकथा किंवा गूढकथा, मुलांना त्यांच्या मूडनुसार वाचायला आवडते. त्यांना हवे ते खाद्य हव्या त्या वेळी पुरवले, तर ती वाचनात छान रमून जातात. माझी मुलगी मनस्वी हिच्या मित्र-मैत्रिणींना पहिल्यापासून वाचनाची आवड होतीच. नवे काय वाचले, याच्यावर त्यांच्या गप्पासुद्धा व्हायच्या. पालकांच्या वाचनकट्ट्याच्या निमित्ताने मग मुलांचाही वाचनकट्टा का सुरू करू नये, असा विचार आधी मनस्वीच्या डोक्यात आला. तो आम्ही उचलून धरला आणि पहिला कट्टा आमच्या घरीच आयोजित केला. सुरुवातीला यात सहभागी होताना मुलांचा वाचनाबरोबर खेळणं, भेटणं, धमाल आणि गप्पा यावर भर होता. नंतर ते आकर्षणही मागे पडले आणि मुले दर वेळी वेगळा लेखक, वेगळा विषय शोधून वाचायला लागली. आम्ही त्यांना वाचन कसे, कोणते केले पाहिजे, कोणती पुस्तके आहेत, याबाबत माहिती देतो. मोबाइलवरचे चांगले अॅपही त्यांना सांगतो. अर्थातच वापरण्यावर मर्यादाही घालतो. मुलेही त्याचा चांगला वापर करत असल्याचे आम्ही अनुभवले आहे.’ 

आतापर्यंत झालेल्या विषयांबद्दल त्या म्हणाल्या, ‘पु. ल. देशपांडे, अनिल अवचट, मंजूषा आमडेकर, राजीव तांबे असे काही लेखक आणि शौर्यकथेसारख्या काही विषयांवर आतापर्यंत कट्टा झालेला आहे. लेखिका मंजूषा आमडेकर तर मुलांशी गप्पा मारायला आनंदाने आमच्या कट्ट्यावर आल्या होत्या. अनिल अवचटांच्या छोट्या, मनाचा वेध घेणाऱ्या अनुभवांच्या वाचनापासून सुरू झालेला वाचनकट्ट्याचा हा प्रवास अर्थातच, ‘पुलं’ हे महत्त्वाचे स्टेशन पार करून आता गूढकथांपर्यंत पोहोचला आहे.’ 

मुलांचे वाचन कमी झाल्याचे चित्र हल्ली केवळ शहरांतच नव्हे, तर ग्रामीण भागांतही सर्रास दिसते. मोबाइल, टीव्ही, कम्प्युटर यांच्यामध्येच त्यांचा बहुतांश वेळ जातो. या पार्श्वभूमीवर, या वाचनकट्ट्यासारखा आदर्श उपक्रम विविध गावांत, शहरांत किंवा कोणत्याही ठिकाणी राबविणे सहज शक्य आहे. मुलांना वाचनाची गोडी लावण्याचा तो एक चांगला मार्ग ठरेल.

पुढचा कट्टा १९ ऑगस्टला
‘ऑगस्ट महिन्यातील कट्टा रविवारी, १९ ऑगस्ट २०१८ रोजी तळजाईच्या जंगलात सकाळी सात ते नऊ या वेळेत होणार असून, त्याचा विषय रहस्य आणि गूढकथा असा आहे. ज्यांना या उपक्रमात सहभागी व्हायचे आहे, त्यांनी ९९२२९ १३४५७ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर जरूर संपर्क साधावा. मुलांचे स्वागतच आहे,’ असे हर्षदा पेंढारकर यांनी आवर्जून सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 89 Days ago
There should be more of these , easily accessible by public transport ,catering to different age groups . Initial investment need not be large . People may help by donating unwanted books
0
0
Rajshree About 345 Days ago
Mast
0
0
Madhuri Barve About 345 Days ago
Mast upakram
0
0
Dattatray D.THORAT About 346 Days ago
Very very best efforts for encouragement to children for reading.
0
0
NERKAR VISHWAS About 347 Days ago
Very nice...
0
0
राजशेखर बालेकर About 347 Days ago
चांगला उपक्रम.
0
0
मुकुंद शिंदे About 347 Days ago
अप्रतिम
0
0

Select Language
Share Link
 
Search