Next
संक्रमण काळातही माध्यमांनी मूल्याधिष्ठित व्यवस्था विकसित करावी
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार वितरणावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन
BOI
Monday, July 29, 2019 | 03:31 PM
15 0 0
Share this article:

ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई :
‘आपल्याकडची माध्यमव्यवस्था सध्या एका संक्रमणाच्या काळातून जात आहे. विश्वासार्हता जपण्याच्या दृष्टीने माध्यमांनी आतापर्यंत ज्याप्रमाणे सर्व आव्हाने स्वीकारून स्वतःची मूल्ये स्वतः तयार केली आहेत, तशीच मूल्याधिष्ठित व्यवस्था आजच्या बदललेल्या, नव्या युगातही तयार केली पाहिजे आणि माध्यमे ती करतील, असा विश्वास मला आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. राज्य शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण शनिवारी (२७ जुलै २०१९) मुंबईत फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या कार्यक्रमात २०१६, २०१७ आणि २०१८ या वर्षांसाठीच्या विविध विभागातील आणि राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मंत्रालयाजवळील यशवंतराव चव्हाण प्रबोधिनीच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात २०१७ आणि २०१८ साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार अनुक्रमे ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे आणि ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी एक लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१६साठीचा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार दैनिक हितवादचे संपादक विजय फणशीकर यांना जाहीर झाला. ते कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित नसल्याने त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपले मनोगत व्यक्त केले. Bytesofindia.comचे संपादक अनिकेत कोनकर यांना या वेळी २०१८चा सोशल मीडिया राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोशल मीडिया राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारताना Bytesofindia.comचे संपादक अनिकेत कोनकर.

राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकाराला यंदापासून अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी केली.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधी योजना उत्तम कामगिरी केलेल्या राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति कृतज्ञभावनेने सुरू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. राज्याच्या विविध भागांतील २३ ज्येष्ठ पत्रकारांना या कार्यक्रमात पहिला धनादेश प्रदान करून या योजनेची सुरुवात करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार (९८ वर्षे) रामभाऊ जोशी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात व्हिडिओ संदेशाद्वारे आपले मनोगत व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान निधी योजनेचा धनादेश स्वीकारताना रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे

‘पत्रकारांना सामाजिक सुरक्षितता हवी’
‘पत्रकारिता कोणत्याही दबावाखाली, बंधनाखाली असू नये असे नेहमी म्हटले जाते; पण सामाजिक सुरक्षितताही हवी आणि आधारही असावा, असा हेतू ठेवून पत्रकारांनी आयुष्यभर केलेल्या उत्तम कामाची जाण ठेवून कृतज्ञभावनेने पत्रकार सन्मान निधी योजना सुरू केली आहे. हा निर्णय घेतला तेव्हा चांगला वाटलाच होता; पण आज ज्या पत्रकारांना हा निधी देण्यात आला, त्यांची नावे पाहिली, तेव्हा लक्षात आले, की यातील अनेकांनी माझ्या वडिलांसोबत किंवा वडिलांच्या काळात काम केले आहे. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो, त्यांना पाहिले आहे. त्यामुळे ही योजना राबवू शकलो, याचा मनःपूर्वक आनंद झाला,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘बदलत्या काळातही मूल्याधिष्ठित व्यवस्था हवी’
मुख्यमंत्री म्हणाले, ‘पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते. सत्तेवर अंकुश ठेवण्याचे काम पत्रकारिता करते. शासकीय व्यवस्था शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे काम पत्रकारिता करते. तसेच, ज्यांचे आवाज शासनापर्यंत पोहोचत नाहीत, त्यांचा आवाज माध्यमे बनतात. समाजप्रबोधनाचे कामही त्यांच्याकडून घडावे, अशा सगळ्या दृष्टीने लोकशाहीच्या रचनेत माध्यमांची व्यवस्था आहे. महाराष्ट्रातील माध्यमे हे कार्य चांगल्या पद्धतीने पार पाडत आली आहेत आणि यापुढेही तसेच करतील, असा विश्वास वाटतो.’

‘प्रत्येक युगाची मूल्ये असतात. काही शाश्वत असतात, तर काही बदलतात. पत्रकारितेच्या क्षेत्रातही काही मूल्ये बदलली असतील. प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल मीडिया आणि ३६० डिग्री अॅप्रोच अशा प्रकारे माध्यमे बदलत गेली. माध्यमांच्या बातम्या ग्रहण करण्याची लोकांची पद्धतही मोठ्या प्रमाणात बदलली आहे. भारत हा सर्वांत जास्त डेटा (माहिती) कंझ्युम करणारा देश आहे. सामान्य माणूसही स्मार्टफोन वापरतो आणि मोठी माहिती ग्रहण करतो. डिजिटल मीडियामुळे माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवायचे मोठे दालन उघडले आहे; पण त्याचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. यातून अफवा पसरवणे सोपे आहे. खरी माहितीच पोहोचवली पाहिजे याचे बंधन नाही. अनेक बातम्या लोकांपर्यंत पोहोचू नयेत त्या पद्धतीने पोहोचतात. त्यातून समाजस्वास्थ्य बिघडते,’ असे मुख्यमंत्री म्हणाले.
‘माध्यमव्यवस्था एका संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे. माध्यमांनी आतापर्यंत आलेली सगळी आव्हाने स्वीकारली आहेत. स्वतःच स्वतःची मूल्ये तयार केली आहेत. म्हणूनच पत्रकारिता आजपर्यंत टिकली आहे. त्याचप्रमाणे या संक्रमण काळातील आव्हानेही माध्यमे स्वीकारतील. त्यातून विश्वासार्हता टिकली पाहिजे. मूल्याधिष्ठित व्यवस्था तयार करावी लागेल आणि त्यासाठी कोणत्याही कमिशनची गरज नाही, तर माध्यमे स्वतःची ती करतील, हा विश्वास मला आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. 

पत्रकारांचे सहकार्य आणि मार्गदर्शन
पाच वर्षांच्या काळात पत्रकारांचे चांगले सहकार्य आणि मार्गदर्शनही लाभल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आभार मानले. ‘बातमीच्या संदर्भात मी माझ्या बाबतीत काही नियम घालून घेतले आणि पाळले. अनेक पत्रकार माझे मित्र आहेत; पण या बाबतीत कुणी माझा मित्र नाही, कुणी शत्रू नाही. त्यामुळे आमच्या मंत्रिमंडळाच्या बातम्या कधीच फुटल्या नाहीत. आम्ही पद आणि गोपनीयेतची शपथ घेतली आहे. त्याचे पालन सदासर्वकाळ करण्याची गरज आहे, ’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

बातम्यांचा सकारात्मक उपयोग
‘तथ्य नसलेल्या बातम्यांचा खुलासा शासकीय यंत्रणेने तात्काळ करावा यासाठी मी सतत आग्रही राहिलो. त्याचप्रमाणे बातमीतील तपशील खरा असेल तर अशा बातम्यांची दखल घेऊन त्याप्रमाणे कार्यशैलीत बदल करण्याच्या सूचनाही मी संबंधित विभागांना वेळोवेळी केल्या. निर्णय घेताना अशा बातम्यांचा नेहमीच सकारात्मक उपयोग झाला,’ असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

‘काही गोष्टींना वेळ जरूर लागला; पण अनेक प्रलंबित निर्णय घेऊ शकलो, याचा आनंद आहे,’ असेही मुख्यमंत्री म्हणाले. 

‘नऊ वर्षांचे पुरस्कार देणारा पहिला मुख्यमंत्री’
‘माझ्या काळातील पुरस्कार तर मी दिले आहेतच; पण आधीच्या सरकारच्या काळातील चार वर्षांचे पुरस्कारही मी दिले आहेत. त्यामुळे पाच वर्षांत नऊ वर्षांचे पुरस्कार देणारा मी पहिला मुख्यमंत्री असेन,’ अशी टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी करताच सभागृहात हास्याची लकेर उमटली. 

व्यासपीठावरील मान्यवर (डावीकडून) अजय आंबेकर, ब्रिजेश सिंह, देवेंद्र फडणवीस, रमेश पतंगे, पंढरीनाथ सावंत

‘सन्मानाने दिले हे महत्त्वाचे’
रमेश पतंगे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात पत्रकारांची सामाजिक सुरक्षितता हा योग्य शब्द वापरला. पत्रकारांना पेन्शन वगैरे नसते. त्याच्या कामाचे तास ठरलेले नसतात आणि पगारही फार मोठा असतो असे नाही. ‘साप्ताहिक विवेक’चा संपादक किंवा महाराष्ट्राचा विचारवंत, अशी माझी ओळख असली, तरी निवृत्त होताना माझे आर्थिक उत्पन्न काय होते, ते माझे मला माहिती  आहे. अशीच सगळ्या पत्रकारांची स्थिती असते. मायबाप सरकारने सन्मानाने दिले पाहिजे. भीक मागून दिले, याचना करून दिले, तर काही उपयोग नाही. अशा घेण्यामध्ये पत्रकारी धर्माचाही अपमान आहे. त्यामुळे सन्मानाने सर्वांना दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो.’

‘माझी पत्रकारिता हा माझ्या जीवनातला अपघात आहे. मी संघाचा कार्यकर्ता आहे. तिथे कामाच्या जबाबदाऱ्यांमध्ये सतत बदल होत असतो. एके सकाळी मला ‘विवेक’च्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळण्यास सांगण्यात आले. त्या वेळी मला लेखन, संपादक, पत्रकारिता या विषयांबद्दल मला शून्य ज्ञान होते. काम कामाचा गुरू असते. त्यामुळे ते शिकवत जाते. तसा मी शिकत गेलो. पत्रकारितेत करिअर करावे, असे माझ्या कधीही डोक्यात नव्हते. तरीही माझे करिअर त्यात झाले. त्यामुळे पुरस्कार मिळेल असेही कधी डोक्यात नव्हते. तरीही तो मिळाला. 

आपले काम प्रामाणिकपणे, निरपक्षेपणे, सर्व शक्ती पणाला लावून करत राहिले, तर त्याचे कर्मफल मिळाल्याशिवाय राहत नाही, असा त्याचा अर्थ आहे,’ असे ते म्हणाले.

‘माझी सर्व तरुण पत्रकारांना विनंती आहे, की पत्रकारिता क्षेत्रात तुम्ही कुठेही आणि काहीही काम करत असाल, तर आपली सर्व शक्ती केंद्रित करून काम करा. त्याचे परिणाम नक्कीच चांगले होतील,’ असेही पतंगे यांनी सांगितले. 

‘हा पुरस्कार प्रबोधनकारांच्या शिकवणीला’
पंढरीनाथ सावंत म्हणाले, ‘मी कधी अपेक्षा केली नव्हती, की मला कुठलाही पुरस्कार मिळेल. कारण प्रबोधनकार ठाकरे माझे गुरू. त्यांनी मला सांगितले, की ‘टेबलाला बांधून घेऊ नको, खूप फिर.’ ते मी ऐकले आणि नागपूरच्या ‘लोकमत’पासून कोल्हापूरच्या ‘पुढारी’ अनेक माध्यमांत काम केले. त्यामुळे हा पुरस्कार प्रबोधनकारांच्या शिकवणीला मिळाला असे मला वाटते.’

‘तुम्ही थोडे फिरलात, तर विलक्षण अनुभव मिळतात. हे गुरुजींच्या शिकवणीमुळे मला कळले. मी चित्रकार, फोटोग्राफर आहे, पुस्तके लिहिली आहेत आणि पत्रकारिताही केली आहे. अनेक दौरे केलेत. त्यामुळे मी अनुभवसमृद्ध झालो. दादांनी (प्रबोधनकार) शिकवले आणि साहेबांनी (बाळासाहेब) पॉलिश केले, हे त्याचे कारण आहे,’ असेही सावंत यांनी नमूद केले.

पत्रकार कांचन श्रीवास्तव आणि राजकुमार सिंह यांनी आपल्या पुरस्काराची प्रत्येकी ५१ हजार रुपयांची संपूर्ण रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीस देत असल्याची घोषणा केली. 

माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव ब्रिजेश सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. संचालक (माहिती) सुरेश वांदिले यांनी आभार मानले. नरेंद्र बेडेकर आणि कल्पना ब्रीद-साठे यांनी या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक अजय आंबेकर या वेळी उपस्थित होते. 

(पुरस्कारविजेत्या सर्व पत्रकारांच्या नावांची यादी वाचण्यासाठी येथे क्लिक करा. कार्यक्रमाचा संपूर्ण व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search