Next
इतर कोणत्याही पुरस्कारापेक्षा हा सन्मान मोठा : मनोज वाजपेयी
BOI
Wednesday, January 30, 2019 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

मनोज वाजपेयीमुंबई : आपल्या उत्कृष्ट अभिनयाने बॉलीवूडमध्ये आपली एक विशेष जागा निर्माण करणारे अभिनेते मनोज वाजपेयी यांना नुकताच यंदाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान मिळाल्याने आपण अतिशय आनंदी असल्याचे मनोज यांनी म्हटले आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नुकतीच यंदाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली. एकूण ११२ जणांना हे पद्म पुरस्कार जाहीर झाले असून त्यापैकी ९४ जणांना पद्मश्री, १४ जणांना पद्मभूषण आणि चार जणांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना ‘पद्म’ पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. मनोज वाजपेयींबरोबरच चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक प्रभू देवा, गायक शंकर महादेवन आणि दिवंगत अभिनेते कादर खान यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. 

‘देशभरात माझ्यावर प्रेम करणारे खूप लोक आहेत. याची सुरुवात माझ्या घरापासूनच होते. आज मला या सर्वोच्च सन्मानाने गौरवण्यात येत असताना माझ्याइतकाच आनंद माझ्यावर प्रेम करणाऱ्या त्या सगळ्यांना निश्चितच झाला असेल. इतर कोणत्याही पुरस्कारांपेक्षा हा सन्मान माझ्यासाठी खूप मोठा आहे. चित्रपट क्षेत्रातील २५ वर्षांच्या करिअरचे चीज झाले असे मी म्हणेन’, अशा शब्दांत मनोज वाजपेयी यांनी एका मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या मते हा सन्मान केवळ तुमच्या क्षेत्रातील तुमची कारकीर्द पाहून दिला जात नसून, देशाचा एक नागरिक म्हणून तुमची पारख केली जाते. तुमच्या क्षेत्रातील योगदानाबरोबरच तुमचे सामाजिक जीवन, तुमचे वैयक्तिक आयुष्य या सगळ्याचा विचार करून हा सन्मान दिला जातोट, असे ते म्हणाले. 

हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रीया काय होती, याबाबत विचारले असता, मनोज यांनी सांगितले, ‘रात्री १० वाजता मला अमेरिकेतून अभिनेते आणि माझे खूप चांगले मित्र अनुपम खेर यांचा फोन आला. त्यांनी मला हा पुरस्कार जाहीर झाला असल्याचे वृत्त सांगितले. त्यावर मी एकदम शांत झालो. कोणत्या शब्दांत त्यांना प्रतिक्रीया द्यायच्या हे मला काही काळ समजलेच नाही. शेवटी मला भरून आले. सर्वांत पहिल्यांदा अनुपम खेर यांनी माझे अभिनंदन केले.’ असे सांगितले. 

आजवरच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले मनोज वाजपेयी हे बिहारमधील नरकटियागंजजवळील एका छोट्या गावात जन्मले. पुढे ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिकण्याची त्यांची इच्छा होती. चार वेळा प्रयत्न करूनही प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी ‘बैरी ड्रामा स्कूल’मधून आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण केले. छोट्या पडद्यावरून आपल्या करिअरची सुरुवात केलेल्या मनोज यांचा द्रोहकाल हा पहिला चित्रपट. पुढील काळात रामगोपाल वर्मा यांचा ‘सत्या’ हा चित्रपट मनोज वाजपेयी यांच्या करिअरला कलाटणी देणारा चित्रपट ठरला. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search