पुणे : ‘माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळा’च्या वतीने ‘माहेश्वरी स्कॉलर पुरस्कार’ वितरण सोहळ्यात यंदाचा ‘माहेश्वरी स्कॉलर आयकॉन’ पुरस्कार ‘आयआयटी भिलई’चे संचालक डॉ. रजत मूना यांना प्रदान करण्यात आला. तसेच यंदाचा ‘माहेश्वरी स्कॉलर २०१८’ पुरस्कार अर्चित चांडक, डॉ.सिद्धेश कलंत्री, मुकुंद माहेश्वरी, प्रतीक मनूध्याय, अक्षय रांदड, गौरव सोमानी यांना देण्यात आला .
या पुरस्कारांसोबतच यंदाचा ‘प्रॉमिसिंग माहेश्वरी स्कॉलर २०१८ पुरस्कार’ शशांक हेडा, डॉ. अपूर्व काबरा, आशिष काबरा, पलाश माहेश्वरी, परिधी माहेश्वरी, नेहा राठी, अभिषेक सोमानी, रूपाली तापडिया-बुटाला, डॉ, अभिषेक झंवर यांना प्रदान करण्यात आला. ‘प्रॉमिसिंग माहेश्वरी स्कॉलर्स’ना २५ हजार रुपयांचे सुवर्णपदक देण्यात आले. वैद्यकीय, अभियांत्रिकी विभागातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांपासून चार्टर्ड अकाऊटंट, कंपनी सेक्रेटरी याचबरोबरच युपीएससी, पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधील गुणवंत व उच्च शिक्षणाची ओढ असलेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ‘माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळा’च्या वतीने ‘माहेश्वरी स्कॉलर पुरस्कार’ प्रदान करण्यात येतो.
महाराष्ट्रातील विविध भागांसह मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेशसह जर्मनी, स्पेन, जपान, युएसए, युके येथून या पुरस्कारासाठी अर्ज येतात. या पुरस्कारासाठी तज्ज्ञ व्यक्तींकडून परीक्षण करून विद्यार्थ्यांची निवड केली जाते. उच्चशिक्षणात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना या दोन्हीं पुरस्काराने गौरविण्यात येते. २०१२मध्ये पाच पुरस्कार्थींपासून या सोहळ्याला सुरुवात झाली होती. मागील सहा वर्षांत तब्बल ८४ विद्यार्थ्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्यात आले आहे.
पुरस्कार वितरण समारंभाला ‘अल्ट्रा टेक सिमेंट लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक के. के. माहेश्वरी, ‘बिग बास्केटचे माजी मुख्य तांत्रिक अधिकारी प्रमोद जाजू उपस्थित होते. माहेश्वरी स्कॉलर्ससाठी ५० हजार रुपयांचे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले . लवकरच संस्थेतर्फे नवी मुंबईतील ऐरोली येथे मुलांचे वसतिगृह उभारणार असल्याची घोषणा या वेळी करण्यात आली. परदेशात जाण्याऐवजी भारतात राहूनच देशासाठी काम करण्याचा मानस विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात व्यक्त केला .
पुरस्कार समितीचे अध्यक्ष डॉ. वसंत बंग, सचिव निलेश लद्दड, सहसचिव सुलेखा न्याती यांसह इतर सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. अतुल लाहोटी यांनी स्वागत केले.