Next
काळजावर रेखली जाणारी कविता
BOI
Friday, June 09, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

विनायक येवले हे नव्या पिढीतील महत्त्वाचे कवी आहेत. ‘ठसे बदललेल्या मुक्कामावरून’ या त्यांच्या पहिल्याच कवितासंग्रहाला महाराष्ट्र सरकारचा बहिणाबाई चौधरी काव्य पुरस्कार मिळाला आहे. त्यांचा हा कवितासंग्रह वाचून ज्येष्ठ लेखक विश्राम गुप्ते यांनी त्यांना लिहिलेले पत्र येथे प्रसिद्ध करत आहोत. हे पत्र म्हणजे येवले यांच्या कवितांचा रसास्वादच आहे...
.............
प्रिय विनायक,

‘ठसे बदलेल्या मुक्कामावरून’ हा तुझा कवितासंग्रह मी आत्ताच वाचून काढला. तो मी ‘वाचून संपवला’ असं म्हणणार नाही. कारण तुझ्या कवितेची ओळख म्हणजे ती वाचताना काळजावर रेखली जाते. याचं कारण तुझी एक कवी म्हणून तळमळ आणि तू हस्तगत केलेली शब्दशक्ती. याबद्दल तुझं एक कवी म्हणून मी अभिनंदन करतो. प्रतिक्रियेला उशीर केला, याबद्दल क्षमस्व. कवी आपल्या पोटातून काहीतरी मांडतो. त्यावर वाचकाचा प्रतिसाद तितकाच उत्स्फूर्त आणि लगोलग हवा. तो तुला मी काही देऊ शकलो नाही; पण तुझ्या कविता वाचताना ही कविता कवितेच्या घोळक्यातून उठून दिसणारी आहे हे जाणवलं.

‘मरणोन्मुख गावसंस्कृतीची सामुदायिक वेदना मांडणारी कविता’ असं तुझ्या कवितेचं एक वाचन संभवतं. एका संवेदनशील, हळुवार माणसाचं समूहातलं एकटेपण व्यक्त करणारी कविता असंही तुझ्या कवितेचं वाचन शक्य आहे. अत्यंत तिरकस आणि भेदकपणे भोवतालचा कौटुंबिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिसर टिपणारी कविता असं तिसरं वाचनसुद्धा तुझ्या कवितेचं होऊ शकतं. तुझ्या या गावाकडल्या कवितेचा आवाका बहुविध अर्थ व्यक्त करतो. ही तुझ्यासारख्या तरुण कवीला फार आशादायक गोष्ट समज.

रूपकातून सांगायचं झालं, तर तुझ्या कवितेचा कॅनव्हास ग्लोबलायझेशनचा आहे आणि त्याची फ्रेम ‘ग्लोबल वॉर्मिंग’ची. तुझ्या कवितेतली नियतीशरणता आणि हतबलता ग्रामीण कवितेला नवी नाही; मात्र तिला तू तुझा असा स्वर दिलेला आहेस. जागतिकीकरण आणि ग्लोबल वॉर्मिंग या दोन संकटांशी लढणारी तुझी कविता आहे. हे तसे म्हटले तर ‘कविताबाह्य’ घटक वाटतात; पण कविता ही निखळ, शुद्ध, प्युअरब्युअर अशी अभिव्यक्ती नसतेच, तर तो बेईमान, बेवफा, बेमुर्वत काळाला दिलेला लिरिकल रिस्पॉन्स असतो. तो तत्काळ प्रत्युत्तरासारखा असतो आणि मुख्य म्हणजे तो फार विचार न करता, चटकन पोटातून सुचलेला असतो. कादंबरी विचारपूर्वक ‘रिस्पॉन्स’, तर कविता हृदयपूर्वक ‘रिस्पॉन्स’ असं मला वाटतं. या संदर्भात मला तुझी कविता फार पटली.

तुझा तुझ्या ठसे बदललेल्या मुक्कामाशी जो संवाद आहे त्यातला उदास सूर मला अस्वस्थ करून गेला. आपली कविता अशी का झाली, तर आपली परिस्थितीच अशी होत गेली, असं तुझं म्हणणं असू शकतं. कविता परिस्थितीशरण असते. कारण कवी तसा असतो. आज ‘गावसंस्कृतीची’ कविता म्हणून जो कोणी कविता करतो, तो उखडलेल्या, उद्ध्वस्त झालेल्या, भंगलेल्या इमारतीबद्दल बोलत आहे, हे ग्रामीण मराठी कवितेत आज बऱ्यापैकी स्थापित झालेलं सत्य आहे. गावं मेलं आणि शहर बेईमान झालं, तर माणसानं जावं कुठे, हा तुझ्या कवितेतला अध्याहृत प्रश्न आहे. याचं उत्तर तुझं तूच दिलं आहेस. अशा शोकात्म परिस्थितीत कवीने ना गावात राहावं, ना शहरात, तर स्वत:तच राहावं. स्वत:च्या स्वच्छ जाणिवेत राहणं हा कलाकारांसमोरचा एकमेव पर्याय आहे. मला वाटतं या कवितेतून तू तोच निवडला आहेस.

असं करणारे अनेक कवी आपली ‘लिरिकल व्हेन’ गमावतात आणि गद्य होतात. तुझ्या कवितेत तसं काहीही होत नाही. सुरुवातीच्या ओळीपासून सुरू झालेली तुझी कविता अखेरपर्यंत ताणलेल्या प्रत्यंचेसारखी आहे. हा ताण टिकवणं सोपं नाही. ज्याच्या हृदयात परदु:खाबद्दल कळवळा आणि सहवेदना नांदते, असा माणूस कवी होतो. या दोन्ही गोष्टी तुझ्यात आहेत हे तुझी कविता वाचताना मला जाणवलं; पण विनायक, कवीला नुसती सहवेदना कामाची नसते, तर त्या वेदनेचं पोट चिरण्याची कुवत जरुरी असते. त्यासाठी सामाजिक भान आणि विश्लेषण लागतं. दोन्ही गोष्टींचा तुझ्या कवितेत तुटवडा नाही; मात्र जे गाव पूर्वी सुंदर होतं आणि जे आता मेलं किंवा मरायला टेकलं असं तुला वाटतं ते गाव पूर्वी खरोखरीच सुंदर होतं का, की त्या गावाबद्दल आपली चिकित्साबुद्धी विकसित झाली नव्हती, हा प्रश्न तू स्वत:ला जरूर विचारला पाहिजेस.

ग्रामीण कवितेत किंवा एकूणच ग्रामीण साहित्यात मला वाटतं, गावांचं जे ‘रोमँटिकीकरण’ सुरू आहे, त्यावर नव्याने चर्चा व्हायला हवी. प्रेम, जिव्हाळा, ओलावा, आपलेपणा, या गोष्टी गावात नसतात. त्या घरात आणि घराभोवती राहणाऱ्या माणसांमध्ये अधूनमधून व्यक्त होत राहतात. या लोभस भावनांचा अनुभव फक्त गावातच नव्हे, तर शहरात राहणाऱ्या आणि ‘मेट्रो’मध्ये राहायची पाळी आलेल्या एखाद्या मुलाला येणं शक्य आहे. या रम्य भावनांचा तुटवडा पडू लागला, की आपण अस्वस्थ होऊ लागतो; पण आजपासून पन्नास वर्षांपूर्वी किंवा पंधरा वर्षांपूर्वी आपण राहायचो तो मुक्काम खरोखरच इतका आदर्श, रम्य ‘युटोपियन’ होता, की आपण निरागस असल्यामुळे आपल्याला तसं वाटायचं? हा प्रश्न तुला आवडला नसला, तरी त्या अंगानेसुद्धा तू तुझ्या एकूण मुक्कामाचा विचार करावास, असं मी तुला सुचवेन.

माणसं बदललीत, की ती पूर्वीपासून तशीच होती आणि आपला त्यांना बघणारा आपला ‘नजरियाँ’ बदलला? हा विचार तुला वाटतो तितका टाकाऊ नसेलही कदाचित. तर यावर तू विचार कर. माणसं माणसं असतात. ती प्रेमळ, ओलसर, जिव्हाळा दाखवणारी आणि हेकट, तुटलेली, कोरडी, एककल्ली आणि स्वत:ची स्वप्नं पूर्ण करणारी, दोन्ही असतात. तू म्हणतोस त्या गावात माणसांमध्ये जास्त आदर्श गुण असतील; पण माणसाची सरासरी बेरीज संमिश्र असते; मात्र एक कवी म्हणून तुझा भावनोद्रेक समजण्याजोगा आहे. तो तू अत्यंत चपखल भाषेत मांडला आहेस.

संपूर्ण एकटा असलेला ‘स्व’ हा तुझ्या कवितेचा प्रवक्ता आहे. याला कादंबरीत ‘प्रोटॅगोनिस्ट’ म्हणतात. हा तुझ्या कवितेतला प्रवक्ता स्वत:च्या दु:खाला न गोंजारता समूहाचं दु:ख भोगणारा छान माणूस आहे. प्रत्येकानं असंच राहावं; पण ते दैनंदिनतेच्या रामरगाड्यात शक्य होत नाही. प्रत्येकाला स्वत:ची कामं असतात. स्वत:चं क्षितिज दिसत असतं. तिथे पोहोचायला प्रत्येक जण आतुर असतो; पण एखादा कवी सगळ्यांना कवेत घेणारं क्षितिज कसा बघू शकतो, हे तुझ्या कवितेवरून मला कळलं.

या संग्रहातल्या बहुधा सगळ्याच कविता मला आवडल्या. त्यात ‘ओळख’ ही अंगाने रोड, पण आशयाने भारी कविता आहे. ‘हरवलेल्या गावास अनावृत्त पत्र’ ही कविता म्हणजे प्रत्येक कवीची आद्य कविता असते. मी गावात वाढलो नाही; पण ज्या शहरात मी लहानाचा मोठा झालो त्या शहराबद्दलसुद्धा मला तुला जे वाटलं तसंच काही तरी वाटतं. ‘गावसंस्कृतीच्या बखरी झाल्या इतिहासजमा’ असं तू म्हणतोस. या बखरी जर एखाद्या  तिऱ्हाईत माणसाने, ज्याचं मन विचलित होत नाही अशा माणसाने लिहून काढल्या असत्या, तर त्यांच्यामध्ये तुला मी जे पाठभेद सुचवू इच्छितोय ते कदाचित भेटले असते; पण ही एकूण कविता प्रभावी आहे. ‘वेदनांनाही भुलवितो मी’ ही कविता म्हणून अत्यंत घाटदार आणि सुंदर आहे. विशेषत: त्यातल्या अखेरच्या चार ओळी वाचून तुझी कवितेची तयारी जोरात सुरू आहे हे कळलं.

विनायक, तुझ्या ‘ना दाद ना फिर्याद’ या बापाची व्यथा आणि वेदना व्यक्त करताना त्याच्या कष्टाचं चीज होत नाही ही खंत तू व्यक्त करतोस. त्यातली ‘न पडणाऱ्या पावसाचा हवाला मनी धरून’ ही ओळ अस्वस्थ करते. बापाचं आणि निसर्गाचं हे युद्ध निसर्ग जिंकणार. कारण ग्लोबल वॉर्निंग सुरू होतंय. त्यात बाप म्हणजे माणूस हरणार. कारण माणूस कितीही रड रड रडला, तरी त्याच्या अश्रूंमुळे त्याच्या कोरडवाहू शेतीचं सिंचन होत नाही, हे प्रखर वास्तव आहे. यावर गाव सोडून शहर जवळ करणे आणि तिथे आपला गाव वसवणे हा एक उपाय दिसतो. माणूस चिवट आहे. तो कुठेही लागतो, कुठेही रुजतो असं मला वाटतं. फक्त त्यासाठी शेतकऱ्यात जी स्वकष्टांबद्दल दुर्दम्य ईर्ष्या असते, ती माणसांनी अंगी बाणावी लागते. पाऊस जेव्हा थांबेल तेव्हा फक्त गावच नाही, तर शहरंसुद्धा उजाड होणार आहेत, हे तू पक्कं समज. त्यामुळे गावसंस्कृतीवर जर दुष्काळाचं सावट येणार असेल, तर त्याच्या दुप्पट सावट शहरांवर येणार. फक्त तो दिवस आपण जिवंत असेपर्यंत येऊ नये असं, फार तर फार, आपल्याला स्वत:च्या मनाशी म्हणता येईल. मानवी अवस्था, मला तरी वाटतं, मग ती गावाकडली असो की शहराकडली, समजावून घ्यायला अत्यंत दुर्घट आहे. त्यावर उपाय अविरत कष्ट म्हणजे काम हेच.

‘वाहाणं मात्र चालू आहे’ या कवितेतला तुझा पवित्रा स्थितप्रज्ञाचा आहे. सगळं भयंकर सुरू आहे आणि कवी ‘तिऱ्हाईताचा उसना चेहरा’ घेऊन स्वत:च्या अपार्थिव शवाकडे पाहतोय. ‘उधळलेला पट’ ही कवितापण मला आवडली. ‘अभावच ते फंडामेन्टल’ या कवितेतलं आत्मभान खूप आवडलं. ‘जगण्याचा पार ढोल झालाय’ ही ओळ प्रभावी आहे. तुझ्या ‘आरेखन’मधली ‘सीमेवरील अजातशत्रूंची विशाल छावणी’ ही शब्दयोजना तुझ्यातली ‘पोएटिक व्हेन’ कशी पक्की आहे हे दर्शवते. ‘भावाच्या मुलीच्या पाचव्या ‘बड्डे’च्या दिवशी’मधलं कौटुंबिकतेचं वर्णन म्हणजे गावात शहरी संस्कार कसे शिरले याचं अत्यंत भेदक वर्णन आहे. गावातलं दारिद्र्य आणि ‘बड्डे’ समारंभातली तफावत अस्वस्थ करते.

मला तुझी सगळ्यात आवडलेली कविता म्हणजे ‘बर्म्युडा चड्डी घालून शीर्षासनं करणारा कवी.’ ही एक अफलातून कविता आहे. ती प्रत्येक कवीने, कथाकाराने, कादंबरीकाराने वाचायला हवी. कवितेतला भंपक कवी हा परदु:खाचं (एके काळी स्वत:चं असलेल्या) मार्केटिंग आपल्या कवितेतून कसा तरबेजपणे करतो आणि किती बेरकेपणे गावाला विसरून शहराला जवळ करतो, हे तू इतकं तीक्ष्णपणे सांगितलं आहेस, की ते वाचताना मला एकाच वेळी हसू येत होतं आणि विषण्ण वाटत होतं. ही तुझी कविता ग्रामीण साहित्यावरची काव्यात्मक समीक्षा आहे, असं मला वाटलं. माणूस भंपक आहे. कवीसुद्धा माणूसच आहे. म्हणून तो भंपक आहे. हे लॉजिक तुला पचवावं लागणार आहे; पण एकूण ही कविता जोरदार जमली आहे.

विनायक, तुझ्या कवितेवर लिहिताना मी बरंच बोलून गेलो. कारण तुझ्या कवितेत संवादशीलता लपलेली आहे. ही कविता तू मला वाचायला दिलीस. ती मी वाचावी म्हणून रिमाइंडर दिलास, म्हणून तुझे आभार मानतो. तू तुझ्या नव्या मुक्कामाचा प्रदीर्घ अभ्यास कर. तुला शब्दांची कमी नाही. भावनांचा ओलावा तुझ्यात आहे. जगाकडे बघण्याची तिरकस नजर आहे. तेव्हा याचा फायदा तुला तुझ्या पुढच्या लिखाणात जरूर होईल.

हे तुझं पुस्तक फारच देखणं आहे. त्याची मांडणी, प्रिंट, पेपर आणि सगळंच काही तुझ्या कवितेला शोभणारं आहे. मला तुझी कविता खूप आवडली. म्हणून लगेच लिहून टाकलं. चल, बाय.

स्नेहांकित,
विश्राम गुप्ते


संपर्क : 
विनायक येवले : ९८८१२ १५८४६
ई-मेल : yewalevinayak@gmail.com 

.............
काव्याग्रह
हे पत्र ‘काव्याग्रह’च्या सप्टेंबर २०१६च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. ‘काव्याग्रह’ हे मराठीतील प्रसिद्ध अनियतकालिक असून, त्याची सुरुवात एप्रिल २०१०मध्ये विदर्भातील वाशिम येथून झाली. विष्णू जोशी हे ‘काव्याग्रह’चे संपादक आहेत. लवकरच ‘काव्याग्रह’ हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधूनही प्रकाशित होणार आहे. ‘काव्याग्रह’मधील निवडक लेख आपल्याला दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील. 

संपर्क : विष्णू जोशी, संपादक, काव्याग्रह 
मोबाइल : ९६२३१ ९३४८०, ७५८८९ ६३२०२
ई-मेल : vishnujoshi@gmail.com
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मोगल अनंत About
खुप सुंदर सर
0
0

Select Language
Share Link
 
Search