Next
माणूसपणाच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न करणारं नाटक
BOI
Friday, June 02, 2017 | 12:45 PM
15 0 0
Share this article:

नाटक हे आपल्या भवताली जे जे पेरलं, उगवलं जातं त्याचा परिपाक असतं. मनस्विनीचं ‘अमर फोटो स्टुडिओ’ हे नाटक आपल्याला असाच काहीसा अनुभव देण्याचा प्रयत्न करतं. ते उसन्या कथेवर बेतलेलं, बेगडी तत्त्वज्ञान सांगणारं, पुस्तकी शिकवण देणारं गोड गोड नाटक नाही. या नाटकाच्या रसास्वादाचा हा दुसरा भाग.
.............
‘अमर फोटो स्टुडिओ’ चालवणारे जे वल्ली काका आहेत ते पुढे नाटकात आपल्या विशिष्ट शैलीत आणि बोलण्याच्या काहीशा विचित्र ढंगात अमर फोटो स्टुडिओ आणि त्याचं महत्त्व सांगतात तेव्हा आपल्या लक्षात येऊ लागतं, की हा स्टुडिओ म्हणजे एक रूपक आहे. कारण शेवटी फोटो म्हणजे काय? तर गोठवलेला काळ, जपलेल्या आठवणी; पण मुळात काळ गोठवता येतो का? आणि जर तसं करता येत नसेल तर आपल्याला कुठल्याही काळातून कुठल्याही काळात प्रवास करता येऊ शकतो. ‘अमर फोटो स्टुडिओ’ चालवणारे काका जे काही विसंगत बोलत राहतात, तेच सुसंगत आहे हे आपल्याला पुढे पुढे कळायला लागतं, हळूहळू पटायला लागतं. ते या नायक आणि नायिकेचा फोटो काढतात खरा, पण त्यातून एक वेगळीच गंमत सुरू होते. ते दोघेही काळाच्या दोन वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये जाऊन पोहोचतात. एक कप्पा असतो तो स्वातंत्र्यपूर्व काळातला आणि दुसरा स्वातंत्र्योत्तर काळातला, आणीबाणीच्या आसपासचा. इथे काळ प्रवास करत नाही, तर हे दोघे प्रवास करून मागच्या काळात जाऊन पोहोचतात, ‘अमर फोटो स्टुडिओ’च्या माध्यमातून. 

नायक पोहोचतो साधारण १९४२च्या काळात जिथे गांधींच्या मागे अख्खा भारत ‘चले जाव’ चळवळीत हिरीरीनं भाग घेतोय आणि त्याच वेळी व्ही. शांताराम यांच्यासारखा चतुरस्र चित्रपटकर्ता समाजाचे वेध घेणारे चित्रपट निर्माण करू लागला आहे. एका अर्थानं सगळं वातावरण हे आदर्शवादानं भरलेलं आहे. आणि नायिका जाते सुमारे १९७०च्या दशकात, जिथे स्वप्नाळू आशावाद जागा आहे आणि तरीही अस्वस्थता आहे; व्यवस्था उलथून टाकण्याची, क्रांती करण्याची ऊर्मी अजून जागी आहे आणि तरीही आणीबाणी आहे; अनिर्बंध जगण्याबद्दल नवं नवं आकर्षण आहे. या दोघांनाही ते ज्या काळात जाऊन पोहोचले आहेत, त्या काळाशी जुळवून घेणं काही वेळ कठीण जातं. २०१७मधून वेगानं मागे जाऊन पडल्यावर तंत्रज्ञान, वेग, भावनाविष्कार, अभिव्यक्ती सगळंच वेगळं; पण तरीही माणसामाणसांतील नात्यांची गुंतागुंत आणि तिढा आहेच. नायक एका चित्रपटाच्या चित्रीकरणस्थळी येऊन पोहोचला आहे. तिथे त्याची गाठ चित्रपटात काम करणाऱ्या नायक-नायिकांशी पडते. नायिका एका इराण्याच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पोहोचलीय, जिथे तिची गाठ गोव्याहून आलेल्या अनंत दिवेकर नामक सत्तरीच्या दशकातील हिप्पी संस्कृती जवळ केलेल्या, उद्विग्न, पण निराश अशा तरुणाशी पडते. आता हे दोघेही या जुन्या काळाच्या नव्या गुंत्यामंध्ये गुरफटून जाऊ लागतात. तिथल्या माणसांच्या गोष्टीचे भाग बनून जायला लागतात. त्यांच्या भाव-भावनांशी यांची गाठ बांधली जाऊ लागते. प्रेमातली उत्कटता विरुद्ध प्रत्यक्ष व्यवहारातले ताण, नात्यातली भावुकता आणि त्यांच्यासमोर उभं ठाकलेलं क्रूर, कटू वास्तव या सगळ्यांशी त्यांची ओळख होते. त्या काळातले झगडे, ताण-तणाव, संघर्ष या सगळ्याला तोंड देणारी त्या काळातली पिढी, त्यांचे प्रश्न, त्यांनी शोधलेली उत्तरं, काही अनुत्तरित प्रश्न या सगळ्याचा एक गुंता या २०१७ सालातल्या नायक-नायिकेपुढे त्यांच्याही नकळत येतो. या सगळ्या गोंधळात आणखी एक भर पडते,.त्यांचे हरवलेले भूतकाळ सापडतात. म्हणजे काय? तर नायिकेला आपले वडील भेटतात. आणि नायकाचेही वडील भेटतात. दोघांच्या जगण्यातील आसक्ती वेगळी, निराशेचे, टिपेचे सूर वेगळे. काळ एकच, पण जगण्याच्या आकांक्षा, जगण्याकडून असलेल्या अपेक्षा वेगवेगळ्या. आणि तरीही दोघेही आपल्या आयुष्यात काहीसे निराश. गोंधळलेले. नायिका तिच्या स्वत:च्या वडिलांना त्यांच्या आयुष्यात भविष्यात काय घडणार आहे हे सांगून सावध करायला उत्सुक आहे; पण ती भविष्यकाळातून भूतकाळात आलीय. आणि भूतकाळात जरी तिला भविष्य माहीत असलं, तरी ते तिच्या वर्तमानात भूतकाळच असणार आहे. त्यामुळे आपल्या वडिलांना भविष्यात घडणाऱ्या अशा एका घटनेबद्दल सांगून सावध करायचा प्रयत्न ती करते, ज्यावर तिचं बालपणातलं भवितव्य एका अर्थानं अवलंबून आहे. अर्थातच तिच्या सूचनेचा काहीच परिणाम होणार नाहीये. काळाच्या गमतीदार आणि तरीही अटळ अशा खेळात नायिका आहे आणि नायकही. त्या काळातल्या नायिकेच्या भावविश्वात नायक प्रवेश करण्याच्या मार्गावर आहे. त्याचं सगळं विचारचक्रच बदलून गेलंय. ते सगळं त्यांना आवडत असतानाच अगदी नकळत का होईना, पण ते जगत असलेला काळ, त्यांना पडणारे प्रश्न आणि त्याचे तिढे ते तपासत जातात. 

एखाद्या भुलभुलैयामध्ये शिरावं, तसे हे दोघे काळाच्या अक्राळविक्राळ जबड्यात शिरलेत. तिथली अद्भुत दुनिया पाहण्यात रमलेत. याचा आनंद आपण घेत असतानाच हळूहळू ‘हे परत जाऊ शकतील ना,’ ‘वेगवेगळ्या काळात जाऊन पडलेल्या या दोघांची परत भेट होऊन शेवट काय होणार’ ही उत्सुकता पुरेशी ताणली जाते. ती तुटायच्या आत संपावी असं वाटून गेल्यावर नाटक शेवटाकडे येतं. शेवटी काय होतं, ते पुन्हा वर्तमानात येतात की नाही, वर्तमानात आल्यावर त्यांनी जिथून सुरुवात केली होती त्या नातं संपवण्याच्या त्यांच्या निर्णयाचं नेमकं काय होतं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतात. ती नाटक प्रत्यक्ष पाहून मिळवण्यातच मजा आहे. 

आपलं जगणं, मागे मागे जात काळाच्या प्रत्येक पायरीवर तपासलं गेलं, तर कदाचित आपल्या जगण्याची, नात्यांची, मूल्यांची किंमत आपल्याला  आपसूपकच कळत जाते का? तशी ती कळली तर आपलं जगणं आणि त्यातले गुंते कमी झाले नाहीत तरी समजून घ्यायला मदत होईल का आणि मग निर्णय घेताना अधिक स्वच्छ आणि साफ दिसेल का? ‘अमर फोटो स्टुडिओ’ ची गरज संपेल का?

‘अमर फोटो स्टुडिओ’ला एक रंजक गोष्ट आहे. सुरुवात, मध्य, शेवट असलेली. त्यात संघर्षबिंदू आहेत, भावनांचे हिंदोळे आहेत, चित्तचक्षू चमत्कारिक असे नाट्यमय प्रसंग आणि नाटकीय हालचाली आहेत; पण यापलीकडे जाऊन हे नाटक काही म्हणू पाहत असावं, असं मला वाटलं. 

माझा अनुभव मात्र असा, की हे इतकं सगळं घडत असताना माझ्यासमोर दिपवून टाकणारे, गडबडा हसायला लावणारे, कधी तंत्राच्या मदतीनं तर कधी नाटकीय तंत्र वापरून सादर केलेले काही प्रसंग इतके आणि एकामागोमाग एक असे भारावून टाकणारे असतात, की आता शेवटाकडे मी नेमकं त्यातलं काय वेचावं हे मला आठवेचना. असं सगळ्यांचंच होईल असं नाही. परंतु शक्यता ही आहे. नाटक खूप काही गोष्टींवर भाष्य करू पाहतं. मनस्विनीनं त्यातल्या काही मुद्द्यांना यापूर्वीही आपल्या नाटकांमधून व्यक्त केलेलं आहेच. इथे ती एक वेगळा चष्मा, जो की फारच आकर्षक आणि मोहक आहे, तो लावून पुन्हा पुन्हा नाती, जगणं, त्या जगण्यातले विरोधाभास, अपरिहार्यता, माणूसपणाच्या खुणा हे शोधण्याचा मन:पूर्वक प्रयत्न करताना दिसते. नाटक हे आपल्या भवताली जे जे पेरलं, उगवलं जातं त्याचा परिपाक असतं. मनस्विनीचं हे नाटक आपल्याला असाच काहीसा अनुभव देण्याचा प्रयत्न करतं. ते उसन्या कथेवर बेतलेलं, बेगडी तत्त्वज्ञान सांगणारं, पुस्तकी शिकवण देणारं गोड गोड नाटक नाही. 

- चिन्मय केळकर

खाली दिलेल्या लिंक्सवर या रसास्वादाचे अन्य भाग वाचता येतील.

पहिला भाग : अमर फोटो स्टुडिओ

तिसरा भाग : आल्हाददायक झुळूक

..................

रंगवाचा त्रैमासिक
‘अमर फोटो स्टुडिओ’ या नाटकाचे हे आस्वादन ‘रंगवाचा’ या केवळ रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी २०१७च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाले आहे. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘रंगवाचा’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. रंगभूमीशी संबंधित वैविध्यपूर्ण विषय या अंकात समाविष्ट असतात. एक हजार रुपये भरून या अंकाचे आजीव पालक होता येते. या अंकातील निवडक लेख दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील. 

संपर्क : वामन पंडित, संपादक (रंगवाचा) - ९४२२० ५४७४४. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search