Next
निराधारांचे ‘आपले घर’
BOI
Thursday, November 16 | 03:45 PM
15 0 0
Share this story

३० सप्टेंबर १९९३ची पहाट लातूर आणि उस्मानाबादमध्ये उजाडली ती एक विनाशकारी थैमान घालत. किल्लारी गावातून डोकं वर काढलेल्या सैतानी भूकंपाने तब्बल ५० गावांना भीषण तडाखा देऊन नऊ हजार सातशे ४८ जिवांचा हा हा म्हणता घास घेतला आणि ३० हजार जणांना जायबंदी केलं. त्या जिवघेण्या संकटातून वाचलेल्यांसाठी अनेकांकडून मदत सुरू झाली. अनाथ, निराधार झालेल्या मुलामुलींसाठी राष्ट्र सेवा दलातर्फे ‘आपले घर’ ही संस्था सुरू करण्यात आली. ‘लेणे समाजाचे’मध्ये आज पाहू या त्या संस्थेविषयी...
...................
लातूर आणि उस्मानाबादमध्ये ३० सप्टेंबर १९९३ रोजी घडलेल्या भूकंपाच्या भीषण आपत्तीमधून कसंबसं उभं राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी घर उभं करून, रोजची भाजीभाकरी मिळवण्यापाठोपाठ दुसरा प्रश्न होता तो मुलामुलींच्या शिक्षणाचा! राष्ट्र सेवा दलाने आसपासच्या १०६ गावांमधल्या २६ हजार मुला-मुलींपर्यंत शाळेचं साहित्य पुरवलं. पुढचा प्रश्न होता तो पूर्ण अनाथ किंवा अर्धअनाथ झालेल्या मुलामुलींचा. त्यांना राहण्यासाठी आणि शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी राष्ट्र सेवा दलाने २४ डिसेंबर १९९३ रोजी साने गुरुजी जयंतीच्या मुहूर्तावर ‘आपले घर’ या संस्थेची उभारणी केली. सुरुवातीला २५० मुलामुलींसाठी तंबू आणि राहुट्यांमध्ये राहण्याची सोय करावी लागली. पुढे दोन वर्षांनी संस्थेने स्वतःची पक्की इमारत बांधली आणि आता तिथेच सर्व शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. 

असं लक्षात येत गेलं, की एखाद्या मुलामुलीचे आई किंवा वडील गेल्यावर, मागे राहिलेल्या एकट्या पालकाला गरिबीमुळे आपल्या पाल्याचा शिक्षणाचा खर्च झेपेनासा होतो आणि परिणामी शिक्षण थांबू शकतं. त्यामुळे जनतेच्या सहकार्यातून आणि पैशाच्या पाठबळाच्या आधारे ‘आपले घर’ ही संस्था अशा मुलामुलींचा आधार बनत आहे. त्यांना स्वयंरोजगारापुरते शिक्षण मिळण्यासाठी संस्था सतत काम करत आहे. थोडेफार अनुदान आहे; पण बराच पल्ला गाठणे अपेक्षित आहे.

एव्हाना गेल्या १३-१४ वर्षांत संस्थेने पक्क्या इमारतीबरोबरच वसतिगृह, वाचनालय, बोअरवेल, सेवकांसाठी घर, भोजनगृह, विश्रामगृह अशा सोयी केल्या आहेत. प्रयोग करता करता काही किमान उत्पन्न मिळू शकेल अशी शेती केली जात आहे. आजपावेतो जवळपास १६०० विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्थेतून पार पडले आहे; पण काही अडचणी आहेत आणि त्यासाठी जनतेकडून सहकार्याची, मदतीची अपेक्षासुद्धा आहे.

मुलांचे प्राथमिक शिक्षण पक्के करण्यसाठी अनुभवी शिक्षकांची गरज आहे. गणवेश, शैक्षणिक साहित्य आणि परीक्षा आणि इतर कामांसाठी पैशांची गरज भासते. बालगृह योजना दहावीपर्यंत असल्याने दहावीनंतर मुला-मुलींच्या पुढच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहू शकतो. त्यासाठी आर्थिक साह्याची आवश्यकता असते. त्यांच्या संगोपनासाठी लागणारा खर्चसुद्धा एकट्या संस्थेला परवडू शकत नाही. त्यासाठीसुद्धा मदतीची आवश्यकता आहे. तिथे राहणारी मुलं-मुली गरिबीमुळे अत्यंत तुटपुंज्या मोबदल्यात भरपूर काम करताना दिसतात. त्यांना कामाचा योग्य मोबदला देण्याची व्यवस्था करण्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे.

दोन कोटी रुपयांचा निधी उभारल्यास त्याच्या व्याजात भोजनाचा खर्च निघू शकेल, अशी संस्थेची कल्पना आहे. त्यासाठी लोकांकडून एकरकमी मोठ्या देणग्या मिळण्याची गरज आहे. 

डॉ. अभिजित वैद्य, झेलम परांजपे, अॅडव्होकेट प्रकाश परांजपे, वसंतराव नागदे, बाबुराव चव्हाण, वैजिनाथ कोरे, संजीव पवार, सदाशिव मगदूम, डॉ. सुरेश खैरनार, जॉर्ज जेकब, विजया बिवलकर अशी मंडळी ‘आपले घर’चे ट्रस्टी आहेत.    

संस्थेतर्फे करण्यात येत असलेले आवाहन:

- जास्तीत जास्त लोकांनी ‘आपले घर’च्या कार्याला सढळ हाताने मदत करून समाजातल्या शोषित, पीडित, दु:खी लोकांशी स्वतःला जोडून त्यांचे अश्रू पुसावेत. 
- सेवावृत्तीने वेळ द्यावा. 
- शैक्षणिक साहित्य, कपडे, गणवेश यांचा भार उचलावा.
- संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून जमेल तशी मदत करावी.
- आपल्या मुला-मुलीचा वाढदिवस संस्थेच्या मुलांबरोबर साजरा करावा किंवा एकरकमी सहा हजार रुपये दिल्यास संस्थेमधल्या मुलामुलींचा एक वेळचा जेवणाचा खर्च सुटू शकेल. 
- संस्थेमधल्या मुला-मुलींच्या धडपडीला प्रोत्साहन द्यावे आणि कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर द्यावी. त्याने बरेच काही साध्य होईल. 

संपर्क : आपले घर प्रकल्प, नळदुर्ग, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद - ४१३६०२ 
मोबाइल : ८८०५० ६३८२४ 
ई-मेल : apleghar94@gmail.com
वेबसाइट : http://www.aplegharnaldurg.org/

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link