Next
बाहुल्यांच्या माध्यमातून भारतीय लोकसंस्कृतीचे दर्शन
लहान-थोरांच्या भावविश्वाचा ठाव घेणाऱ्या कापडी बाहुल्यांचे प्रदर्शन
BOI
Monday, January 14, 2019 | 02:44 PM
15 0 0
Share this article:


पुणे : ‘क्रिएटिव्ह डॉल्स’ आणि ‘संवाद, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील बालगंधर्व कलादालनात कापडी बाहुल्यांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १५ जानेवारी असे तीन दिवस असलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रविवारी (१३ जानेवारी) ज्येष्ठ बालसाहित्यिक ल. म. कडू यांच्या हस्ते झाले. 

या प्रदर्शनाद्वारे तरुण पिढी आणि लहान मुलांना महाराष्ट्राच्या ग्रामीण आणि शहरी जीवनशैलीसह लोककलांचे दर्शन कापडी बाहुल्यांच्या माध्यमातून होणार आहे. १३ ते १५ जानेवारी या कालावधीत हे प्रदर्शन सकाळी १० ते रात्री नऊ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. यंदा या प्रदर्शनाचे दुसरे वर्ष असून या माध्यमातून विविध भाव मुद्रांच्या आणि विविध प्रकारच्या लोकसंस्कृतीवर प्रकाशझोत टाकणाऱ्या विविध प्रकारच्या बाहुल्या आणि बाहुल्यांचे संच पुणेकर रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. 

‘प्रदर्शनात मांडलेल्या केवळ बाहुल्यांच्या प्रतिकृती नसून याव्दारे भारतीय लोककला, संस्कृतीचे जतन केले जात आहे. या प्रदर्शनात बाहुल्यांच्या सेट्सद्वारे उभे केलेले प्रसंग, विविध जाती-धर्मांतील पोषाख परिधान केलेले जोडपे, अशा कैक गोष्टींपासून अलिकडची पिढी तुटत चालली आहे. हे प्रदर्शन म्हणजे सांस्कृतिक धरोहर असून दोन पिढ्यांना जोडणारा सांस्कृतिक दुवा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोरे दांपत्याने ही कला जोपासली हे चांगलेच आहे, परंतु कलेचा हा संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहचवण्याची नैतिक जबाबदारीदेखील त्यांच्या खांद्यावर आहे. हा सांस्कृतिक ठेवा पुढील पिढीमध्येही पाझरणे आवश्यक आहे’, असे मत ल. म. कडू यांनी उद्घाटनपर मनोगतात व्यक्त केले. या वेळी सविता सोमनाथ गोरे, सोमनाथ गोरे आणि 'संवाद, पुणे'चे सुनील महाजन आदी मान्यवर उपस्थित होते. 

या वेळी बोलताना ‘क्रिएटिव्ह डॉल्स’च्या संचालक सविता सोमनाथ गोरे म्हणाल्या, ‘सध्याच्या काळात प्लॅस्टिकच्या किंवा रबरी बाहुल्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. या बाहुल्यांना दिला जाणारा रंग आणि त्यासाठी वापरले जाणारे रबर किंवा प्लॅस्टिक यामुळे पर्यावरणाला बाधा निर्माण होते. त्याचबरोबर या अनैसर्गिक वस्तुंचा मुलानांही मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम भोगावा लागतो. सध्या बाजारात मिळत असलेल्या बाहुल्या, त्यांचे कपडे, दागिने या सगळ्यांतून केवळ पाश्चात्य संस्कृतीचेच दर्शन होते. मुलांना लहान वयातच आपल्या भारतीय संस्कृतीचे दर्शन व्हावे आणि कापडासारख्या पर्यावरणाला पुरक अशा घटकापासून बनवलेल्या खेळण्यांचा प्रचार-प्रसार व्हावा, असा या प्रदर्शनाचा मुख्य हेतू आहे. एक छंद म्हणून गेली १७ वर्षे मी या बाहुल्या बनवत आहे. त्यामधील वैविध्यता आणि वेगळेपणा इतरांनाही पाहायला मिळावा, म्हणून या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे.’  

ताक घुसळणारी, जात्यावर दळणारी, तुळशीची पुजा करणारी अशा अनेक बाहुल्यांबरोबरच जागरण, गोंधळ, वारी, ढोल-ताशा पथक अशा विविध लोककलांमध्ये सहभागी झालेल्या बाहुल्यांचे सामूहिक दर्शन या प्रदर्शनात होत आहे.

‘संवाद, पुणे’चे सुनील महाजन म्हणाले, ‘बाहुल्या हा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. व्यक्ती थोर असो किंवा सर्वसामान्य प्रत्येक व्यक्ती सर्वसाधारणपणे लहानपणी बाहुल्यांशी खेळलेली असतेच. परंतु काळाच्या महिम्यापुढे जवळपास आपले सर्वच पारंपरिक खेळ पडद्याआड जात असून मुले चायना मेड किंवा पाशात्य खेळणी, कर्कश्श आवाज करणारी किंवा बंदूक अशा हिंसात्मक खेळण्यांशी खेळू लागली आहेत. याचा मुलांच्या बालमनावरदेखील विपरीत परिणाम होऊन त्यांची वैचारिक प्रक्रिया चुकीच्या दिशेने जात आहे. घरगुती हलक्या-फुलक्या विषयांत रमणारी मुले आपापसांत भांडताना दिसतात आणि त्यांचे भांडणाचे विषयदेखील पालकांना चिंतेत पाडणारे आहेत. त्यामुळे पालकदेखील लहान मुलांना खेळणी देण्याच्या सशक्त पर्यायाच्या शोधात असतात, तो सशक्त पर्याय या बाहुल्यांच्या प्रदर्शनातून पालाकांना उपलब्ध होईल. लहान मुलांनादेखील बाहुल्यांच्या माध्यमातून मांडलेल्या प्रसंगातून भारतीय लोकसंस्कृती, खाद्य संस्कृतीचा परिचय होऊन याबाबत उत्सुकता निर्माण होण्यास हातभार लागेल.’ 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search