Next
विसंगत विचारांवर मात करा...
BOI
Saturday, September 15 | 06:45 AM
15 0 0
Share this story


विवादित कौटुंबिक वातावरण, नातेसंबंधांतील सततचा तणाव विचारांमधील टोकाची विसंगती या कारणांमुळे घरातील मुलांच्या मनावर नकारात्मक संस्कार होतात. या समस्येची जाणीव कुटुंबातील सर्व सदस्यांना होणं आवश्यक आहे आणि त्यानुसार त्यांनी आपल्या वर्तणुकीवर लक्ष देणंही गरजेचं आहे... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या मानसिक आरोग्याबद्दल...
............................
आठ वर्षांच्या काजलची आई व वडील स्वतःहून वेळ घेऊन भेटीसाठी आले होते. आल्यावर त्यांनी स्वतःची व थोडी कुटुंबाची म्हणजे त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची ओळख करून दिली. काजलचे वडील एका खाजगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत होते. तिची आईही पुर्वी एका छोट्या कंपनीत कामाला होती, पण कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि नोकरी या दोन्ही गोष्टींचा मेळ घालणं अवघड होऊ लागल्यानं तीन वर्षांपूर्वी आईनंही नोकरी सोडून दिली. घरात काजल, तिचे आई-वडिल आणि आजी-आजोबा असे पाच जण राहतात.

काजलची आई सांगत होती, ‘काजलची आजी आजारी असल्याने अंथरुणावरच असते. सासूबाई आणि माझं कधीच पटलं नाही. आमचे नेहमी वाद होतात. मी काही केलेलं, सांगितलेलं त्यांना कधीच पटत नाही. त्यामुळे आई विरुद्ध आजी-आजोबा असा वाद काजल नेहमीच पाहत आली आहे. मी काजलला काही कारणांनी रागावलं, शिक्षा केली तर ते त्यांना अजिबात आवडत नाही. मी रागावलं की ते लगेच तिला जवळ घेतात. तिचे लाड करतात, हट्ट पुरवतात. तिचे बाबाही असंच करतात. सतत मीच चुकीची आहे असं चित्र तिच्यापुढे उभं केलं जातं. त्यामुळे आता तिलासुद्धा माझी किंमत राहिली नाही. ती एवढी लहान असूनसुद्धा मला वाट्टेल तसं बोलते. हल्ली तर ती खोटंही बोलायला शिकलीये. खुप हुशार आहे, पण काही करायचं नसतं तिला. आजी-आजोबांबरोबर सतत टिव्ही पाहत बसते. यावरून तिला जरा रागावलं की मोठ-मोठ्याने रडते. लगेच मग आजी-आजोबा जवळ घेऊन तिचे लाड करतात. मग काय झालंच सगळं तिच्या मनासारखं. प्रत्येक वेळी तिच्या नजरेत आईच वाईट. यालाही किती समजावलं पण हा काही बोलत नाही. सोडून दे, दुर्लक्ष कर.. अशी उत्तरं देतो किंवा मग तिला मारतो. त्यामुळे पुन्हा मीच वाईट ठरते. कंटाळा आलाय मला सगळ्याचा.’ एवढं बोलून आई थांबली, रडायला लागली. हे सारं बोलताना तिचा आवाज खूप वाढला होता. ती खूप चिडली होती. तिला राग अनावर झाला होता. त्यामुळे तिला शांत होऊ दिलं. 

ती शांत झाल्यावर तिच्याकडून तसेच तिच्या पतीकडून इतर आवश्यक माहिती घेतली. काजलच्या वर्तन समस्यांबाबत अधिक सविस्तरपणे जाणून घेतलं व त्यांना पुढील सत्रात काजलची काही निरीक्षणं करून येण्यास सांगितलं. पुढील दोन-तीन सत्रांत झालेल्या चर्चेतून असं लक्षात आलं, की काजलच्या आई-वडिलांचा १०-१२ वर्षांपुर्वी प्रेमविवाह झाला होता. बरेच प्रयत्न केल्यानंतर त्यांना काजल झाली. त्यामुळे अर्थातच सुरुवातीला तिचे खूप लाड झाले, पण ती मोठी झाल्यावर आईने शिस्त लावायला सुरुवात केली. जे आजी-आजोबांना आवडत नव्हतं. तिला रागावलं, मारलं किंवा शिक्षा केली तर त्यांना राग यायचा आणि मग त्यांच्यात वाद व्हायचे. हे काजल लहानपणापासून पाहत होती. त्यातच काजलच्या आईचा स्वभाव खूपच तापट होता, त्यामुळे तिला पटकन राग यायचा. त्यांचा आवाज चढायचा आणि अनेकदा काजलवर हातही उचलला जायचा. अनेक गोष्टी तिला जबरदस्तीने करायला लावल्या जायच्या. त्यामुळे तिला आईचा राग यायचा आणि मग ती मुद्दाम त्रास द्यायची, हट्ट करायची, आई रागावली की आजी-आजोबांकडे जायची. तिथे तिचं सगळंच म्हणणं मान्य व्हायचं. 

या अशा दोन टोकाच्या मिळणाऱ्या वागणुकींमुळे किंवा दोन टोकाच्या शिस्तीच्या प्रकारामुळे आणि घरातले वाद-विवाद, भांडणं यांमुळे काजलच्या वागण्यात ह्या वर्तनसमस्या निर्माण झाल्या होत्या. तिच्या मनातील आईबद्दलचा राग वाढतच चालला होता. तिच्या समस्येमागे कौटुंबिक वातावरण, नातेसंबंधांतील सततचा तणाव विचारांमधील टोकाची विसंगती कारणीभूत होती. या समस्येची जाणीव कुटुंबातील सर्व सदस्यांना होणं आवश्यक असल्यानं पुढील काही सत्रांत आई-बाबा व आजोबांना एकत्र बोलावून कुटुंब समुपदेशन करण्यात आलं. तिच्या वर्तन समस्या कमी होण्यासाठी सगळ्यांमध्ये एकमत असणं, शिस्तीचा समान प्रकार असणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, तिच्यासमोर वारंवार होणारे वाद टाळणं यासाठी प्रत्येकानं काय प्रयत्न करायला हवेत याबाबत अतिशय सविस्तर मार्गदर्शन केले. अपेक्षित बदल होण्यास थोडा वेळ लागला, पण हळूहळू ते बदल झाले. त्यामुळे काजलच्या वागण्यात होणारे बदलही त्यांच्या लक्षात यायला लागले. व हळूहळू काजलच्या समस्यांची तीव्रता कमी होत गेली.

- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link