Next
हिंदुस्थानी वाद्यसंगीताचा वटवृक्ष - आचार्य बाबा अलाउद्दीन खाँ
BOI
Tuesday, September 10, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आचार्य बाबा अलाउद्दीन खाँकलकत्त्याचे उस्ताद अलाउद्दीन खाँ अर्थात आचार्य बाबा अलाउद्दीन खाँ यांनी आपल्या प्रदीर्घ आयुष्यात अनेक मोठमोठे कलाकार घडवले. त्यांचे सुपुत्र उस्ताद अली अकबर खाँ आणि कन्या अन्नपूर्णादेवी, तसेच जावई रविशंकर यांनी त्यांची मैहर घराण्याची शैली आत्मसात करून, हिंदुस्थानी वाद्यसंगीताची परंपरा चालू ठेवली आणि जगभर लोकप्रिय केली. या महाकाय वटवृक्षाच्या अनेक शाखा फोफावल्या. त्यांच्या पारंब्या पुन्हा रुजल्या आणि हा वाद्यवादनाचा वटवृक्ष अनेक अंगांनी बहरला. ‘सूररंगी रंगले’ सदरात मधुवंती पेठे आज सांगत आहेत या ‘वटवृक्षा’बद्दल...
...........
कलकत्त्याचे उस्ताद अलाउद्दीन खाँ हे आचार्य बाबा अलाउद्दीन खाँ या नावानं ओळखले जायचे. अनेक मोठमोठे कलाकार त्यांचे शिष्य आहेत. त्यांच्या शिष्यांची नावं सांगितली, तर मी त्यांना ‘हिंदुस्थानी वाद्यसंगीताचा वटवृक्ष’ असं का म्हटलं, हे सहज लक्षात येईल. सतारवादक रविशंकर, सूरबहारवादक अन्नपूर्णा देवी, सरोदवादक अली अकबर खाँ, शरण राणी, बासरीवादक पन्नालाल घोष, तबलावादक निखिल बॅनर्जी या सर्व सुप्रसिद्ध वादकांचे गुरू म्हणजे बाबा अलाउद्दीन खाँ. 

१८६२ ते १९७२ असं ११० वर्षांचं आपलं प्रदीर्घ आयुष्य बाबा अलाउद्दीन खाँ यांनी वादक कलाकार घडवण्यात खर्ची घातलं. अखेरपर्यंत संगीतमय आयुष्य जगलेले ते भाग्यवान कलाकार होते. असं उदाहरण फार दुर्मीळ. विसाव्या शतकातील श्रेष्ठ गुरू म्हणून संगीत विश्व त्यांना आजही आदरानं संबोधतं. गुरुकुल पद्धतीनं शिष्यांना घडवताना आपले शिष्य बिघडू नयेत म्हणून ते त्यांच्याशी अत्यंत कठोर वर्तन करत असत. अतिशय कडक शिस्तीत आणि कठोर परिश्रमानं त्यांनी हे शिष्य असे घडवले, की त्या शिष्यांनी विविध वाद्यांच्या वादनानं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत जगभर लोकप्रिय केलं. त्याचबरोबर अनेक वादक शिष्य कलाकारांची पुढची फळी घडवली. 

पूर्व बंगालमधील शिवपूर (आताचा बांग्लादेश) येथे जन्मलेल्या बाबांचं पुढचं वास्तव्य कलकत्त्यात होतं. निरनिराळ्या गुरूंकडून त्यांनी परिश्रमपूर्वक विद्या मिळवली. कलकत्त्याचे गोपालकृष्ण भट्टाचार्य यांच्याकडून त्यांनी बारा वर्षं त्यांनी तालीम घेतली. त्यानंतर ते वाद्यसंगीताकडे वळले. स्वामी विवेकानंदांचे चुलत बंधू अमृतलाल दत्त (कलकत्त्याच्या स्टार थिएटरचे डिरेक्टर) यांच्याकडून ते अनेक देशी-विदेशी वाद्यं वाजवायला शिकले. मुळात बारा वर्षं संगीताची तालीम घेतलेली असल्यामुळे सरोद, सतार, बासरी, मेंडोलिन, बेंजो, सनई अशी अनेक वाद्यं वाजवण्यात ते माहीर झाले; पण त्या काळी ते सरोदवादक म्हणून प्रसिद्ध होते. 

मध्य प्रदेशातील मैहर संस्थानात ‘दरबारी संगीतकार’ म्हणून ते काही काळ राहिले होते. त्या काळात त्यांनी अनेक रागांमध्ये गती (रचना - कम्पोझिशन्स) रचल्या आणि आपल्या खास वादनशैलीचं स्वतंत्र घराणं तयार केलं. ते घराणं ‘मैहर घराणं’ या नावानं संगीतविश्वात प्रचलित झालं. 

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि संगीत नाटक अकादमीची फेलोशिप या सन्मानांचे ते मानकरी होते. १९३५पासून त्यांनी उदय शंकर यांच्या ग्रुपबरोबर युरोप, अमेरिकेत अनेक दौरे केले. १९५५मध्ये त्यांनी मैहरमध्ये संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. १९६०च्या दशकात त्यांनी ‘आकाशवाणी’साठी अनेक रेकॉर्डिंग्ज केली. 

उस्ताद अली अकबर खाँ

त्यांचे सुपुत्र उस्ताद अली अकबर खाँ आणि कन्या अन्नपूर्णादेवी, तसेच जावई रविशंकर यांनी त्यांची मैहर घराण्याची शैली आत्मसात करून, हिंदुस्थानी वाद्यसंगीताची परंपरा चालू ठेवली आणि जगभर लोकप्रिय केली. या महाकाय वटवृक्षाच्या अनेक शाखा फोफावल्या. त्यांच्या पारंब्या पुन्हा रुजल्या आणि हा वाद्यवादनाचा वटवृक्ष अनेक अंगांनी बहरला. 

उस्ताद अली अकबर खाँत्यांचे सुपुत्र सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ आणि सतारवादक पं. रविशंकर यांनी १९४४ साली अलाहाबाद येथील संगीत महोत्सवात ‘संगीत क्षेत्रातील वाद्यवादनाची पहिली जुगलबंदी’ रसिकांसमोर सादर केली. त्यानंतर दोघांनी जगभर जुगलबंदीचे अनेक कार्यक्रम करून हिंदुस्थानी वाद्यसंगीत जगभर लोकप्रिय केलं. दोघांनीही परदेशात संगीत विद्यालयं काढली. 

उस्ताद अली अकबर यांनी १९५६ साली कलकत्ता येथे ‘कॉलेज ऑफ म्युझिक’ सुरू केलं. परंतु १९६७मध्ये ते अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे स्थायिक झाल्यानं तिकडेही त्यांनी कॉलेज सुरू केलं. पुढे स्वित्झर्लंडमधेही त्या कॉलेजची शाखा निघाली. आपल्या सरोदवादनाच्या मैफलींबरोबरच त्यांनी जगभर अनेक शिष्य तयार केले. 

अन्नपूर्णादेवी

अन्नपूर्णादेवी 
बाबा अलाउद्दीन खाँ यांच्या कन्या व शिष्या अन्नपूर्णादेवी यांनीही आयुष्यभर संगीत सेवा केली. मैहर संस्थानच्या महाराजांनी त्यांचं अन्नपूर्णा हे नाव ठेवलं होतं. रोशन आरा हे त्यांचं मूळ नाव. आपल्या वडिलांकडून त्यांनी सतारवादनाची तालीम घेतली; पण नंतर सतारीसारखंच दिसणारं आणि रुद्रवीणावादनाचं तंत्र असलेलं सूरबहार हे वाद्य त्यांनी आपलंसं केलं. सूरबहारवादक म्हणूनच त्या प्रसिद्ध झाल्या होत्या. आपल्या वडिलांचेच शिष्य, सतारवादक पं. रविशंकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्या वेळी त्या सूरबहारवादनाचे स्वतंत्र कार्यक्रम करत होत्या. १९४६ ते १९५५ या कालावधीत रविशंकर यांच्या सतारवादनाबरोबर जुगलबंदीचे कार्यक्रमही त्यांनी केले; पण पुढे मैफली करण्यात त्यांना रस वाटेनासा झाला. त्या फार मनस्वी कलाकार असल्यानं आपल्या वादनाचे कार्यक्रम करून पैसे मिळवणं म्हणजे देवी सरस्वतीला विकणं, अशी त्यांची भावना होती. 

पं. रविशंकर आणि अन्नपूर्णादेवी जुगलबंदी...पण कार्यक्रम करणं सोडल्यानंतर मात्र त्यांनी विद्यादानाचं कार्य आयुष्यभर केलं. आपल्या मैहर घराण्याच्या वादनशैलीची तालीम त्यांनी अनेकांना दिली. त्यांना वादनतंत्र शिकवलं. त्यांचा सुपुत्र शुभेंद्र, बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया, नित्यानंद हळदीपूर, सतारवादक कार्तिककुमार, सरोदवादक पं. आशिष खान हे त्यांचे शिष्य. ‘संगीत क्षेत्रातल्या पहिल्या महिला वादन गुरू’ म्हणून आजही त्यांचं नाव आदरानं घेतलं जातं. 

पं. रविशंकर
आपल्या सतारवादनाद्वारे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रसार करून, हे रागसंगीत जगभर लोकप्रिय करण्याऱ्या कलाकारांमध्ये पं. रविशंकर यांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे. कारण त्यांनी लोकप्रिय केलेल्या हिंदुस्थानी संगीतातल्या रागसंगीताचा वापर पाश्चात्य संगीतकार त्यांच्या रचनांमध्ये करू लागले, ही फार महत्त्वाची गोष्ट म्हणाली लागेल. पं. रविशंकर यांच्या कार्याविषयी पुढील भागात जाणून घेऊ या. 

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search