Next
मेरी आवाज सुनो...
BOI
Sunday, May 27 | 06:45 AM
15 0 0
Share this story

पं. जवाहरलाल नेहरू आणि कैफी आझमी‘सुनहरे गीत’ सदरात दर वेळी आपण कोणा चित्रपट कलावंताबद्दल नि त्याच्या गीताबद्दल माहिती घेत असतो. आजच्या भागात मात्र आपण माहिती घेणार आहोत पं. नेहरू यांच्याशी संबंधित असलेल्या चित्रपटगीताची. हे गीत लिहिले आहे प्रसिद्ध गीतकार कैफी आझमी यांनी. आज (२७ मे) पं. नेहरूंचा स्मृतिदिन आहे. तसेच, कैफी आझमी यांचा स्मृतिदिनही नुकताच (१० मे) होऊन गेला आहे. त्या निमित्ताने आज आस्वाद घेऊ या ‘मेरी आवाज सुनो’ या गीताचा...
.......
आज २७ मे अर्थात स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा स्मृतिदिन. त्यांचे निधन २७ मे १९६४ रोजी झाले होते. तसेच, सुप्रसिद्ध गीतकार कैफी आझमी यांचा स्मृतिदनही नुकताच होऊन गेला.  १० मे २००२ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. या दोन महान व्यक्तिमत्त्वांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘सुनहरे गीत’च्या आजच्या भागात काही गोष्टी पाहू या. ‘सुनहरे गीत’च्या नियमित वाचकांना माहिती आहे, की या सदरात चित्रपट कलावंतांबद्दल वाचायला मिळत असते. असे असताना पं. नेहरूंचा या सदरात उल्लेख कसा काय? पं. नेहरू हे केवळ देशभक्त किंवा राजकीय नेते नव्हते, तर ते एक उत्तम लेखक आणि वाचक होते. महत्त्वाचे म्हणजे ते रसिक होते आणि चित्रपटसृष्टीशी परिचित होते. देविकाराणी ही त्यांची आवडती नटी होती. १९५२मध्ये भारतात भरलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामागे नेहरूंचीच प्रेरणा होती.

त्या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी पं. नेहरू स्वतः हजर होते. हॉलिवूडचे काही कलावंतही त्या वेळी उपस्थित होते. अर्थातच जास्त गर्दी चित्रपटताऱ्यांच्या भोवती होती. त्या वेळी पं. नेहरू खुर्चीवर बसून राहिले असताना एक मजेशीर प्रसंग घडला होता. नेहरूंनी त्या वेळी शेजारी बसलेल्या व्यक्तीशी बोलायला सुरुवात केली. त्या व्यक्तीला नाव विचारले. त्या व्यक्तीने मिश्कील स्वरूपात, मात्र खरे उत्तर दिले. तो म्हणाला, ‘जे तुमच्या वडिलांचे नाव आहे ते...’ हे उत्तर ऐकल्यावर नेहरू क्षणभर स्तंभित झाले; पण जेव्हा त्यांच्या लक्षात आले, की आपण कोणाशी बोलत आहोत, तेव्हा मात्र ते मनापासून, खळखळून हसले. ती व्यक्ती होती सुप्रसिद्ध अभिनेते मोतीलाल!

जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीचा रौप्यमहोत्सव झाला, तेव्हा चित्रपट निर्माते चंदूलाल शहा यांनी मुंबई येथे एक मोठा समारंभ आयोजित केला होता. त्यासाठी पं. नेहरू खास उपस्थित राहिले होते. या कार्यक्रमात सी. रामचंद्र यांनी ‘तलाक’ चित्रपटातील ‘बचके रहना छुपे हुए गद्दारों से’ हे गीत सादर केले होते. ते गीत ऐकून पं. नेहरू प्रभावित झाले आणि त्यांनी त्या गीताच्या गीतकारांचे नाव आणि पत्ता आपल्या सेक्रेटरीला लिहून घेण्यास सांगितले. त्या गीताचे गीतकार होते कवी प्रदीप. तत्पूर्वी त्यांनी सी. रामचंद्र यांना विचारले होते, ‘हे गीत सिनेमातील आहे का?’ त्यावर ‘होय’ असे उत्तर येताच ‘सिनेमासाठी अशी गाणीही लिहिली जातात,’ असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. 

अशा या नेहरूंबद्दलचे थेट गीत कोणत्याही चित्रपटासाठी लिहिले गेले नव्हते. परंतु, नेहरू आपणाशी बोलतात, असा भावार्थ असलेले, अर्थात नेहरूंच्या मनाचे बोल असलेले गीत गीतकार कैफी आझमी यांनी लिहिले होते. तो चित्रपट होता ‘नौनिहाल.’

१९६७मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट वेगळ्या कथेवरील एक सामाजिक चित्रपट होता. बलराज सहानी, इंद्राणी मुखर्जी, संजीवकुमार हे कलावंत त्यामध्ये होते; पण त्या चित्रपटाचा मुख्य नायक होता मा. बबलू हा बालनट! चित्रपटाचे शीर्षकही त्याच्याशी संबंधित होते. ‘नौनिहाल’ म्हणजे एक लहान रोप किंवा त्या शब्दाचा अर्थ बालक असाही आहे, संगीतकार मदनमोहन आणि गीतकार कैफी आझमी यांनी त्या चित्रपटासाठी सात गाणी दिली होती. त्यापैकी एका गीतात पडद्यावर चित्रपटाच्या कथानकाच्या अनुषंगाने आपल्याला पं. नेहरूंची अंत्ययात्रा दिसते. आपणातून निघून जाणारे नेहरू, आपणा सर्व भारतीयांना, विशेषतः मुलांना सांगत असतात.... मोहम्मद रफींच्या आवाजात आपण ते ऐकत असतो....

मेरी आवाज सुनो, प्यार का राज सुनो
मैंने एक फूल जो सीने पे सजा रखा था
उस के परदे में तुम्हे दिल से लगा रखा था
जुदा सबसे मेरे इश्क का अंदाज बनो

माझा आवाज (अर्थात माझ्या मनीचे भाव) ऐका. (माझ्या) प्रेमाचे रहस्य जाणून घ्या (त्याची खोली जाणून घ्या) (अरे) मी माझ्या छातीवर (अर्थात कोटावर) जे एक फूल नेहमी लावत असे ना, त्या फुलाच्या रूपात मी तुम्हाला पाहात असे. माझ्या अंतःकरणात तुम्हीच तर होतात. इतर सर्वांपेक्षा माझी ही प्रेमाची रीत वेगळी होती. ती तुम्ही जाणून घ्या!

गीताची ही अशी सुरुवात होते. नेहरूंच्या कोटावर नेहमीच गुलाबाचे फूल असे व मुलांबद्दल त्यांना ममत्व होते. या सगळ्याचा विचार करून कैफी आझमींनी हे ध्रुवपद लिहिले आहे. हे गात असताना मोहम्मद रफींनी ‘अंदाज’ हा शब्द अशा खुबीने उच्चारला आहे, की या गीताची गोडी त्यामुळे शतपटीने वाढते. नेहरूंचा स्वभाव, त्यांची सुरू असणारी अंत्ययात्रा आणि त्या वेळी दु:खी झालेले लोक या सगळ्याचा विचार करून लिहिलेले हे पहिले कडवे किती भावपूर्ण आहे ते बघा...

जिंदगीभर मुझे नफरत रही अश्कों से
मेरे ख्वाबों को तुम अश्कों मे डूबोते क्यूँ हो?
जो मेरी तरह जिया करते है कब मरते हैं
थक गया हूँ मुझे सो लेने दो, रोते क्यूँ हो?
सो के भी जागते ही रहते है, जाँबाज सुनों...

आयुष्यभर मला अश्रूंबद्दल (म्हणजे काहीही न करता रडत बसणाऱ्यांबद्दल किंवा सारखे सारखे रडणाऱ्यांबद्दल) तिटकारा होता (आणि मग) तरीही तुम्ही माझ्या स्वप्नांना (विशाल प्रगत भारताचे स्वप्न) अश्रूंत बुडवून का टाकता? जे माझ्याप्रमाणे (म्हणजे माझ्या विचारसरणीने, धडाडीने) जगतात ते कधी मरण पावतात का? (नष्ट होतात का?) मी जरा दमलो आहे, थकलो आहे, थोडा वेळ मला झोपू दे. (मी काही मरण पावलेलो नाही. कारण) जे बहाद्दूर, शूर (जाँबाज) असतात ते झोपले, तरी जागेच असतात, जागृत असतात. 

पं. नेहरूंनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताला प्रगत बनवण्याबरोबरच पंचशील तत्त्वांनी सर्व मानवजात सलोख्याने, प्रेमाने एकत्र राहण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याच्या अनुषंगाने पुढील कडवे लिहिताना कैफी आझमी कशी छान रचना करतात बघा...

मेरी दुनिया में न पूरब है न पश्चिम कोई
सारे इन्सान सिमट आये खुली बाहों में
कल भटकता था मैं जिन राहों में तनहा तनहा
काफिले कितने मिले आज उन्ही राहों में
और सब निकले मेरे हमदम हमराज सुनो...

माझ्या जगात पूर्व-पश्चिम असा भेद नाही. (मानवतेच्या दृष्टीने) मी पुढे केलेल्या हातामध्ये (हात मिळवून) सर्व एकत्र येतील. या माझ्या विचारसरणीने मी कालपर्यंत एकटाच चालत होतो; पण आज या वाटचालीत याच विचारांच्या लोकांचे किती जथ्थे जमा झाले आहेत, बघा! ते सारे माझे सहचर, सहविचारी मित्र आहेत. 
आणि या पुढे काय घडेल तर.....

नौनिहाल आते है अर्थी को किनारे कर लो
मै जहाँ था उन्हे जाना है वहाँ से आगे
आसमाँ इनका, जमीं इन की, जमाना इन का
है कोई इन के जहाँ मेरे जहाँ से आगे
इन्हे कलियाँ ना कहो ये चमन साज सुनो

नवीन पिढी येते तेव्हा जुन्या पिढीला बाजूला सारून त्या नवीन पिढीला स्थान द्यावे लागते आणि याच विचारांच्या अनुषंगाने गीतकार लिहितात, की ही लहान रोपटी, रोपे (अर्थात बालके) येत आहेत (त्यांना जागा देण्यासाठी, प्रगतीला वाव देण्यासाठी) माझा प्राण देलेला देह (अर्थी) बाजूला सारा. किनाऱ्यावर नेऊन ठेवा. मी जेथे थांबलो तेथून त्यांना पुढे जायचे आहे. अर्थात माझे कार्य त्यांना पुढे न्यायचे आहे. आता हे (कर्तृत्वाचे) आकाश, भूमी व जमाना (काळ) त्यांचा आहे. माझ्या स्वप्नांपेक्षा, माझ्या जगापेक्षा त्यापुढेही त्यांची स्वप्ने असतील (त्यांचे) जग असेल. (अरे यांना केवळ) कळ्या समजू नका, तर हे भविष्यात बगीचा फुलवणारे आहेत.

आणि अखेरच्या कडव्यात... अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचते तेव्हा तेथील वातावरण, वस्तू, साहित्य बघून पं. नेहरू विचारतात....

क्यूँ सवारी है ये चंदन की चिता मेरे लिये
मैं कोई जिस्म नहीं हूँ के जलाओगे मुझे
राख के साथ बिखर जाऊँगा मैं दुनिया में
तुम जहाँ खाओगे ठोकर वही पाओगे मुझे
हर कदम पर हैं नए मोड का आगाज सुनो...

ही चंदनाची चिता माझ्यासाठी का सजवली आहे? (अरे) मी म्हणजे फक्त एक शरीर नाही, की ज्याला तुम्ही जाळून टाकाल (मी म्हणजे एक विचारधारा आहे) (आणि मला जाळले, तरी) जगात मी राखेच्या रूपाने सर्वत्र पसरेन. जेथे तुम्हाला अडचणी, संकटे येतील, तेथे मी, माझे विचार तुम्हाला उपयोगी पडतील. (हे लक्षात ठेवा, की) प्रत्येक पावलावर एका नव्या वळणाची (मोड) सुरुवात, प्रारंभ (आगाज) असतो.

नेहरूंच्या मृत्युपत्रातील इच्छेचा आधार घेऊन केलेली या शेवटच्या कडव्यातील रचना कैफी आझमींची उच्च प्रतिभा दर्शवते. मदन मोहन यांची चाल, संगीत गीतालाच नव्हे, तर आपल्या मनालाही बांधून ठेवते. हिंदी चित्रपटात अशीही गीते लिहिली गेली होती. असा होता तो सोनेरी काळ आणि त्यातील ‘सुनहरी’ गीते!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link