Next
‘जिवाभावाचे मित्र ही खूप मोठी शक्ती’
प्राची गावस्कर
Monday, September 24, 2018 | 09:45 AM
15 0 0
Share this article:

प्रचंड वाचन, सडेतोड स्वभाव आणि संवेदनशीलता यांसाठी प्रसिद्ध असलेले संजय मोने आपल्या उत्तम अभिनयामुळे गेली अनेक वर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. पु. ल. देशपांडे यांच्या लिखाणावर निस्सीम प्रेम करणारे संजय मोने सध्या एका हिंदी वाहिनीवरील मालिकेत ‘पुलं’ची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या जीवनातील सकारात्मकतेचा वेध घेणारी ही मुलाखत... ‘बी पॉझिटिव्ह’ सदराच्या आजच्या भागात...
................
- तुमच्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचे स्रोत कोणते?
- माझ्या आयुष्यातील सकारात्मक ऊर्जेचे स्रोत म्हणजे माझे आई-वडील, माझी बायको, माझी मुलगी आणि माझे मित्र. माझे आई-वडील आता नाहीत. मित्र हे माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठे ऊर्जास्रोत आहेत. पाच-सहाच मित्र आहेत; पण १९७७पासून आम्ही सगळे नियमितपणे भेटतो. नाटकाच्या दौऱ्यावर किंवा परगावी गेलो असेन तर भेट होत नाही; पण तेवढाच अपवाद; पण त्यापैकी किमान कोणीही दोघे तरी भेटतातच. कोणीही एकमेकांना भेटलेच नाही, असे आजवर झालेले नाही. ते कायम जिवंत ठेवतात. जिवाभावाचे हे मित्र म्हणजे खूप मोठी शक्ती. 

- अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा कशामुळे मिळाली?
- मूलतः मी खूप लाजाळू होतो, भीती वाटायची. मी एका एकांकिकेत काम केले, तेव्हा लक्षात आले, की समोर अंधार आहे. मला बिनधास्त बोलता येतेय. त्यामुळे औषध म्हणून मी नाटकाकडे वळलो. माझी आई संस्कृत नाटकांमधून काम करायची. माझे वडील काही वर्षे काम करत होते. माझे आजोबा म्हणजे आईचे वडील पूर्वी स्त्री भूमिका करायचे. माझ्या आजीचे लांबचे भाऊ शंकर घाणेकर उत्तम लेखक होते. माझ्या वडिलांकडेही या क्षेत्राशी संबंधित खूप लोक येत असत. त्यामुळे कुठे तरी आकर्षण होते; पण त्याहीपेक्षा माझ्या लाजाळू स्वभावावर उपाय म्हणून मी नाटकांत काम करायला लागलो. मग पुढे मालिका, चित्रपट ओघाओघाने आलेच. 

- तुमच्या आयुष्यात निराशेचा प्रसंग आला, तर तुम्ही तो कसा हाताळता?
- मी कधीही निराश होत नाही. मी वाचत असतो, मित्रांबरोबर असतो, इकडे-तिकडे पाहत असतो. त्यामुळे मला वेळच नसतो निराश व्हायला. त्यातूनही कधी वाटले उदास, तर ते वाचनाने वगैरे नाही जात. आपणच विचार केला, आपल्याशी संवाद साधला तर आपोआपच निराशा दूर होते. वाचन, लेखन याने निराशा दूर होत असती, तर वर्तमानपत्रवाले कधीही निराश झाले नसते. 

- तुमचे आवडते लेखक कोण आहेत?
- पु. ल. देशपांडे आहेतच. त्याशिवाय श्री. ना. पेंडसे, मिलिंद बोकील, जयवंत दळवी, द. मा. मिरासदार, शंकर पाटील, इरावती कर्वे, रा. रं. बोराडे, भारत सासणे... किती नावे सांगू. सगळेच आवडतात. श्री. ना.पेंडसे यांनी किती सुंदर लिहिले आहे. प्रत्येक पान रंगवून लिहायचे म्हणजे कमाल आहे. आपल्या संतांनीही खूप चांगले लिखाण केले आहे. 

- तुम्हाला आवडलेल्या स्वतःच्या भूमिका कोणत्या?
- माझे काम असे म्हणून नाही, पण लेखनातून उत्तम उतरलेल्या काही भूमिका मला आवडतात. त्यापैकी एक आहे ‘लव्हबर्डस्’ नावाचे नाटक. ते मी अगदी सुरुवातीला केले होते. त्यात एका गुप्तहेराची भूमिका होती. ती मला खूप आवडते. त्यानंतर पहिल्यांदा आलेल्या ‘व्यक्ती आणि वल्ली’मध्ये मी बहुरूपे साकारली होती.

- सकारात्मक पद्धतीने आयुष्य जगण्यासाठी काय सांगाल?
- आयुष्य असे जगले पाहिजे ना, की मजा आली पाहिजे. ताणतणावांना तोंड दिले पाहिजे. पाठ दाखवणे हे उत्तर नाही. तुम्ही पाठ दाखवली, तरी अडचणी समोर येतातच. त्यामुळे एकदा त्यांचा सामना करून सोक्षमोक्ष लावा. मनात काय आहे ते बोलून मोकळे व्हा. आणखी एक गोष्ट, समोरच्याचा माणूस म्हणून विचार करा. त्याची जात, धर्म, रंग, उंची याचा विचार न करता प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघा. 

(‘बी पॉझिटिव्ह’ हे सदर ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर सोमवारी प्रसिद्ध होते. त्यातील सर्व मुलाखती https://goo.gl/gfcuAb या लिंकवर उपलब्ध आहेत. संजय मोने यांच्या मुलाखतीचा व्हिडिओही सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
कुलकर्णी About 296 Days ago
हिंदी सिरीयलचे नाव
0
0
Hemant sabne About 296 Days ago
Spachless really great
0
0

Select Language
Share Link
 
Search