Next
तेजीचा कल पाहून शेअर खरेदीत वैविध्य हवे
BOI
Sunday, August 19, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this article:

गेले काही दिवस भारतीय शेअर बाजाराचे दोन्ही प्रमुख निर्देशांक तेजीतच असल्याचे दिसून आले आहे. कंपन्यांचे जून तिमाहीचे उत्तम निकाल हे त्याचे प्रमुख कारण आहे. आगामी काळातही शेअर बाजारात तेजीचाच कल कायम राहणार आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात ....
.......
आर्थिक सुधारणांचा पाया घालणारे अजातशत्रू अटलबिहारी वाजपेयींनी १६ ऑगस्टला शेवटचा श्वास घेतला. या लोकोत्तर पुरुषाला प्रथम आदरांजली. शुक्रवारी (१७ ऑगस्ट २०१८) मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) ३७ हजार ९४८ अंशांवर, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) ११ हजार ४७० अंशांवर बंद झाला. गेल्या आठवड्यात सेन्सेक्सने ३८ हजारांची सीमा ओलांडली, तर निफ्टीदेखील ११ हजार ४९५पर्यंत वाढला होता.

गेल्या आठवड्यात स्वातंत्र्यदिनाची सुट्टी असल्याने बाजार चारच दिवस होता; पण जून २०१८च्या तिमाहीचे आकडे उत्तम असल्याने तेजी कायम आहे आणि ती तशीच राहील.

‘दिवाण हाउसिंग’चा शेअर गेल्या आठवड्यात ६७८ रुपयांपर्यंत वाढला. जून २०१८ तिमाहीचे त्या कंपनीचे आकडे उत्तम होते. तो शेअर वर्षभरात ८०० रुपयांपर्यंत वाढू शकेल. या तिमाहीसाठी तिची विक्री ३१४९.६७ कोटी रुपये होती व करोत्तर नफा ४३५ कोटी रुपये होता. जून २०१७ तिमाहीची विक्री २४९५.९४ कोटी रुपये होती व निव्वळ नफा ३२२ कोटी रुपये होता. हा शेअर भागभांडारात जरूर हवा. कारण तो दर वर्षी २२ ते २५ टक्के वाढत असतो.

हेग इंडस्ट्रीज या कंपनीची जून २०१८ तिमाहीची विक्री ३८०३ कोटी रुपये झाली. निव्वळ नफा ४५८.३ कोटी रुपये झाला. अपेक्षेपेक्षा तो ५० टक्के जास्त आहे. त्यामुळे शेअरला ‘अप्पर सर्किट’ लागून, तो २३० रुपयांपर्यंत पोहोचला. या शेअरचे गेल्या बारा महिन्यांतील कमाल व किमान भाव अनुक्रमे ४७५ रुपये व १३२ रुपये होते. अजूनही तो घेतला, तर वर्षभरात ३० ते ३५ टक्के नफा सहज देऊन जाईल. सध्याच्या भावाला किं/उ गुणोत्तर ८०.०७ पट इतके आकर्षक आहे.

ग्राफाइट इंडिया व हेग इंडस्ट्रीज हे शेअर्स १७ ऑगस्टला अनुक्रमे १०९७ रुपयांवर व ४२४३ रुपयांवर बंद झाले. हे शेअर्स वर्षभरात अनुक्रमे १४०० व ५४०० रुपये भाव गाठण्याची शक्यता आहे. हे शेअर भागभांडारात अजून वर्ष, सव्वा वर्ष तरी जरूर हवेत.

पूर्वी लिहिल्याप्रमाणे पेट्रोलियम क्षेत्रातील दर्जेदार कंपन्यांचे म्हणजेच ओएनजीसी,  ऑइल इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन व भारत पेट्रोलियम हे शेअर्स भागभांडारात हवेत. युरोप व अमेरिकेत सप्टेंबरनंतर थंडी सुरू होते. तेव्हा क्रूड ऑइलचे भाव वाढतात. त्याचा फायदा सप्टेंबर व डिसेंबर तिमाहीसाठी या कंपन्यांना व्हावा. वरील पाच-सहा शेअर्समुळे भागभांडारात वैविध्यही येईल; मात्र गुंतवणूक प्रत्येकाने आपापल्या जोखमीवर करायला हवी.

डॉ. वसंत पटवर्धन   
(लेखक ‘बँक ऑफ महाराष्ट्र’चे माजी अध्यक्ष आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search