Next
भातशेतीत साकारले चापडा सापाचे चित्र
श्रीकांत इंगळहळीकर यांचा सलग चौथ्या वर्षी ‘पॅडी आर्ट’चा अनोखा प्रयोग
BOI
Saturday, September 21, 2019 | 12:41 PM
15 0 0
Share this article:

श्रीकांत इंगळहळीकर यांनी ‘पॅडी आर्ट’द्वारे भातशेतीत साकारलेला चापडा साप

पुणे : निसर्गाच्या कुशीत अनेक प्राणी, पक्षी, जीव राहतात. त्यांचेच चित्र निसर्गाच्या ‘कॅनव्हास’वर चितारण्याचा अनोखा प्रयोग पुण्यातील हौशी वनस्पतिशास्त्रज्ञ श्रीकांत इंगळहळीकर गेली तीन वर्षे करत आहेत. ‘पॅडी आर्ट’ अर्थात भातशेतीतील चित्रांच्या त्यांच्या प्रयोगाच्या चौथ्या वर्षी यंदा त्यांनी चापडा जातीच्या सापाचे १२० बाय ७० फूट आकारातील भव्य चित्र साकारले आहे. हिरव्या रंगाखेरीज त्रिकोणी डोके आणि अगदी कमी जाडीची मान हे वैशिष्ट्य असणारा हा साप कारवीच्या झुडुपात सापडतो.  


सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील फुलांच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेले इंगळहळीकर यांनी पुण्याजवळील गोऱ्हे बुद्रुक येथे असलेल्या आपल्या शेतात ही कलाकृती साकारली आहे. व्यवसायाने उद्योजक असलेल्या इंगळहळीकर यांनी जपानमधील ‘पॅडी आर्ट’ प्रथमच पुण्यात आणले. त्यांनी यापूर्वी गणपती, काळा बिबट्या आणि पाचू कवडा या कलाकृती या माध्यमातून साकार केल्या होत्या. 


‘‘पॅडी आर्ट’मध्ये जमिनीचा एका ‘कॅनव्हास’सारखा वापर केला जातो आणि विविध रंगांतील भाताची रोपे लावून रंगसंगती साधली जाते. जोराच्या पावसात गुडघाभर पाण्यात उभे राहून दोन रंगांच्या भातपिकाची पेरणी करणे हे आव्हानात्मक काम असते. येत्या काही वर्षांत काळा गरुड, मलबार ग्लायडिंग बेडूक यांसह सह्याद्रीच्या जंगलातील दुर्मीळ प्राणी, पक्षी आणि इतर जिवांच्या प्रतिमा या माध्यमातून साकार करण्याचा मानस आहे,’ असे इंगळहळीकर यांनी सांगितले.

‘माथेरान, भीमाशंकर, महाबळेश्वर, कोयना, आंबोली आणि गोवा अशा सावलीच्या जंगलात चापडा साप दिसतात. उंदीर, सरडे, झाडावरील बेडूक हे त्याचे खाद्य असते,’ अशी माहितीही त्यांनी दिली. 

श्रीकांत इंगळहळीकर
‘पॅडी आर्ट’ या कलेविषयी : 
दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्यात असलेल्या इनाकादाते या गावात ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. या भागात वर्षानुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते. काही वर्षांपूर्वी या भातशेतीला दोन हजार वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तेथील शेतकऱ्यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून ‘पॅडी आर्ट’ अर्थात ‘टॅम्बो अटा’ ही कला १९९३मध्ये जपानमध्ये लोकप्रिय झाली. 

या गावात होणाऱ्या या उत्सवाची माहिती श्रीकांत इंगळहळीकर यांना इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली आणि त्यापासून प्रेरित होऊन त्यांनी सिंहगड रस्त्यावरील डोणजे फाटा येथे असलेल्या आपल्या ‘लेक्सॉन विंडर्स’ या कंपनीच्या आवारात या ‘पॅडी आर्ट’द्वारे भव्य गणपती व काळा बिबट्या साकारला होता. इंगळहळीकर यांनी साकारलेले ‘पॅडी आर्ट’ उंचावरून आणखीच खुलून दिसत असून, त्यामुळे पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी ते एक आकर्षण ठरते आहे. जवळजवळ डिसेंबर महिन्यापर्यंत हे ‘पॅडी आर्ट’ पाहता येणार आहे.

(रानफुले, निसर्ग, तसेच अन्य संबंधित विषयांवरील श्रीकांत इंगळहळीकर यांची पुस्तके बुकगंगा डॉट कॉमवरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search