Next
‘अभ्यासक्रमासोबत मूल्यशिक्षण महत्त्वाचे’
फडणवीस यांच्या हस्ते सिंघानिया विद्यालयाचे उद्घाटन
प्रेस रिलीज
Friday, June 07, 2019 | 12:56 PM
15 0 0
Share this article:


ठाणे : ‘सर्वोत्तम शिक्षण पद्धती, समर्पित भावनेने काम करणारा शिक्षक वृंद याबाबीवर अधिक लक्ष केंद्रित केल्याने सिंघानिया विद्यालयांतील शिक्षणाचा दर्जा उत्तम झाला आहे. म्हणून सिंघानिया विद्यालय हा एक ब्रॅंड बनला आहे. शालेय शिक्षणात अभ्यासक्रमासोबतच मूल्यशिक्षणही महत्त्वाचे असते. त्यामुळे स्वतःचा विकास करताना समाज आणि राष्ट्राचाही विचार विद्यार्थ्यांच्या मनात रुजविला जातो, हा विचार रुजविण्याचे काम राज्य शासनाचा शिक्षण विभाग राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधून करीत आहे,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

येथील श्रीमती सुनितीदेवी सिंघानिया विद्यालयाचे उद्घाटन सहा जून २०१९ रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, महापौर मीनाक्षी शिंदे, राजेश फाटक, मनपा आयुक्त संजय जयस्वाल, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, लोकमतचे मुख्य संपादक विजय दर्डा, रेमंड उद्योगसमुहाचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, कल्पना सिंघानिया, नवाज सिंघानिया, प्राचार्य तथा संचालक रेवती श्रीनिवासन यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


प्रारंभी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ फडणवीस यांच्या हस्ते फित कापून शाळेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर कोनशिला अनावरण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी विद्यालयाच्या वर्गांची पाहणी केली. तेथेच विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर करून मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी विद्यार्थ्यांनी गणेशवंदना सादर केली.

फडणवीस म्हणाले, ‘राज्यात इयत्ता आठवीपर्यंत सर्व शाळांमध्ये मराठी भाषा ही सक्तीची आहे; मात्र मराठी ही केवळ सक्ती म्हणून नव्हे, तर स्वेच्छेने शिकावी. मराठी ही प्राचिनतम भाषांपैकी एक असून, ती अत्यंत समृद्ध भाषा आहे. सर्व विद्याशाखांमधील ज्ञान या भाषेत उपलब्ध आहे. त्यामुळे तिचा अभ्यास केल्याने आपण ज्ञानसमृद्ध होऊ या इच्छेने ही भाषा शिकावी, अशी माझी इच्छा आहे. देशात २५ वर्षांपर्यंतच्या वयोगटाची लोकसंख्या अधिक आहे. या वयोगटाला चांगले शिक्षण मिळाले, तरच देश उत्तम मानव संसाधन म्हणून तयार होऊ शकेल. आज देशाला या लोकसंख्येला उत्तम मानव संसाधनात परावर्तित करण्याच्या शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन अभ्यासक्रमासोबतच मूल्यशिक्षण दिले जाते. त्याच बरोबर शासनाने शिक्षणासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने राबविलेल्या धोरणांमध्ये योग्य बदल केल्याने पूर्वी महाराष्ट्र शिक्षणाच्याबाबतीत देशात १७व्या क्रमांकावर असलेले आपले राज्य आज देशात तिसऱ्या क्रमांकावर आले आहे आणि ते लवकरच पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.’


‘खरे म्हणजे प्रत्येक बालकात शिक्षण घेण्याची उपजत इच्छा असते; मात्र त्यासाठी उत्तम शिक्षक, योग्य शिक्षण पद्धती, शिक्षणाच्या साधनांची आवश्यकता असते. एकदा का बालकाला शिक्षणरूपी छिन्नी हातोड्याचा स्पर्श झाला की, त्यातील सुजाण नागरिकरूपी शिल्प आपोआप साकारते. त्यासाठी आता आम्ही जिल्हा परिषद शाळांमधून डिजिटल शिक्षणाची सुरुवात केली आहे. येत्या काळात राज्यातील १०० जिल्हा परिषद शाळा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा करण्याचा आमचा मानस असून, तसे प्रयत्न सुरू आहेत,’ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
 
या कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्र्यांसह सर्व मान्यवरांच्या शाळेच्या लहान लहान विद्यार्थ्यांनी रोपटी भेट दिली. त्यावर बोलताना फडणवीस यांनी मुलांनी दिलेली रोपटी आठवण म्हणून जपू, ती लावून वाढवू, जश जशी मुले मोठी होतील तशी ही रोपटीही मोठी होतील, असे सांगितले.


शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, ‘शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. शिक्षणाची पद्धती आता केवळ वाचणे, ऐकणे आणि समजणे इतपत न राहू देता ती आता विश्लेषण, मूल्यमापन आणि निर्मिती या त्रिसूत्रीवर आधारलेली असावी. या विद्यालयातील विद्यार्थी नोकरी व्यवसाय म्हणून जे काही करायचे ते करेल पण तो या देशाचा एक चांगला नागरिक असेल. केवळ गुणांसाठी शिक्षण हा विचार बदलण्याची गरज आहे.’

उद्योगमंत्री देसाई यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात सिंघानिया स्कूलच्या शाळा असाव्या. प्रत्येक जिल्ह्यात रेमंडचा एक उद्योग आणि एक शाळा सुरू करण्याचे तसेच प्रत्येक विद्यालयाने प्रत्येक इयत्तेत मराठी भाषा स्वतःहून शिकवण्याचे आवाहन केले.


गौतम सिंघानिया यांनी प्रास्ताविक करून सिंघानिया विद्यालयांच्या कामगिरीची माहिती दिली. या प्रसंगी लोकमतचे मुख्य संपादक विजय दर्डा यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य रेवती श्रीनिवासन यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थिनी काव्या व्यंकटेश हिने सूत्रसंचालन केले. वंदे मातरम् गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search