Next
‘सदस्यता अभियानात भाजप समाजाच्या सर्व घटकांना जोडणार’
राष्ट्रीय सदस्यता अभियान प्रमुख शिवराज सिंह चौहान यांची माहिती
प्रेस रिलीज
Friday, June 28, 2019 | 11:34 AM
15 0 0
Share this article:

मुंबई : ‘लोकसभा निवडणुकीतील अभूतपूर्व विजयानंतर भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा संघटनेच्या विस्तारासाठी सज्ज झाला असून, सदस्यता अभियानामार्फत भाजप समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, अल्पसंख्य, प्रगत, मागास, गरीब, श्रीमंत अशा सर्व घटकांना पक्षाबरोबर जोडून घेईल,’ असे भाजप सदस्यता अभियानाचे राष्ट्रीय प्रमुख व मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले.

चौहान पक्षाच्या सदस्यता अभियानासाठी देशव्यापी प्रवास करत असून, त्यांनी गुरुवारी (२७ जून) मुंबईत भाजपच्या महाराष्ट्रातील सदस्यता अभियानाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी भाजप महाराष्ट्र सदस्यता अभियान संयोजक व प्रदेश सरचिटणीस आमदार डॉ. रामदास आंबटकर, सहसंयोजक व प्रदेश सचिव संजय उपाध्याय आणि प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.

चौहान म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची रणनिती आणि पक्षाच्या लाखो कार्यकर्त्यांचे परीश्रम यामुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत असाधारण व अभूतपूर्व असे यश मिळाले. तथापि, या यशावर पक्ष संतुष्ट नाही. ज्या राज्यांमध्ये भाजपचे सरकार नाही अशा पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, केरळ अशा राज्यांत पक्षाचे सरकार सत्तेवर आणायचे आहे; तसेच महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे विजयाचे मताधिक्य वाढवायचे आहे आणि महायुतीला २२०पेक्षा अधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यासाठी भाजपने पुन्हा एकदा संघटनेचा नव्याने विस्तार करण्याची मोहीम सुरू केली आहे.’

‘भाजपचे सदस्यता अभियान सर्वस्पर्शी म्हणजेच समाजाच्या सर्व घटकांना जोडणारे असेल; तसेच हे अभियान सर्वव्यापी म्हणजेच देशाच्या प्रत्येक भौगोलिक क्षेत्रात आणि प्रत्येक बूथमध्ये भाजपचे सदस्य जोडणारे असेल. महाराष्ट्रातील ९५ हजार बुथपैकी प्रत्येक बूथमध्ये भाजपचे सदस्य असले पाहिजेत आणि या वेळी प्रत्येक बूथमध्ये ५० नवे सदस्य जोडले पाहिजेत, असे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रात गेल्यावेळी एक कोटी सात लाख भाजप सदस्य झाले होते. या वेळी त्यापेक्षा ५० टक्के अधिक सदस्य करण्याचे उद्दिष्ट प्रदेश भाजपने ठरविले आहे,’ अशी माहिती चौहान यांनी दिली.

‘भाजपचे सदस्यता अभियान सहा जुलैला सुरू होईल. पंतप्रधान मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब पाटील-दानवे यांच्यासह पक्षाचे सर्व नेते विविध ठिकाणी अभियान सुरू करतील. हे अभियान ११ ऑगस्टपर्यंत चालेल. महाराष्ट्रात २० हजार शक्तीकेंद्रांमध्ये विस्तारक जातील व ते सात दिवस घरोघर जाऊन सदस्य जोडतील. सदस्यतेसाठी मिस्ड कॉल देण्याबरोबरच सदस्यांची सविस्तर माहिती घेतली जाईल,’ असे त्यांनी सांगितले.

‘मध्य प्रदेशात भाजप लोकसभा निवडणुकीत २९ पैकी २८ जागा व ५८ टक्के मते मिळाली आहेत. तेथे काँग्रेसचे राज्य सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वत्र हाहाकार माजला आहे. काँग्रेसने कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले नाही. सचिवालय दलालांचा अड्डा झाला असून, प्रत्येक कामाचे दर ठरले आहेत. या सरकारपासून जितक्या लवकर सुटका होईल तितके चांगले असे जनतेला वाटते; पण आम्ही काँग्रेसचे सरकार अस्थिर करणार नाही. ते सरकार आपल्याच ओझ्याखाली कोसळले, तर काही सांगू शकत नाही,’ असे एका प्रश्नाला उत्तर देताना चौहान म्हणाले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search