Next
‘महिलांचं मानसिक सक्षमीकरणही अत्यंत आवश्यक’
मानसी मगरे
Friday, March 08, 2019 | 08:30 AM
15 0 0
Share this article:

दीप्ती पन्हाळकर‘महिलांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक गोष्टींवर जास्त भर दिला जातो. परंतु महिलांचं मानसिक सक्षमीकरणही तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याशिवाय त्या सक्षम बनू शकत नाहीत,’ असे पुण्यातील मानसशास्त्रज्ञ आणि कॉर्पोरेट ट्रेनर दीप्ती पन्हाळकर यांना वाटते. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पन्हाळकर यांची मुलाखत...
.........................................

महिलांच्या मानसिक सक्षमीकरणासाठी नेमकं काय करणं आवश्यक आहे, असं तुम्हाला वाटतं?
- महिला सक्षमीकरण या संकल्पनेला खूप कंगोरे आहेत. सक्षमीकरण ही संकल्पना मांडताना बऱ्याचदा केवळ आर्थिक सक्षमीकरण म्हणजे सर्वार्थानं सक्षमीकरण असा विचार केला जातो. परंतु मला वाटतं, की सक्षमीकरणाचा सर्वांगानं विचार झाला पाहिजे. सर्वप्रथम त्या स्त्रीला याबाबत नेमकं काय वाटतं, हे जाणून घेणं आवश्यक आहे. ती स्वतःबद्दल, तसंच इतरांबद्दल काय विचार करते, याचा विचार झाला पाहिजे. आज बहुतांश स्त्रिया ज्या खूप चांगल्या पगाराची नोकरी करतात, त्यांना बाहेर मान-सन्मान आहे. परंतु घर, ऑफिस, मुलं हे सगळं सांभाळून हे करत असताना त्या आतून एका खूप मोठ्या मानसिक ताणाचा सामना करत असतात. बहुतेक वेळा त्यांनी स्वतःच स्वतःसाठी अनेक गोष्टी ठरवून दिलेल्या असतात आणि त्या स्वतःच्याच बंधनात त्या जगत असतात. नोकरी करणारी स्त्री खूप काही तरी ‘ग्रेट’ करते आणि गृहिणी फक्त घरीच असते हा एक खूप मोठा गैरसमज महिलांमध्येच मोठ्या प्रमाणात दिसतो. एखाद्या गृहिणीला, ‘तुम्ही काय करता’ असा प्रश्न केला, तर ती अगदी पटकन म्हणून जाते, ‘काहीच नाही.. मी घरीच असते.’ गृहिणी असणं हे इतकं सोपं कसं ठरवता येईल..? घरात राहूनही त्या खूप काही करत असतात, कदाचित नोकरी करणाऱ्या स्त्रियांपेक्षाही जास्त काम करत असतात. तेव्हा हा एक खूप मोठा नकारात्मक दृष्टिकोन महिलांच्याच मनात असतो. तो त्यांनी बदलला पाहिजे. अशी अनेक उदाहरणं देता येतील. महिलांची विचारप्रक्रिया आणि त्यांची कृती यामध्ये असलेली ही एक खूप मोठी पोकळी आहे. खरं तर या सगळ्यांत स्वतःचे महत्त्व ओळखून महिलांनी नात्यांसकट आपल्या सगळ्या भूमिका आनंदानं जगल्या पाहिजेत. असं झालं, तर ती स्त्री इतर स्त्रियांनाही यातून सक्षम करू शकते. आजूबाजूच्या इतर स्त्रियांचा दृष्टिकोनही ती बदलू शकते. तुम्ही स्वीकारलेली जबाबदारी ही ‘बाय चान्स आहे, की बाय चॉइस आहे,’ हे आधी तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. हे ठरवता आलं, तर पुढच्या अनेक मानसिक प्रक्रिया सुकर होतात. 

मानसिक सक्षमीकरणासाठी कोणत्या गोष्टींची जाणीव आवश्यक आहे, असं वाटतं?
- स्त्रियांची मानसिक क्षमता या दृष्टीने जर सक्षमीकरण या मुद्द्याचा विचार केला, तर एक गोष्ट अगदी जाणीवपूर्वक आपल्याला मान्य केली पाहिजे, की निसर्गानं स्त्री आणि पुरुष यांची रचना करताना, त्यांच्या मानसिक क्षमता वेगवेगळ्या ठेवल्या आहेत. दोघांमध्येही त्यांचं स्वरूप आणि प्रकार भिन्न आहे. असंच भावनिक क्षमतेच्या बाबतीतही म्हणता येईल, की तीदेखील भिन्न आहे. एका नव्या जिवाला जन्म देण्याची क्षमता स्त्रीमध्ये आहे, हे लक्षात घेऊनच तिची जडणघडण झालेली आहे. त्यामुळे यासाठी लागणाऱ्या भावनिक, मानसिक आणि शारीरिक क्षमता या तिच्यात पुरुषांपेक्षा वेगळ्या आहेत. याची जाणीव ठेवून त्याचा आदर केला पाहिजे. केवळ सर्व गोष्टी करता आल्या पाहिजेत किंवा त्या करून दाखवल्या पाहिजेत याचा अट्टाहास ठेवताना अशा काही गोष्टींची जाणीव ठेवली पाहिजे आणि त्यानुसार स्वतःला तयार केलं पाहिजे. मी हे करू शकत नाही.. मला हे जमत नाही... मी यासाठी समर्थ नाही, अशी समजूत करून घेण्यापूर्वी आपल्या या मर्यादांचा आणि नैसर्गिक जडणघडणीचा विचार जरूर केला पाहिजे. दुसरी आवश्यक गोष्ट आहे, ती म्हणजे छंद जोपासला पाहिजे किंवा सकारात्मक गोष्टी वाचल्या, ऐकल्या, पाहिल्या पाहिजेत. व्यायाम करताना, आपलं रोजचं काम करताना चांगल्या काही टिप्स देणाऱ्या ऑडिओ क्लिप्स ऐकू शकतो, वाचू शकतो. ज्यामुळे सतत सकारात्मक विचारांमध्ये राहता येईल आणि निराशेपासून किंवा तशा विचारांपासून स्वतःला दूर ठेवता येईल. 

स्त्री-पुरुष समानता नेमकी कोणत्या पातळीवर पाहिली गेली पाहिजे?
- स्त्री-पुरुष समानता या संकल्पनेचा माझ्या नजरेतून अर्थ काय, असं विचारलं, तर मी सांगीन, की कोणत्याही एका गोष्टीकडे स्त्री आणि पुरुषाने समान नजरेनं पाहणं. समानता म्हणजे केवळ तुम्ही सारखे कपडे घालणं, एकमेकांच्या सवयींची कॉपी करणं किंवा तो असा आहे, तर मीही तसंच असायला हवं, असं वाटणं हे नक्कीच नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. दुसरीकडे, स्त्री आहे, म्हणजे तिच्यात काहीतरी कमी आहे ही भावना खुद्द स्त्रियांचीही असल्याचं अनेकदा दिसतं. यावरून तयार झालेली मानसिकता केवळ आपल्या घरातच नाही, तर समाजातही मोठ्या प्रमाणात दिसते. अशा वेळी स्त्रीनं आधी स्वतःच्या विचारांनी स्वतःचं सक्षमीकरण करणं जास्त आवश्यक आहे. आता ही समानता घरातून आधी सुरू झाली पाहिजे. घरातल्या कामांची विभागणी असेल, बाहेरची कामं असतील किंवा मग निर्णय घेण्याचे अधिकार असतील, या सगळ्यांमधील समानतेबाबत तुम्ही तुमच्या घरातून कशी सुरुवात करताय, हे जास्त महत्त्वाचं आहे. असं झाल्यास आपोआपच समाजातही हा बदल होत जाईल. समानता म्हणजे एकमेकांवर कुरघोडी करणं नव्हे, तर सामंजस्यानं आणि सामोपचारानं एकमेकांच्या हातात हात घालून आनंदी वाटचाल करणं म्हणजे समानता असं मी म्हणेन. केवळ पोशाखात, कामात, अधिकारात समानता असायला हवी याचा हट्ट धरणं म्हणजे समानता नाही. अशी समानता कोणत्याही प्रकारे तुम्हाला सक्षम बनवत नाही. तेव्हा स्त्री-पुरुष या नात्याला कोणत्याही पातळीवर सामोरं जाताना केवळ वरवरच्या गोष्टींमधल्या समानतेचा अट्टाहास न धरता एकमेकांच्या विचारांमधली आणि वागण्यातली समानता लक्षात घेतली, तर गोष्टी अधिक सुकर होतील, असं वाटतं.

(दीप्ती पन्हाळकर यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search