Next
वयावर मात करत खेळणारा नितीन
BOI
Friday, September 14, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

नितीन कीर्तनेटेनिसमधील इंडियन एक्स्प्रेस म्हणून ओळखले जाणारे लिअँडर पेस आणि महेश भूपती यांच्याच काळात आणखी एक खेळाडू भारतात नावारूपाला आला, तो म्हणजे नितीन कीर्तने. प्रशिक्षक म्हणून काम करत असताना वयावर मात करत नितीन एक खेळाडू म्हणूनही सातत्याने विविध स्पर्धेत यशस्वी होत आहे.... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या टेनिसपटू-प्रशिक्षक ‘नितीन कीर्तने’बद्दल...
...............................
जिथे इतर खेळाडूंनी खेळाडू म्हणून आपली कारकीर्द यशस्वी करत आता भारतीय टेनिसमध्ये पदाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे, तिथे याच खेळाडूंच्या बरोबरीचा असणारा नितीन कीर्तने प्रशिक्षक म्हणून काम करत असताना एक खेळाडू म्हणूनही सातत्याने विविध स्पर्धेत यशस्वी होत आहे. एकीकडे वय वाढत असतानाही त्याची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे. 

कोलकाता येथे झालेल्या ‘आयटीएफ कोलकाता साउथ क्लब सीनियर टेनिस (ग्रेड ४) अजिंक्यपद’ स्पर्धेत पुण्याच्या नितीन कीर्तनेने ३५ वर्षांवरील एकेरीचे विजेतेपद मिळविले. ‘बंगाल टेनिस संघटने’च्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेत एकेरीत नितीनने अंतिम फेरीत राजस्थानच्या सहाव्या मानांकित रियाझ अहमदला फारशी संधी न देता त्याचा ६-१, ६-२ असा पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. उपांत्य फेरीत चौथ्या मानांकित नरेंद्रसिंग चौधरीवर नितीनने ६-२, ६-० असा सरळ विजय मिळवला. विजेत्या नितीन कीर्तनेला ६० आयटीएफ गुण व दहा हजार रूपयांचे पारितोषिक मिळाले. यंदाच्या मोसमातील त्याचे हे दुसरे विजेतेपद आहे. दुहेरीत नितीन कीर्तने व सिद्धार्थ वर्मा या जोडीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली; तर उपांत्यपूर्व फेरीत सिद्धार्थला दुखापत झाल्याने त्यांना माघार घ्यावी लागली.

१९९२मध्ये व्यावसायिक टेनिसमध्ये पाय ठेवल्यापासून नितीनने आश्चर्यकारक यश मिळवले आहे. १९९२मध्ये महेश भूपतीसह त्याने विम्बल्डनच्या बॉईज गटात उपविजेतेपद मिळवले होते.  स्थानिक पातळीवर स्पर्धा खेळत असताना त्याने राष्ट्रीय स्तरावरही त्यावेळी आपली मोहर उमटवली होती. त्यातूनच त्याला आंतरराष्ट्रीय सामने तसेच डेव्हिस करंडक स्पर्धेसाठी निवडले गेले. यातील कामगिरी पाहून त्याची अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत बॉईज गटात निवड झाली. त्यावेळी लिअँडर पेस आणि महेश भूपती यांची कारकीर्द अत्यंत भरात होती. मात्र भूपती कीर्तनेसह या स्पर्धेत उतरला होता आणि उपविजेतेपदापर्यंत त्यांनी मारलेली मजल निश्चितच कौतुकास्पद होती.  

पूढे महेश भूपती आणि लिअँडर पेस यांची जोडी जमल्यानंतर नितीन कीर्तने काहीसा मागे पडला, परंतू त्याने जिद्द न सोडता आपला खेळ सुरूच ठेवला. देशातील आणि परदेशातील विविध स्पर्धांमध्ये तो सहभागी होत राहीला आणि आजवर शेकडो पदके आणि पुरस्कार त्याने मिळवले आहेत. देशातील विविध खेळाडूंसमोर नितीन कीर्तनेने एक आदर्श निर्माण करून ठेवला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी नितीनला फार कमी मिळाली, तरी निराश न होता त्याने आपला खेळ आणि त्यावरील आपले प्रेम तसूभरही कमी होऊ दिले नाही. हाच वस्तूपाठ त्याने नवोदितांसमोर ठेवला आहे.  

एकीकडे स्वतःची प्रशिक्षण अकादमी सांभाळताना दुसरीकडे विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची त्याची आवड हीच नितीनची जमेची बाजू आहे. आज त्याच्या अकादमीत अनेक खेळाडू शिकत आहेत, नावारूपाला येत आहेत. त्यांतील काही खेळाडू विविध स्तरांवर कीर्तनेसारखेच यशही मिळवत आहेत. हेच त्याच्या प्रशिक्षणाचे व अकादमीचे यश आहे. वयाची चाळीशी पार करूनही जी तंदुरुस्ती आणि चपळता नितीनने जपली आहे, तोच आदर्श इतर खेळाडूंसाठी सर्वाधिक प्रेरणादायी ठरत आहे. ज्या वयात खेळाडू खेळ सोडून केवळ प्रशिक्षणावर लक्ष केंद्रीत करतात त्या वयात नितीन स्पर्धाही खेळतो आणि आपल्या अकादमीत हाच अनुभव नवोदितांना देतो. त्यांच्यातून अधिकाधिक खेळाडू देशासाठी तयार करण्याचा तो सातत्याने प्रयत्न करत आहे.

प्रत्येक खेळाडूची कारकीर्द कधी ना कधी तरी संपणारच असते, मात्र कीर्तनेसारखे खेळाडू हीच कारकीर्द अधिकाधिक लांबवून जास्तीत जास्त अनुभव मिळवत त्याचा उपयोग आपल्या अकादमीत शिकणाऱ्या नवोदित खेळाडूंसाठी देत असतात. नितीनसारखे खेळाडू देशात अधिकाधिक संख्येने पूढे आले तर जागतिक टेनिसमध्ये भारताचा दबदबा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही...

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search