Next
विक्रम साराभाई, सेसिल डमिल
BOI
Sunday, August 12, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई आणि अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल यांचा १२ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
..... 
विक्रम साराभाई 

१२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबादमध्ये जन्मलेले विक्रम अंबालाल साराभाई हे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार आणि प्रमुख खगोलशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन क्षेत्रात भारताचा दबदबा निर्माण होण्यात त्यांचं प्रचंड योगदान आहे. बेंगळुरूमधल्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स’मध्ये त्यांना सर सी. व्ही. रमण यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणांवर संशोधन करण्याची संधी मिळाली. पुढे त्यांनी त्याच विषयाच्या संदर्भात ब्रिटनमध्ये जाऊन डॉक्टरेट मिळवली. १९४७ साली त्यांनी अहमदाबादला फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली. पुढे केरळमध्ये थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लाँचिंग स्टेशनची स्थापना केली. तिथून भारताच्या क्षेपणास्त्रांचं प्रक्षेपण केलं जातं. त्यांच्या प्रयत्नांतून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (अहमदाबाद), नेहरू फाउंडेशन फॉर डेव्हलपमेंट, अहमदाबाद टेक्स्टाइल इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन अशा अनेक उत्तमोत्तम संस्थांचा जन्म झाला. खगोलशास्त्रातल्या त्यांच्या भरीव योगदानाची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय खगोल संघटनेकडून चंद्रावरच्या एका मोठ्या विवराला ‘साराभाई क्रेटर’ असं नाव देण्यात आलं आहे. ३० डिसेंबर १९७१ रोजी त्यांचा मृत्यू झाला. भारत सरकारने १९७२ साली त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान देऊन त्यांचा गौरव केला.
.... 

सेसिल डमिल

१२ ऑगस्ट १८८१ रोजी मॅसाच्युसेट्समध्ये जन्मलेला सेसिल डमिल हा अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष मानला जातो! स्वतः अभिनेता आणि दिग्दर्शक असणाऱ्या डमिलने मूकपटांपासून बोलपटांपर्यंत ७०हून अधिक सिनेमे बनवले. भव्यदिव्य सिनेमे बनवण्याबद्दल तो प्रसिद्ध होता. त्याचे ‘क्लिओपाट्रा’, ‘सॅमसन अँड डलायला’, ‘दी टेन कमांडमेंट्स’ हे सिनेमे त्यांतल्या भव्यतेमुळे लोकांच्या मनांत आजही घर करून आहेत. जेस लास्की आणि सॅम्युअल गोल्डविन यांना बरोबर घेऊन त्याने पॅरामाउंट पिक्चर्स ही कंपनी काढली. मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ - असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत. २१ जानेवारी १९५९ रोजी त्याचा कॅलिफोर्नियामध्ये मृत्यू झाला.

यांचाही आज जन्मदिन :
‘एमटी आयवा मारू’चे लेखक अनंत सामंत (जन्म : १२ ऑगस्ट १९५२) 
प्रसिद्ध कवी फ. मुं. शिंदे (जन्म : १२ ऑगस्ट १९४८) 
प्रसिद्ध इंग्लिश कवी, लेखक रॉबर्ट साउदी (जन्म : १२ ऑगस्ट १७७४, मृत्यू : २१ मार्च १८४३) 
यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. 
भारताचा गाजलेला आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू प्रवीण ठिपसे (जन्म : १२ ऑगस्ट १९५९)

(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search