मुंबई : भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सिटी बँक आणि नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्टस् (एनसीपीए) यांच्या वतीने भारतीय शास्त्रीय संगीताच्या उच्च शिक्षणासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीसाठी (ख्याल, धृपद, तबला, पखवाज) अर्ज मागविण्यात आले आहेत. विजेत्यांना एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या कालावधीत साडेसात हजार रुपये प्रती महिना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
अर्जामध्ये विद्यार्थ्यांनी आपले नाव, जन्मतारीख, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, शिक्षणासंबंधी माहिती, ई-मेल आयडी, संगीत शिक्षकांचे नाव, संगीत शिक्षणाचा एकूण कालावधी, पारितोषिके, पुरस्कार, इतर शिष्यवृत्ती, कार्यक्रमांच्या सादरीकरणांबद्दल माहिती आदी तपशील लिहावा. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना ई-मेल किंवा दूरध्वनीद्वारे कळविण्यात येणार आहे. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांना फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रत्यक्ष सादरीकरणासाठी मुंबईतील ‘एनसीपीए’ येथे यावे लागेल. ‘एनसीपीए’ समितीचा निर्णय अंतिम असेल.
ख्याल, तबला, पखवाज यासाठी अर्जादाराचे वय १ मार्च २०१९ पर्यंत १८ ते ३० वर्षे, तर धृपदासाठी १८ ते ३५ वर्षे अशी वयोमर्यादा राहील. ज्या विद्यार्थ्यांना एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात अन्य शिष्यवृत्ती किंवा संगीत शिक्षणासाठी अन्य आर्थिक मदत प्राप्त होत असेल, ते विद्यार्थी, व्यावसायिक गायक आणि वादक, तसेच ज्या विद्यार्थ्यांना ‘ऑल इंडिया रेडियो’ अर्थात आकाशवाणीतर्फे ‘अ’ श्रेणी प्रदान करण्यात आली असेल, त्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार नाही. केवळ भारतीय नागरिकत्व असलेल्या विद्यार्थ्यांनाच या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे.
३१ डिसेंबर २०१८ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून, त्यानंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.
अर्ज पाठविण्यासाठी पत्ता : ‘सिटी-एनसीपीए’ संगीत शिष्यवृत्ती (हिंदुस्थानी संगीत), नॅशनल सेंटर फॉर दी परफॉर्मिंग आर्टस्, नरिमन पॉइंट, मुंबई ४०००२१.
दूरध्वनी क्रमांक : (०२२) ६६२२ ३८७२/३७३७ (सोमवार ते शुक्रवार, सकाळी १०.३० ते एक आणि दुपारी दोन ते ५.३०)
ई-मेल : ncpascholarships@gmail.com