Next
‘विद्यार्थ्यांना नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनवले पाहिजे’
व्यंकय्या नायडू यांचे मत
BOI
Wednesday, February 06, 2019 | 05:39 PM
15 0 0
Share this article:


हैद्राबाद : ‘विद्यार्थ्यांना नोकरी करणारे नव्हे तर नोकरी देणारे बनवले पाहिजे,’ असे मत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हैद्राबाद येथे एका कार्यक्रमात व्यक्त केले.  ‘कौशल्याधारित प्रशिक्षण देण्याची सुविधा प्रत्येक उच्च शिक्षण संस्थेत निर्माण केल्यास आपण आपल्या देशातील विद्यार्थ्यांना नोकरी करणारे नव्हे, तर नोकरी देणारे बनवू शकतो. यासाठी योग्य ती व्यवस्था निर्माण करणे गरजेचे आहे,’ असेही नायडू यांनी नमूद केले. डॉ. डी. रामा नायडू विज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे विद्यार्थी आणि विज्ञान ज्योती संस्थेच्या सदस्यांना संबोधित करताना ते बोलत होते. 

नायडू पुढे म्हणाले, ‘ जी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाचा सामना करण्यासाठी सक्षम करत असते. समानता आणि स्थिर वृत्तीने जगण्यासाठी बळ देते. ती आदर्श शिक्षण संस्था असते. विद्यार्थ्यांना आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करताना मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रत्येक शिक्षणसंस्थेने समुपदेशकाची नियुक्ती करणे आवश्यक आहे.’

विज्ञान ज्योती संस्थेने शिक्षणक्षेत्रासाठी काही करण्याची इच्छा असलेल्या दानशूर व्यक्तींचा एक समूह बनवला आहे. त्याचे कौतुक करून नायडू म्हणाले, ‘ नीतीमत्ता, मुल्ये, तत्वे यांचा पाया बळकट असलेला समाज घडविण्यासाठी शिक्षणसंस्थांनी पाया घातला पाहिजे. आपल्या शिक्षण व्यवस्थेने जागतिक पातळीवरील स्पर्धेला तोंड देण्यासाठी आपला दर्जा उंचावला पाहिजे. आपल्या देशातील एकही विद्यापीठ जागतिक पातळीवरील शिक्षणसंस्थांच्या यादीत अव्वल स्थानावर नाही,’ हे लक्षात घेतले पाहिजे.’

‘शिक्षणाने विद्यार्थ्यांना नवी दृष्टी दिली पाहिजे. वेगळा विचार करण्यास शिकविले पाहिजे. आव्हानांवर मात करण्यासाठी आगळे उपाय शोधण्याची दृष्टी दिली पाहिजे. आपल्या पारंपरिक हस्तकला जतन करण्यावरही आपल्या शिक्षणव्यवस्थेने लक्ष दिले पाहिजे. स्थानिक पातळीवरील बियाणे टिकवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत,’ असेही नायडू यांनी नमूद केले. 

‘शहरी आणि ग्रामीण भागामध्ये शिक्षणाच्या बाबतीत दुवा साधण्याची गरज आहे. ग्रामीण भागातील तरुणांना उत्तम दर्जाच्या शिक्षणाच्या संधी मर्यादित आहेत. सार्वजनिक, खासगी आणि सहकारी क्षेत्रातील एकात्मता वाढली तर ग्रामीण भागामध्येदेखील कौशल्य आधारीत रोजगार निर्मिती होऊ शकते. यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे राहणीमान सुधारेल. याकामात विज्ञान ज्योती संस्थेसारख्या संस्था महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. सर्व राज्यांमध्ये अशा शेतकरी आणि अन्य लोकांना उत्तम प्रशिक्षण देणाऱ्या संस्था असणे आवश्यक आहे. ग्रामीण भागाच्या विकासावर लक्ष दिले न गेल्याने शहरी भागात झोपडपट्टी वाढली आहे. शहरे फुगत चालली आहेत. यामुळे आता धोरणकर्ते, नियोजनकार आणि समाजानेही ग्रामीण भागाच्या विकासाकडे लक्ष दिले पाहिजे,’ असे नायडू यांनी स्पष्ट केले. 

‘शेती हा व्यवसाय फायदेशीर आणि शाश्वत करण्यासाठी शेतकऱ्यांना कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, फुलशेती, दुग्धोत्पादन आदी पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. अन्न प्रकिया उद्योग क्षेत्रातही मोठी संधी असून, कृषी उत्पादन वाढवणे, पिकवैविध्य आणणे, रोजगार निर्मिती आणि निर्यात वाढविण्यासाठी या क्षेत्रावर भर देणे आवश्यक आहे. शेतीच्या समस्या सोडविण्यासाठी सरकार धोरणात्मक आणि संरचनात्मक बदल करत आहे,’ असेही नायडू यांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search