Next
आत्मभान जागवणारी चळवळ
BOI
Thursday, March 08, 2018 | 12:19 PM
15 0 0
Share this article:

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य : Countercurrents.org)

‘बचत गट’ या संकल्पनेने चळवळीचं व्यापक रूप धारण केलं आणि त्यातून असंख्य महिलांचं भावविश्व व्यापक होत गेलं. घराचा उंबरठाही न ओलांडलेल्या महिलांना नव्या जगाची ओळख झाली आणि या जगात आपलं अस्तित्व शोधण्यासाठी त्या उभ्या राहिल्या. बिनचेहऱ्याच्या असंख्य बायकांना या संकल्पनेनं स्वतःचा एक चेहरा दिला. पैसा तर त्यातल्या काही जणी आधीही कमवीत होत्या! पण बचत गटानं अशा अनेक जणींना पैशाबरोबर प्रतिष्ठाही दिली. स्वाभिमानी जगणं दिलं!... बचत गटांच्या चळवळीचा अभ्यास करून, त्यावर संशोधनात्मक पुस्तक लिहिलेल्या ज्येष्ठ महिला पत्रकाराचा हा लेख...
...........
दसऱ्याचा दिवस. पुण्यातल्या सोलापूर रस्त्यावर नव्यानं उभारलेल्या छोटेखानी ‘हॉटेल अन्नपूर्णा’चे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या यशोदाबाई चव्हाण यांच्या हस्ते होते. उपस्थित मंडळी चहा-पाण्यासाठी हॉटेलमध्ये विसावतात. या उपस्थितांमध्ये २५-३० महिलांचा एक घोळका. हा घोळका यशोदाबाईंकडे जाऊन काही तरी बोलतो आणि यशोदाबाई आवाज देतात, ‘यमुनाबाई, या बरं जरा इकडे.’ तशा यमुनाबाई लगबगीनं त्यांच्याकडे जातात. यशोदाबाई यमुनाबाईंचा साडी-चोळी देऊन सत्कार करतात. टाळ्यांचा कडकडाट होतो. त्यामुळे बावरलेल्या यमुनाबाईंना जवळ घेत यशोदाबाई म्हणतात, ‘तुमच्या हिमतीला दाद म्हणून या सगळ्या जणींतर्फे हा सत्कार आहे बरं का!’ यमुनाबाईंचे डोळे नकळत पाणावतात.  

या यमुनाबाई म्हणजे या हॉटेलच्या मालकीणबाई. वय ५०-५२ वर्षे. काही वर्षांपूर्वी दिवसभर नवऱ्याबरोबर शेतात आणि उरलंसुरलं घरात राबूनही दोन वेळच्या पोटभर जेवणाची भ्रांत असणाऱ्या यमुनाबाई आज परिसरात अशी तीन उपाहारगृहे चालवतात. सुधारणांचे वारे जिथे कधी तरी, वर्ष-सहा महिन्यांनी पोहोचतात, अशा उजनीजवळच्या छोट्याशा खेड्यात राहणाऱ्या; पण दहा वर्षांपूर्वी अचानक त्यांच्या आयुष्यानं एक नवं वळण घेतलं. यशोदाबाई गावात आल्या आणि बायकांची बैठक घेऊन त्यांना बचत गटांची माहिती सांगितली. त्यामुळे काय फायदे होतील हेही सांगितलं. कुणी बायका चटकन तयार होईनात. तसं यमुनाबाईंना स्वस्थ बसवेना. त्यांनी उभं राहून आपली बचत गटात यायची तयारी असल्याचं सांगितलं. त्यांचं बघून दुसरी... मग तिसरी... चौथी... अशा दहा-बारा जणी तयार झाल्या आणि मग यशोदाबाईंच्या पुढाकारानं बचत गटांची सुरुवात झाली. महिन्याला दहा रुपये बचत करायचं ठरलं. दर आठवड्याला बैठक व्हायला लागली. यशोदाबाई नवनवी माहिती सांगायच्या. इतर गावांतल्या महिलांनी बचत गटांतून काय उपक्रम केले, याची माहिती द्यायच्या. सहा-सात महिने उलटले. चार पैसे कमवावेत, पोटापाण्याची चिंता मिटवावी, असं वाटत होतं; पण काय करावं सुचत नव्हतं. 

एक दिवस झोपडीत बसलेल्या असताना यमुनाबाईंची नजर मोडक्या किटलीवर पडली. त्या क्षणी मनात विचार आला, ‘चहाची टपरी टाकली तर?’ हातात काहीतरी मौल्यवान ठेवा गवसावा तसं त्यांचं मन आनंदून गेलं. त्या उठल्या. यशोदाबाईंकडे गेल्या. त्यांना ही कल्पना सांगितली. त्यांनीही त्याचं कौतुक करीत यमुनाबाईंना प्रोत्साहन दिलं. दुसऱ्या दिवशी बचत गटाच्या बैठकीत हा विषय मांडण्यात आला. आपल्या जय अंबे बचत गटाकडून यमुनाबाईंनी व्यवसायासाठी पहिलं कर्ज घेतलं शंभर रुपये!

तालुक्याच्या गावी जाऊन मोठं पातेलं, चहा-साखर, पेले, गाळणं अशी सगळी खरेदी झाली आणि गावाजवळून जाणाऱ्या महामार्गावर यमुनाबाईंची चहाची टपरी सुरू झाली. पाहता पाहता माणसांचा राबता वाढला. जाणाऱ्या -येणाऱ्या गाड्या चहासाठी थांबायला लागल्या. जेवणखाण सोडाच, पण यमुनाबाईंना स्वतःला चहा प्यायला उसंत मिळेना. त्या म्हणतात, ‘म्या हिंमत बांधली अन् चहाची टपरी लई झकास सुरू झाली. बचत गटाचं कर्जबी फिटलं. पल्याडल्या गावात धरणाचं काम सुरू व्हतं. त्याचं गिऱ्हाइक तिन्ही टायमाला टपरीत यायचं. सकाळी आठला आधण चढवलं, तर दहा-वीस माणसं चहासाठी थांबलेली असायची. काय खायला हाये का, म्हणून इचारायची. मंग खायला ठेवायला सुरुवात केली.’

बचत गटातल्याच दोघी-तिघींना मदतीला घेऊन यमुनाबाईंनी पोहे, भजी, भेळभत्ता असे पदार्थ नाश्त्यासाठी ठेवायला सुरुवात केली. आणखी तिघी जणींना रोजगार मिळाला. शेजारच्या गावात शिक्षकांचं शिबिर होतं. चहा प्यायला आलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयातल्या लोकांकडून यमुनाबाईंना ही माहिती कळली. दुसऱ्या दिवशी त्यांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं. अधिकाऱ्यांची भेट घेतली. ‘आम्हास्नी काम पायजे’ असं म्हणून आपल्या बचत गटाची माहिती त्यांना सांगितली. अधिकाऱ्यांनी होकार दिला आणि यमुनाबाईंना दोनशे शिक्षकांना चहा-नाश्ता आणि जेवणाचे डबे पोहोचविण्याचं काम मिळालं. बचत गटातल्या सगळ्या महिलांना मदतीला घेऊन त्यांनी ते यशस्वीरीत्या पार पाडलं. त्यानंतर यमुनाबाईंनी कधी मागे वळून पाहिलंच नाही. 

वसईजवळचं छोटंसं गाव. गावातल्या सांस्कृतिक सभागृहात महिलांचा हळदी-कुंकू समारंभ रंगलेला. भरजरी साड्या, दागिन्यांनी नटलेल्या बायका घोळक्या-घोळक्याने हळदी-कुंकवाला येत होत्या. आजूबाजूच्या गावातल्या महिलांच्या उपस्थितीने वर्दळ वाढली होती. गावातल्या एकवीरा बचत गटाने हा हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला होता. गावाच्या सरपंच आणि बचत गटाच्या अध्यक्ष असलेल्या मथुराताई जातीने सर्वांची विचारपूस करीत होत्या. काही वेळाने मथुराताई माझ्याजवळ येऊन बसल्या आणि मी विचारल्यावर बचत गटाची माहिती सांगायला लागल्या. त्यांचा बचत गट २०००मध्ये सुरू झालेला. गावातला पहिलाच बचत गट. मथुराताईंच्याच पुढाकाराने सुरू झालेला. दर महिन्याला बचत करता करता महिलांनी वाळवणाचे पदार्थ, इतर खाद्यपदार्थ करून विकायला सुरुवात केली. आता त्या पदार्थांना उत्तम मागणी आहे. इतक्या वर्षांत त्यांची ही प्रगती बघून भारावलेल्या महिलांचे आता आणखी अठरा बचत गट गावात आहेत; पण कार्यक्रम, इतर उपक्रम सगळ्या जणी एकत्रितपणे राबवितात. ही माहिती देऊन हळदी-कुंकू देणाऱ्या एका वयस्क महिलेकडे बोट दाखवून मथुराताई म्हणाल्या, ‘त्या हिरवी इरकल नेसलेल्या बाई दिसतायत ना, त्या सारजाबाई - सारजाबाई ढोरे. आमच्या बचत गटाच्या पहिल्या सदस्या. आता जवळजवळ ६५ वर्षांच्या आहेत; पण तरुणांना लाजवतील अशा उत्साहानं काम करीत असतात. बचत गटाचं कामकाज सुरळीत मार्गी लागावं म्हणून फार काम केलंय त्यांनी माझ्याबरोबर!’ हिरवीगार इरकल नेसलेल्या, अंगावर चार ठसठशीत डाग, कपाळावर रुपयाएवढे कुंकू लावलेल्या सारजाबाईंबद्दल मलाही उत्सुकता वाटली. त्या जरा मोकळ्या झाल्यावर त्यांच्याशी बोलायला लागले. ‘मावशी, इतकी वर्षं बचत गट सुरू करण्यापासून काम करताय. यामुळे काही फरक पडला का आयुष्यात? काय दिलं या कामानं, बचत गटानं?’ माझा कळीचा प्रश्न. प्रश्नासरशी सारजाबाई क्षणभर गप्प होतात. अन् पुढल्या क्षणी कपाळावरच्या कुंकवाकडे बोट दाखवित म्हणतात, ‘ह्ये देणं हाय बघ बचत गटाचं.’’ मी आश्चर्यचकित, किंचित गोंधळलेली. त्याचा अर्थ काय असावा, याचे आडाखे बांधणं माझ्या मनात सुरू झालेलं. ‘जरा व्यवस्थित सांगा ना मावशी,’ मी न राहवून म्हणते. सारजाबाई सांगायला लागतात, ‘बाई, म्या नऊ वर्साची असताना माजं लगीन झालं. मराठवाड्यात माझं माहेर. घरात कधी पोटाला दोन येळेला पुरेसं मिळालं न्हाई. बाप सावकाराच्या कर्जात बुडून गेलेला. माझा नवरा माझ्यापरीस चोवीस वर्सांनी मोठा. त्याला कायतरी आजार हुता. मला बी फारसं कळत न्हवतं. त्ये गेले तवा मी तेरा वर्सांची हुते. त्यानंतर काय, समदं आयुष्यच संपल्यागत झालं. कुकू पुसलं, दागिनं गेलं. दिसभर राबायचं अन् रातच्याला कोपऱ्यात पडायचं... झालं. पर बचत गटात आले अन् समदं आयुष्य पुन्यांदा सुरू झालं. नवी पहाटच झाली म्हना ना. आता चांगलं लुगडं नेसते, चार डाग घालते, गजरा माळते अन् कुकू बी लावत्ये. ह्ये समदं देनं हाय बग बचतगटाचं...!’ सारजाबाईंचा आवाज भरून आलेला... डोळ्यांतून आसवांच्या धारा लागलेल्या...!त्याचं असं झालं, बचतगट सुरू झाल्यावर त्यातल्या आर्थिक व्यवहारांबरोबरच इतर उपक्रमही सुरू झाले. मथुराताई तशा हुशार. त्या येणाऱ्या महिलांशी विविध विषयांवर संवाद साधायच्या. त्यांना बोलतं करायच्या. त्यांच्या घरातले प्रश्न, आजच्या काळाच्या गरजा इथपासून विविध सामाजिक रुढी, परंपरा, रीतीभाती अशा असंख्य विषयांवर गप्पा व्हायच्या. त्यातून लाभणारं काही ना काही विचारधन घेऊन बायका नव्या दमानं घरी जायच्या, उत्साहानं कामाला लागायच्या. असंच एकदा सामाजिक परंपरांविषयी बोलताना विधवांच्या आयुष्याविषयी चर्चा सुरू झाली. अजूनही खेड्यापाड्यांत विधवांच्या वाट्याला येणारं आयुष्य दयनीय असतं. नवरा मरण पावल्यावर तिचं व्यवस्थित राहणं, चांगले-नवे कपडे घालणं, कुंकू लावणं, सांस्कृतिक समारंभात मिसळणं हे सगळं बंद होतं. कारण समाजाला ते चालत नाही. सामाजिक नीतिनियम, संकेतांमध्ये ते बसत नाही. अशा अनेक गोष्टींवर उपस्थित महिला बोलत राहिल्या आणि मग मथुराताईंनी विचारलं, ‘पण हे सगळं तुम्हाला पटतं का?’ 

त्यांच्या या प्रश्नासरशी सगळ्याजणी विचारात पडल्या. चमकून एकमेकींकडे पाहायला लागल्या. मथुराताई म्हणाल्या, ‘आता असा विचार करा. कुंकू किंवा बांगड्या या गोष्टी आपण काय लग्नानंतर वापरायला लागतो का? अजिबात नाही. अगदी लहानपणापासून, वडिलांचं नाव लावतो, तेव्हाही आपण त्या वापरत असतो. मग नवरा गेला म्हणून त्या वापरणं सोडून देण्याचं काय कारण? लग्नाचं सौभाग्यलेणं म्हणून आपण फक्त मंगळसूत्र घालतो. ते काढणं, न काढणं याचा निर्णयसुद्धा त्या बाईनं स्वतःला पटेल, योग्य वाटेल त्याप्रमाणे घ्यावा, असं मला वाटतं.’ मथुराताईंच्या बोलण्याने सगळ्या जणी विचारात गढून गेल्या. ‘पण मग बाकीचं सण समारंभाचं काय?’’ कुणी तरी न राहवून विचारलं. तसं मथुराताई म्हणाल्या, ‘एखाद्या स्त्रीवर दुर्दैवाने अशी वेळ आली म्हणून तिला कुठल्याच आनंदाच्या प्रसंगी सहभागी करून न घेणं मला तरी पटत नाही. आयुष्यात एक दुर्घटना घडली म्हणून सगळं आयुष्य संपत नाही. हे सवाष्णींपुरतं, हे कुमारिकांपुरतं असे भेद आता बदलत्या काळात विसरायला हवेत. आपण सगळ्या जणी स्त्रिया आहोत, या एकाच भावनेने आता काम करायला हवं. बघा, विचार करा, तुम्हाला पटतं का हे सगळं?’ 

मथुराताईंच्या या बोलण्यानंतर सगळ्या जणी आपापसात कुजबुजायला लागल्या. थोड्या वेळानं राधाबाई आणि गोदाक्का म्हणाल्या, ‘तुमचं म्हणणं बरोबर आहे मथुराताई; पण हे लोकांना पटेल का?’ तसं रुक्मिणीबाई डोक्यावरचा पदर सावरीत म्हणाल्या, ‘‘लोकांना काय वाटतं, याची चिंता आपन कशाला करावी? लोक दोन्ही बी बाजूंनी बोलत्यात. आपल्याला पटंल त्ये करायला आपुनच सुरुवात करायची, म्हंजी झालं.’ 

‘बघा, किती बरोबर बोलल्या रुक्मिणीबाई!’ मथुराताई म्हणाल्या. आणि मग त्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला. बचतगटाच्या सर्व सांस्कृतिक उपक्रमांत, सण-समारंभांत विधवा-सवाष्ण असा भेद न ठेवता सगळ्या जणींना सहभागी करून घेण्याचा! आणि मग सारजाबाईंनाही त्यामध्ये सहभागी व्हायला मिळालं. सारजाबाई म्हणतात, ‘लई मोठा अंधार हुता माझ्या जिंदगीत.... चाळीसेक वर्सांनंतर पहाट उगवली म्हनायची... नवा जल्म झाल्यागत वाटतंया... असं वाटतं, आता कुठं सुरू झालंया समदं! तवापासून ठरीवलं, बचत गटासाठी लई काम करायचं. समद्या बायांना शिकवून श्यानं करायचं. बायाबापड्यांची जिंदगी बी बदलाया पायजे माझ्यासंगट!’ आणि मग सारजाबाई नव्या जिद्दीनं कामाला लागल्या. संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला मथुराताईंनी त्यांच्या अंबाड्यात गजरा माळला अन् सारजाबाईंच्याच शब्दांत त्या अगदी ‘भरून पावल्या.’ 

त्यानंतरच्या काही दिवसांत बचत गटानं सामाजिक सुधारणांचं पुढचं पाऊल टाकलं. वैधव्य आलेल्या कुठल्याही स्त्रीला कुंकू पुसण्याची, बांगड्या उतरवायची सक्ती करायची नाही आणि गावातल्या कुणालाही तशी करू द्यायची नाही. त्याबाबत काहीही ठरवण्याचं स्वातंत्र्य फक्त त्या स्त्रीलाच द्यायचं, असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आता या गावात सर्वच महिलांचे दिवस पालटले आहेत. सारजाबाईंच्याच शब्दात सांगायचं तर, ‘मानूस म्हनून जिंदगी वाट्याला आली... आता बाईपनाचं वोझं न्हाई वाटंत... वाटतं, लई मोलाचं हाय आपलं जगनं... नवी पहाट घेऊन आलेलं...!’

महाराष्ट्रातल्या बचत गटांच्या चळवळीचं फलित दर्शविणारी ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं! भावस्पर्शी अन् वास्तवदर्शी! गेल्या वीस-पंचवीस वर्षांतल्या परिवर्तनाची प्रसादचिन्हं टिपणारी! ‘बचत गट’या संकल्पनेपासून तिनं चळवळीचं रूप धारण करेपर्यंतची ही वाटचाल खूप मोठी आणि लक्षणीय आहे. या कालावधीनं सतत अठरा विश्वं दारिद्य्रामध्ये पिचून गेलेल्या कोट्यवधी सामान्य महिलांना त्या दारिद्य्राशी मुकाबला करायला शिकवलं आहे. दारिद्य्राशी सामना करतानाच त्या हातांमध्ये नवनिर्मिती करण्याचं बळ दिलं आहे. 

देशात आजमितीला दीड कोटींपेक्षा अधिक बचतगट कार्यरत आहेत. महाराष्ट्रही या बाबतीत आघाडीवर असून, राज्यात सध्या सव्वा लाखांहून अधिक बचत गट कार्यरत आहेत. ‘सूक्ष्म वित्तपुरवठा’, ‘सूक्ष्म कर्ज’ यांसारख्या नव्या संकल्पनांना जन्म देणाऱ्या, सर्वसामान्य स्त्रीच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या ‘बचत गट’ या संकल्पनेचा उगम कुठे आणि कसा झाला, त्याची वाटचाल कशी झाली ही मोठी रंजक कहाणी आहे.

डॉ. मोहम्मद युनूस‘बचत गट’ या संकल्पनेचा उगम झाला तो बांगलादेशामध्ये! बचत गटांच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब महिलांच्या जीवनात क्रांती घडवून आणणारे नोबेल आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. मोहम्मद युनूस हे या संकल्पनेचे आणि पर्यायाने या चळवळीचे जनक! बांगलादेशमधील जोब्रा या खेडेगावात फिरताना बांबूच्या वस्तू करणाऱ्या कारागीर महिलांची बिकट आर्थिक परिस्थिती पाहून त्यांना छोट्या रकमेची कर्ज द्यायला युनूस यांनी सुरुवात केली. त्याची परतफेड झाल्यानंतर नव्याने कर्ज देताना कर्जपुरवठ्याचा हा उपक्रम सातत्यानं सुरू राहावा आणि महिलांना गरजेनुसार व्यवहार करणं सोपं जावं म्हणून महिलांनी एकत्र येऊन गट सुरू करायचा आणि गटाद्वारे अंतर्गत कर्जवाटपाची पद्धती प्रत्यक्षात आणायची, अशी कल्पना होती. ‘बचत’ या मूलभूत गोष्टीद्वारे सुरू झालेल्या या गटांना ‘बचत गट’ असं नाव पडलं. एक ऑक्टोबर १९८३ रोजी ग्रामीण बँकेची स्थापना करून डॉ. युनूस यांनी अशा कोट्यवधी महिलांच्या लहानसहान कर्जांचा आणि अर्थपुरवठ्याचा प्रश्न सोडविला. यामुळे बांगलादेशमधील सर्वसामान्य महिलांच्या आणि पर्यायाने त्यांच्या कौटुंबिक जीवनात क्रांती घडून आली; मात्र या महिलांकडून केल्या जाणाऱ्या कर्जाच्या परतफेडीचे प्रमाणही लक्षणीय होते. त्यामुळे ग्रामीण बँकेच्या मॉडेलला जगभर प्रसिद्धी मिळाली.

भारतात १९९९पासून खऱ्या अर्थाने बचत गट उभारणीला चालना मिळाली. पुढच्या पाच वर्षांत म्हणजे २००५पर्यंत सुरू करण्यात आलेल्या बचत गटांची संख्या २१ लाख ३० हजारांच्या पुढे गेली होती. यातील बहुसंख्य गट जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेद्वारे तयार करण्यात आले होते. महाराष्ट्रात १९९४मध्ये सर्वंकष महिला धोरण जाहीर करण्यात आले. ग्रामीण विकासात महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि पर्यायाने महिला सक्षमीकरणासाठी या धोरणात बचत गट संकल्पनेला महत्त्व देण्यात आले होते; मात्र बचत गटांची ही संकल्पना महाराष्ट्राला सर्वस्वी नवीन नव्हती. १९४७मध्ये अमरावती जिल्ह्यात काही सासू-सुनांनी एकत्र येऊन २५ पैसे बचतीद्वारे गट सुरू केल्याची काही उदाहरणं आहेत. १९७०मध्ये ‘सेवा’ संस्थेच्या माध्यमातून महिलांसाठी काम करणाऱ्या इलाबेन भट यांनी ‘महिला आणि सूक्ष्म वित्तपुरवठा’ या विषयाची मांडणी केली होती. गडचिरोली जिल्ह्यात वडसा तालुक्यामध्ये १९८४च्या दरम्यान असे गट सुरू झाल्याचं आढळतं; मात्र १९८८नंतर महाराष्ट्रात बचत गट उभारणीला खऱ्या अर्थानं जोरकस प्रारंभ झाला आणि नंतरच्या दहा वर्षांत त्यानं चळवळीचं रूप धारण केलं. 

ही संकल्पना अस्तित्वात येण्यापूर्वी अत्यंत निकडीच्या वेळी ग्रामीण भागातल्या महिलांना अर्थसाह्य मिळविण्यासाठी एकमेव मार्ग उपलब्ध होता, तो म्हणजे ‘सावकार.’ सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी मग कितीतरी पिढ्या खर्ची पडत असत. कर्ज मिळविण्यासाठी त्यांची कारणं आणि रक्कम पुरेशी सबळ नसते. या ‘कारण नाही नि तारण नाही’ या परिस्थितीच्या चक्रात अडकलेल्या महिलांना बचत गटांच्या रूपानं एक नवा मार्ग सापडला. हा मार्ग त्यांना नवी दिशा दाखविणारा, त्यांच्या जीवनात नवी पहाट आणणारा ठरला. त्यामुळे ‘बचत गट’ ही संकल्पना ग्रामीण भागातल्या कष्टकरी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही अट नसणारी, त्यांना स्वातंत्र्य देणारी, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता यांसारख्या गुणांना वाव देणारी अशी विकासाभिमुख ठरली. या माध्यमातून महिलांची आर्थिक उन्नती झालीच; पण व्यवहारज्ञान, बँकेचे व्यवहार यांचीही माहिती मिळाली. सावकारीतून मुक्तता झाल्यानं कौटुंबिक स्थिती सुधारली, शिक्षणाची दारं खुली झाली. अशी अनेक स्थित्यंतरं त्यांच्या जीवनात घडत गेली. 

बचत गट उभारणीचा वेग आणि प्रमाण खूप मोठं आहे; मात्र मध्यंतरीच्या काळात ही संख्यात्मक वाढ झाली, तितक्या वेगानं गुणात्मक वाढ झाली नाही. याचं कारण ‘बचत गट’ या संकल्पनेचा नेमका अर्थ आणि त्याची व्याप्ती सदस्य महिलांना नेमकेपणानं सांगितली गेली नाही. त्यामुळे लहानसहान गरजा भागविण्यासाठी कधीही कर्ज उपलब्ध करून देणारा उपक्रम म्हणूनच त्याकडे पाहिलं गेलं; मात्र त्यानंतर महिलांच्या उद्यमशीलतेला वाव मिळेल अशा प्रकारचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली. सरकारी पातळीवर, तसंच अनेक स्वयंसेवी संस्थांनीही अशा प्रशिक्षणाची विशेष व्यवस्था केली. त्यातून नंतर विविध उद्योग-व्यवसाय करणाऱ्या बचतगटांची संख्या वाढली. 

प्रारंभीच्या काळात या व्यवसाय गटांनी कुरडया, पापड असे वाळवणाचे पदार्थ, चटणी-लोणच्यांसारखे पदार्थ बनवून त्याची विक्री सुरू केली. बचत गटांच्या संकल्पनेमध्ये ‘दारिद्य्राचे व्यवस्थापन’ हे सूत्र निश्चित करताना महिलांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास आणि वापर करून त्याद्वारे त्यांना आत्मनिर्भर, स्वावलंबी करणं गृहीत धरण्यात आलं होतं. त्यामुळे खाद्यपदार्थ बनवून त्यांची विक्री करणं या गोष्टीला यामध्ये प्राधान्य मिळणं स्वाभाविक होतं. त्यापाठोपाठ गोधड्या शिवणं, बाळंतविडे तयार करणं अशी कामंही केली जायला लागली. रॅमन मॅगसेसे पुरस्कारविजेत्या नीलिमा मिश्रा यांनी बहादरपूर (जि. जळगाव) यांनी आपल्या गावातल्या महिलांचं गोधड्या शिवण्याचं परंपरागत कसब ओळखून त्यांना नव्या काळाला साजेशा, दर्जेदार गोधड्या बनविण्याचं प्रशिक्षण दिलं. आज जगातल्या अनेक देशांमध्ये त्यांची निर्यात होते. 

अनेक बचत गटांनी नंतर गायी-म्हशी-बकरी पालन, त्यातून दुग्धव्यवसाय, कोंबडीपालन आणि अंड्यांचा व्यवसाय असे पारंपरिक उद्योगधंदे स्वीकारले. काही ठिकाणी सदस्य महिलांनी एकत्र येऊन किराणा दुकानं, चहा-नाश्त्याच्या टपऱ्या सुरू केल्या. काही काळानंतर त्यात आणखी सुधारणा होत गेली. अनेक बचत गटांनी गावातल्या गरजा लक्षात घेऊन खतं-बी-बियाण्यांचा, सिमेंटचा पुरवठा करण्याची कंत्राटं घ्यायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी गटातल्या महिला गावात शेतीची कामं करण्यासाठी रोजंदारीवर जातात. पुणे महापालिकेच्या नागर वस्ती विकास योजनेअंतर्गत येणाऱ्या एका बचत गटातील महिलांनी विजेची बिलं घरोघरी पोहोचविण्याची तयारी दर्शविली. ‘महावितरण’तर्फे त्यांना एका विभागात हे काम देण्यात आले. त्यानंतर एकाच महिन्यात या विभागातल्या परिस्थितीत आमूलाग्र बदल झाल्याचं संबंधित अधिकार्यांनी म्हटलं आहे. 

अलीकडच्या काळात हस्तकलेच्या वस्तूंना मोठी मागणी आहे. त्यासाठी अनेक ठिकाणी प्रदर्शनं भरविली जातात. बारामती कृषिविकास प्रतिष्ठानतर्फे सुनंदा पवार यांनी बचत गटांच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आठ वर्षांपूर्वी ‘भीमथडी जत्रा’ भरविण्याचा प्रयोग पुण्यात केला. बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीसाठी केला गेलेला हा पहिला संघटित प्रयत्न म्हणावा लागेल. त्यानंतर अनेक वर्षं तिथला सातत्यानं वाढता प्रतिसाद बघून आता इतर प्रदर्शनांमध्येही आवर्जून काही स्टॉल्स बचत गटांच्या महिलांना दिले जातात. तिथंही महिलांकडून वैविध्यपूर्ण उत्पादनं मांडली जातात; पण या सगळ्यात आकर्षणाचा भाग असतो तो खाद्यजत्रेचा. खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर आपापल्या भागात प्रसिद्ध असलेले, पण शहरात सहजासहजी सरसकट खायला न मिळणारे पदार्थ तयार करून खायला घालण्याचा प्रयत्न अनेक बचत गटांनी यशस्वी करून दाखवला आहे. खानदेशातले मडक्यावर भाजले जाणारे पुरणाचे मांडे काय किंवा बारा मावळातली मासवडी काय, अशा पदार्थांवर प्रत्येक ठिकाणी ग्राहक तुटून पडतात, असा अनुभव आहे. त्याचबरोबर खास गावाकडच्या चवीची झुणका-भाकरी, हुरडा, हातसडीच्या तांदळाचा भात असे पदार्थही लोक चवीनं खातात. हे लक्षात घेऊन आता अनेक बचत गटांनी या कामावर लक्ष केंद्रित केलं आहे. हे पदार्थ तयार करून खायला घालतानाच घरच्या शेतातली दाणेदार ज्वारी, आंबेमोहोर, तसंच हातसडीचा तांदूळ, इतर धान्यं, कडधान्यं इत्यादी वस्तूही या महिला विक्रीसाठी ठेवतात. अलीकडच्या काळात सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे. कोल्हापूर भागातला सेंद्रिय गूळ, अनेक ठिकाणचा भाजीपाला बचत गटांच्या माध्यमातून अशा प्रदर्शनांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध केला जातो. अशा प्रदर्शनांमध्ये लोकांच्या पसंतीस उतरलेले पुरणाचे मांडे बनविणारा पुण्याच्या जनता वसाहतीतील बचतगट आता राज्यभर विविध प्रदर्शनांमध्ये सहभागी होतो. या महिला सण-समारंभाच्या वेळी मांडे बनवून देण्याच्या ऑर्डर्स घेतात, विक्री करतात. यातून उलाढाला वाढली आहे. प्राप्तिकर भरावा लागणारा पुणे परिसरातला हा पहिला बचतगट आहे. 

सर्व फोटो : प्रातिनिधिकशाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी बहुतेक ठिकाणी बचत गटांवर सोपविण्यात आली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आहार बनविणं शक्य व्हावं, म्हणून महापालिकेतर्फे पुण्यात स्वतंत्र स्वयंपाकगृहे उभारण्यात आली आहेत. मुलांचे गणवेश शिवण्याचं काम अनेक ठिकाणी बचत गटांतल्या महिला करतात. सातारा जिल्ह्याच्या वाडेफाटा भागातला एक बचत गट घरात वीजपुरवठा करणारी संपूर्ण सौरऊर्जेवर चालणारी यंत्रणा तयार करतो. भौतिकशास्त्र विषयात बीएस्सी झालेली गावातली एक मुलगी ही त्यांची प्रेरणा. तिच्याकडून बारीकसारीक सगळ्या गोष्टी शिकून या महिलांनी ही यंत्रणा विकसित केली. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सामान खरेदी करून आणायचं आणि मग ही सगळी सिस्टीम तयार करायची. या कामातून आपल्या अन् आजूबाजूच्या अनेक गावांतली घरं उजळतानाच या महिलांचं भविष्यही आपोआप प्रकाशमान झालं आहे. 

सातारा जिल्ह्यामध्येच केळघर घाटात एका बचत गटानं गोबरगॅस प्रकल्प उभारला आहे. त्यामुळे गाव आपोआप ‘निर्मलग्राम’ बनले आहे. मेळघाटातल्या आदिवासींची मुलं बांबू हस्तकला प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण करून स्वावलंबी होत आहेत. बचत गटांच्या माध्यमातून वैयक्तिक विकास, कौटुंबिक विकास साधत असतानाच आर्थिक विकासाद्वारे सामाजिक परिवर्तन आणि विकासही होत असल्याचं हे आशादायी चित्र आहे. 

सूक्ष्म वित्तपुरवठ्यासारखी संकल्पना उदयास आल्यामुळे जगाच्या विविध भागांतल्या महिलांच्या विपन्नावस्थेत परिवर्तन घडून आलं आहे. लाखो-करोडो महिलांच्या जीवनात त्यामुळे नवी पहाट झाली आहे. ही पहाट आत्मभानाची... ज्ञानाची... विकासाची आणि संपन्नतेचीही!

काळानुरूप या चळवळीतही परिवर्तन होत गेलं. आजमितीला या गटांमध्ये समन्वय वाढविण्याची, शिखर संस्थांद्वारे समन्वय साधण्याची मोठी गरज निर्माण झाली आहे. त्यांना केंद्रिय संलग्नता देणं, त्यांचं सरकारीकरण थांबविणं, ‘व्होट बँक’ म्हणून त्यांचा गैरवापर होऊ न देणं यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे; मात्र असं असलं, तरी या चळवळीचा सकारात्मक परिणाम खूपच व्यापक, लक्षणीय आहे. ‘बचत गट’ या संकल्पनेने चळवळीचं व्यापक रूप धारण केलं आणि त्यातून असंख्य महिलांचं भावविश्व व्यापक होत गेलं. घराचा उंबरठाही न ओलांडलेल्या महिलांना नव्या जगाची ओळख झाली आणि या जगात आपलं अस्तित्व शोधण्यासाठी त्या उभ्या राहिल्या. काडी काडी जमवून संसाराच्या फाटलेल्या आभाळाला ठिगळं लावीत ते पेलण्यासाठी झटणाऱ्या  बिनचेहऱ्याच्या असंख्य बायकांना या संकल्पनेनं स्वतःचा एक चेहरा दिला. पैसा तर त्यातल्या काही जणी आधीही कमवीत होत्या... चार घरची धुणीभांडी करून... शेतात मोलमजुरी करून... नवरा नसताना आणि काही वेळा असून नसल्यासारखा असतानाही... त्याशिवाय पर्यायच नव्हता! पण बचत गटानं अशा अनेक जणींना पैशाबरोबर प्रतिष्ठाही दिली. स्वाभिमानी जगणं दिलं! पण या चळवळीचा आणखीही एक मोठा परिणाम आहे. सरकारी धोरण अस्तित्वात येण्याअगोदरपासून गरीबातली गरीब बाई बँकेशी जोडली जाते आहे. बचत गटांनी बँकांच्या अर्थकारणाला उभारी दिली आहे. ग्रामीण भारत बदलतो आहे! परिवर्तनाची ही प्रक्रिया म्हणजे खऱ्या अर्थानं सामान्यातल्या सामान्य महिलांचं आत्मभान जागविणारी चळवळ ठरली आहे! 

- स्वाती महाळंक
मोबाइल :  ८८८८१ ०२२०७

(लेखिका ‘बचत गटांची चळवळ आणि सूक्ष्म वित्तपुरवठा’ या विषयाच्या अभ्यासक आहेत. देशातल्या काही ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरून त्यांनी ‘कहाणी बचत गटांची’ हे या विषयावरचं मराठीतलं पहिलं समग्र संशोधनात्मक पुस्तकही लिहिलं आहे. अमेय प्रकाशनातर्फे ते प्रकाशित झालं आहे.)

(महिला दिनाबद्दलचे ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील सर्व विशेष लेख https://goo.gl/zuvB57 या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
rajendra sarag About
प्रेरणादायी
0
0

Select Language
Share Link
 
Search