Next
चांदण्यांच्या दुनियेत...
BOI
Tuesday, April 17, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story


दिवाळीच्या दिवसांमधील या ठिकाणचे रात्रीचे आकाश पाहण्यासारखे असते. सभोवती मिट्ट काळोख, कुठेही दिवे नसतात, जे असतात त्यांचा प्रकाश अगदीच मंद. त्यामुळे रात्री घुमटाकार आकाशात फक्त चांदण्यांचेच राज्य असते. कोट्यवधी चांदण्यांनी सर्व परिसर मंद प्रकाशात उजळून निघालेला असतो. आपल्या शहरी भागात इतके सुंदर चांदणे कधीच पाहायला मिळत नाही.... ईशान्य भारतात कार्य केलेल्या एका स्वच्छंदी कार्यकर्त्याचे अनुभव कथन करणाऱ्या ‘ईशान्यवाटेचा वारकरी’ या लेखमालिकेचा हा चौथा भाग...
..........................................
पाहता पाहता दिवाळी आली. सुनीता मावशींनी सर्वांना चांगले कपडे नेसून यायला सांगितले. प्रत्येकजण आपापल्या जमातीचा पोशाख करून तयार झाले होते. मावशींनी पाटावर कुंकवाने लक्ष्मीची प्रतिमा काढली होती. सभागृहात सर्वजण जमले. सामूहिक प्रार्थना झाली व सर्वांत छोट्या मुलीकडून लक्ष्मीची पूजा केली गेली. मावशींनी सर्व मुलींना दिवाळीचे महत्त्व सांगितले. मग मेणबत्त्या लावून सर्व छात्रावास उजळून काढला. मी पुण्याहून जाताना आकाशदिवे नेले होते. मावशींनी मुलींना फटाके वाटले. गच्चीवर सर्व जण फटाक्यांचा आनंद घेत होते. 

तिथे फक्त लक्ष्मीपूजनाला दिवाळी म्हणतात, म्हणजे एकच दिवस दिवाळी. या दिवसांमधील या ठिकाणचे रात्रीचे आकाश पाहण्यासारखे असते. सभोवती मिट्ट काळोख, कुठेही दिवे नसतात, जे असतात त्यांचा प्रकाश अगदीच मंद, नसल्यासारखाच जणू. त्यामुळे रात्री घुमटाकार आकाशात फक्त चांदण्यांचेच राज्य असते. कोट्यवधी चांदण्यांनी सर्व परिसर मंद प्रकाशात  उजळून निघालेला असतो. आपल्या शहरी भागात इतके सुंदर चांदणे कधीच पाहायला मिळत नाही. दिवाळीच्या दिवशी अंगणात केळीचे झाड रोवून, त्याशेजारी एक बांबू उभा करतात. अधिक चिन्हाचा आकार देऊन बांबूच्या पट्ट्या मनोऱ्याप्रमाणे त्यावर बांधतात. मग या पट्ट्यांवर वितीच्या अंतरावर मेणबत्त्या लावतात. ही दिवाळीची खूण. 

डिसेंबरमध्ये वार्षिक परीक्षा होत्या. मुलींचा अभ्यास नेहमीप्रमाणे चालला होता. वार्षिक परीक्षा झाली. मी पुण्याला विमानाने येणार होतो. एव्हाना मुलींनाही माझा लळा लागला होता. ‘मामा मत जाओ’, अशी विनवणी त्या करत होत्या. शेवटी कावेरी म्हणाली, ‘मामा, आप जब हवाई जहाज में जायेगा, तब ड्रायव्हर को बोलो प्लेन छात्रावासके उपरसे ले जाये. हम यहा से हात हिलाकर बाय बाय करेंगे..  आप भी हमको बाय बाय.’ त्यांच्या निरागसतेने माझे डोळे भरून आले होते. 

सप्टेंबर २००८मध्ये रामानंदजींनी त्यांच्या कन्या छात्रावासमधील मुलींचा अभ्यास करून घ्यायला बोलवले. पाचवी ते दहावीतील मुलींना विज्ञान, गणित, इंग्रजी व हिंदीतील अडचणी सोडवण्यासाठी मदत करायला सांगितली. तेथील शाळेतील शिक्षणाचा दर्जा यथा-तथाच होता. या वनवासी मुलींच्या गावी शिक्षणाचा गंध कोणालाच नव्हता. आपल्या मुली तरी चांगल्या सुशिक्षित व्हाव्यात, म्हणून त्यांच्या पालकांनी त्यांना तेथील शाळा व वसतिगृहात पाठवले होते. येथील मुली विविध जाती-जमातींच्या होत्या. कोणी नाग, कोणी दिमासा, कोणी कोरबी तर कोणी खासी. प्रत्येकाची भाषा वेगळी, रूढी-परंपरा वेगळ्या; पण वसतिगृहात मात्र सर्व एकोप्याने राहत होते. 

त्यांची शिकण्याची जिद्द पाहून, त्यांना चांगले शिक्षण मिळावे, विषयाचे त्यांना चांगले आकलन व्हावे, म्हणून मी झटत होतो. मी त्यांचा ‘मामा’ होतो, म्हणून त्या माझ्याकडे हट्ट करायच्या, मागण्या करायच्या. मी पण त्यांचे लाड पुरवत होतो. त्यांनी मन लावून अभ्यास करायचा व चांगले मार्क मिळवून दाखवायचे, अशी अट मात्र मी त्यांना घालत असे.  त्यांच्या मागण्या काय असायच्या, तर ‘मामा हमको शिंगाडा (सामोसे) चाहिये, हम डीम (अंडी) खायेगा, मामा बहुत दिन हुए हमने चिकन नही खाया.’ त्यांच्या या इच्छा मग मी पूर्ण करायचो.

या वेळी शिक्षणाच्या पद्धतीत आणखी सुधारणा करण्यासाठी मी शैक्षणिक सीडीज, आध्यात्मिक ज्ञानासाठी रामायण, महाभारत, श्रीकृष्ण यांच्या सीडीज सोबत घेतल्या होत्या. सोबत सीडी प्लेअरही घेऊन गेलो होतो. हाफलांगमध्येच एक टीव्ही घेतला. तो खाली प्रार्थना सभागृहातच ठेवला होता. विवेकानंद शाळेच्या खालच्या मजल्यावर प्रार्थना सभागृह आहे. या सीडीजच्या माध्यमातून शिक्षण व शंकानिरसन सुरू केले. दृक्श्राव्य माध्यमामुळे विषयाचे आकलन व्हायला वेळ लागायचा नाही. सर्वांनाच ही पद्धत खूप आवडली. शाळा संपल्यानंतर छात्रावासातील मुलांना वा मुलींना त्यांच्या गरजेप्रमाणे पुन्हा सीडी लावून देत असे. कोणाचेही सुपरव्हिजन नसताना मुले आपल्या आवडीच्या सीडी आणून सिनेमा बघायचे, ही गोष्ट अलाहिदा; पण मुलांचे हे वागणे अपेक्षित होते. योगायोगाने म्हणा किंवा आणखी काही, आयुष्याची सेकंड इनिंग जोशात सुरू झाली होती. वार्धक्यातील तारुण्याचा मी खूप छान आनंद घेत होतो. मन उत्साहाने भरून गेले होते. मी इतक्या हजारो मैल लांब जाऊन आदिवासींसाठी कार्य करत होतो, म्हणून माझे कौतुक होत होते. 

आत्तापर्यंतच्या मिळालेल्या अनुभवाच्या आधारे पुढे काय सुधारणा करता येतील, याचा विचार सतत माझ्या मनात सुरू असे. मुलांना अभ्यासात येणाऱ्या लाइटच्या अडचणीवर काय करता येईल..? यावर सोलर दिवे (लाइट्स) हे उत्तर मिळाले. योगायोगाने त्या सुमारास ‘न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड’मध्ये अपारंपरिक उर्जास्रोतांवर प्रदर्शन भरले होते. तिथे विविध प्रकारचे सोलर लाइट्स होते. तिथे पुणे विद्यापीठातील ‘सायन्स अँड टेक्नोलॉजी’ विभागाने बनवलेले पोर्टेबल सोलर लाइट्स मांडले होते. मला ते आवडले. याची माहिती घेताना ‘एसटीपी’चे प्रसाद कुलकर्णी यांचा परिचय झाला. त्यांना माझी गरज व उद्देश सांगितला. त्यांनी माझी पुस्तके सर, मिराशी सर व प्रकाश जगदाळे सर यांची गाठ घालून दिली. माझी समाजकार्याची तळमळ पाहून त्यांनी अगदी नाममात्र किमतीत चार सौर कंदील सेट मला देऊ केले. मी घेतलेल्या चार सौर कंदिलांसाठी माझे मावसभाऊ विजय व श्रीनिवास मेंडजोगे यांनी आर्थिक साह्य केले. मॅट्रिकच्या मुलींची परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी जानेवारी २००९मध्ये रामानंदजींनी पुन्हा विनंती केली. त्यासाठी मी व प्रेमा फेब्रुवारीत परत हाफलांगला आलो. तेथील कन्या छात्रावासमध्येच आमची राहण्याची सोय केली गेली. बरोबर नेलेल्या ‘सोलर लँप्स’पैकी दोन संच मुलांच्या छात्रावासात व दोन मुलींच्या छात्रावासात दिले. ‘एलईडी’च्या प्रकाशामुळे आता कोणालाही कंदील किंवा मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करण्याची गरज नव्हती. त्यांची रात्रीची जेवणेसुद्धा चांगल्या प्रकाशात होत होती. 

दहावीच्या परीक्षा मार्चमध्ये होत्या. छात्रावासात अविदा, ओ बिना रेहुनी व चुनी एवढ्याच मुली होत्या. बाकीच्या मुली वसंत पंचमीनंतर येणार होत्या. छात्रावासामध्ये पाण्याची गैरसोय होती. आठवड्यातून एकदाच पाणी येत असे. गच्चीवर एक ५०० लिटरची सिंटेक्सची तुटकी टाकी होती. तिथून निघालेल्या सर्व पाइपमधून पाणी गळत होते. अंबाडी लावून ते पाइप बांधून घेतले. तुटलेली टाकी जोडून घेतली. 

या दिवसात हाफलांगमध्ये खूप वेगाने थंड वारे वाहत असतात. दिवसासुद्धा घो घो आवाज करत वारे वाहतात. गारठा तर इतका असायचा, की दिवसासुद्धा प्रेमा गारठून जायची. दोन स्वेटर घालावेच लागायचे. वेळ जाण्यासाठी प्रेमाला काहीच साधन नव्हते. अनोळखी प्रदेश, कोणाशी बोलणार, त्यातून खराब रस्ते आणि थंड वातावरण, म्हणून तिच्यासाठी एक टीव्ही घेतला व टाटा स्कायचे कनेक्शनही. गारठ्यामुळे सकाळी व संध्याकाळी गच्चीवर बसून अभ्यास घेत असे. गच्चीवरून छात्रावासाकडे येणारा रस्ता स्पष्ट दिसायचा. तिथून रोज एक भेळवाला डोक्यावर टोपली घेऊन घंटी वाजवत येत असे. संध्याकाळी तो नेमका तेथे असायचा. मग कधी कधी आमचा भेळ खाण्याचा कार्यक्रम व्हायचा. आता मात्र लाइट गेले, तरी सोलर कंदिलाच्या उजेडात मुली अभ्यास करत असत. या सगळ्यामुळे आणखी एक वेगळेच आव्हान समोर उभे राहिले, ते म्हणजे खेड्यातली घरे सोलरच्या दिव्यांनी उजळून टाकायची. 

केहुरालेच्या घरी लोकांचा राबता खूप होता. तिच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला तिचे वडील ‘आराबाबा’ कौतुकाने ही सोलर योजना दाखवायचे. ते सर्व जण खेड्यापाड्यात राहणारे, चिमणीसाठी रॉकेल आणायला प्रत्येकाला ५० किलोमीटरची पायपीट करावी लागायची. त्यावर हा उपाय प्रत्येकालाच भावला. प्रत्येकाने सांगितले, की मामांना आमच्यासाठीही एक संच आणायला सांगा. मुलींच्या अभ्यासाबरोबरच ही आणखी एक नवीन जबाबदारी मी आव्हान म्हणून स्वीकारली. केहुराले, तिला मी लाडाच्या नावाने ‘आरा’ म्हणत असे. तिची आई हाफलांगपासून ७० किलोमीटर दूर खेड्यात राहत होती. चाळीस एक उंबरठ्यांचे गाव. लाइट नाही. या कल्पनेतून त्यांना इन्व्हर्टर दिला. आयुष्याने मला एका नवीन आणि सुंदर वळणावर मला पुण्याहून ३८०० किलोमीटर दूर हाफलांगला आणून पोहोचवले होते. आता लवकरच दुसरे वळण येणार होते... 
(क्रमशः)
- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५ 

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका दर मंगळवारी आणि शुक्रवारी  ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71c या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Parashuram Babsr About 336 Days ago
Excellent
0
0
arun bapat About 336 Days ago
Touching sincere effort,Solarlighting very ingenious introduction.
0
0

Select Language
Share Link