Next
रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरीचा शिमगोत्सव २० मार्चपासून
BOI
Tuesday, March 12, 2019 | 12:09 PM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : रत्नागिरीतील बारा वाड्यांचे ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा शिमगा देवस्थानचे ट्रस्टी, मानकरी, गावकरी-ग्रामस्थ, गुरव मंडळी यांच्या सहकार्याने पारंपरिक पद्धतीने साजरा होणार आहे. यंदा शेरेनाक्यावरून शिवाजी हायस्कूलजवळ वाय. डी. जोशी यांच्या कंपाउंडमधून होळी घेण्यासाठी भैरीबुवाची पालखी २० मार्च २०१९ रोजी जाणार आहे.

श्री देव भैरीच्या शिमगोत्सव कार्यक्रमाची सविस्तर रूपरेषा अशी : २० मार्चला (फाल्गुन पौर्णिमा) रात्री १०० वाजता श्री देवी जोगेश्वरी मंदिरातून श्रीदेव भैरीला उत्सवाचे निमंत्रण म्हणून सर्व मानकरी मंडळी पारंपरिक पद्धतीने झाडगाव सहाणेवरून, महालक्ष्मी शेतातून श्रीदेव भैरी मंदिरात रात्री ११ वाजेपर्यंत जातील. मध्यरात्री १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी श्रीदेवी जोगेश्वरी भेटीसाठी, ग्राम प्रदक्षिणा व जोगेश्‍वरीची होळी उभी करण्यासाठी श्रीदेव भैरी मंदिराबाहेर पडेल व खालची आळी, कै. बाळोबा सावंत यांच्या आगरातून महालक्ष्मी शेतातून मध्यरात्रीनंतर १.३० वाजेपर्यंत श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात जाईल.

२१ मार्चला श्री देवी जोगेश्वरी मंदिरात मुरुगवाडीतील मंडळी आल्यानंतर पहाटे तीन वाजता श्रीदेवी जोगेश्‍वरी मंदिरातून पालखी ग्रामप्रदक्षिणा व होळीचा शेंडा उभा करण्यासाठी बाहेर पडून झाडगाव सहाणेवरून झाडगाव नाका, टिळक आळी, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर, बंदर रोड मार्गे पहाटे पाच वाजता मांडवी भडंग नाका येथे जाईल. तेथून पुढे प्रत्येकी एक-एक तास याप्रमाणे मांडवी, घुडेवठार, विलणकरवाडी, चवंडे वठार, खडपे वठारमागील समुद्र मार्गाने जाऊन पुढे शेट्ये यांच्या घराजवळील रस्त्यावर येऊन खडपेवठारातून गोडीबाव तळ्यावर सकाळी १० वाजता येईल. तेथून तेली आळी, राम नाका, राम मंदिर येथे सकाळी ११.३० वाजता येईल. तेथून पुढे राधाकृष्ण नाका, गोखले नाका येथे दुपारी १२ वाजता येईल. पुढे लक्ष्मी चौक, शेरेनाक्यावरून शिवाजी हायस्कूलजवळ वाय. डी. जोशी यांच्या कंपाउंडमध्ये होळी घेण्यासाठी जाईल. तेथून परत होळीचा शेंडा घेऊन दुपारी तीन वाजेपर्यंत झाडगाव येथे सहाणेवर जाऊन तेथे होळी उभी केली जाईल.

२१ मार्चला रात्री नऊ वाजता धुळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीचे निशाण सहाणेवरून निघेल ते झाडगावात फिरून श्री देवी जोगेश्‍वरी मंदिरात जाईल. तेथून सहाणेच्या मागील बाजूने झाडगावकर कंपाउंडमध्ये जाऊन सुर्वे यांच्या बागेतून शिवलकर आदींच्या यांच्या घराजवळून कुंभारवाड्यातून परटवणे, फगरवठार येथून परत फिरून निशाण वरच्या आळीतून, लक्ष्मी चौक, गोखले नाक्यातून ढमालणीच्या पारावर येईल. सुमारे रात्री ११.३० वाजता ढमालणीच्या पारावरून निशाणाचे तीन भाग होतील. त्यापैकी एक भाग निशाण घेऊन गुरव मंडळी श्रीदेव भैरी मंदिरामध्ये जातील. दुसरा भाग गोखले नाक्यावरून राधाकृष्ण नाक्यावरून मासळी बाजारपेठ येथे जाईल. तेथे रवी सुर्वे, मयेकर यांच्या घरादरम्यान फिरून मच्छी मार्केटच्या मागील बाजूने झारणी रोडमार्गे राम नाक्यावरून तेली आळीत रसाळ यांच्या घरी तिठ्यावरती येईल. ढमालणीच्या पारावरून तिसरा भाग निघून पर्‍याची आळी, मारुती आळीतून तेली आळी येथील रसाळ यांच्या घरी तिठ्यावर येईल. तेथून गोडीबाव नाक्यावरून देसाई यांच्या घरी जाऊन, खडपेवठार येथे विलणकर यांच्या मळ्यातून कै. रघू विलणकर यांच्या घरी जाईल. तेथून निशाण राजिवडा येथील श्रीदेव विश्‍वेश्‍वर मंदिरात जाईल (सुमारे १.३० वाजता). तेथे श्रीदेव विश्वेश्वराच्या हद्दीत फिरून श्रीदेव विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये गार्‍हाणे होईल व निशाण बाहेर पडेल. तेथून राजीवड्यातील चव्हाण यांच्या घराशेजारी जाईल. तेथे मुस्लीम मानकरी काद्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देऊन गळाभेट होईल व तेथे धुळवड साजरी होईल. तेथून निशाण परत फिरून खडपेवठार सतीजवळून, समुद्र मार्गाने चवंडे वठार नाक्यावरून, विलणकर वाडी, श्री दत्त मंदिर नाका, घुडे वठार, मांडवी येथे वारंग यांच्या घरी रात्री थांबेल.

२२ मार्चला सकाळी आठ वाजता मांडवीत वारंग यांच्या घरापासून पुढे चौगुलेवाडी समुद्रमार्गे पौडा वरून कुरणवाडी, सिद्धेश्वर विरेश्वर चव्हाट्याजवळ गार्‍हाणे होईल. तेथून धुळवड आंबुलकर यांच्या घरी जाईल. आंबुलकर यांच्या घरातून सांबमंदिर, ज्योतिबा मंदिर येथे धुळवडीचे दोन भाग होऊन एक भाग राम मंदिरच्या मागील बाजूने जाऊन दुसरा भाग राम मंदिराच्या पुढील बाजूने मिरकरवाडा पोलीस चौकीजवळ धुळवडीचे दोन भाग एकत्र येऊन तेथून पुढे भैरी मंदिर, खालची आळी, सुभेदार यांच्या घराजवळून पाटील फिशरीज फॅक्टरी जवळून मुरूगवाडा घसरवाटेजवळ धुळवडीचे दोन भाग होतील. एक भाग झाडगाव येथील झाडगावकरांच्या कंपाउंडमध्ये येईल व दुसरा भाग विठलादेवी जवळून ग्रामस्थ शिरधनकर यांच्या घरी जाईल. तेथून पुढे पंधरा माड येथील पिलणकर यांच्या घरी जाईल. नंतर मुरुगवाडा हद्दीजवळ जाऊन तेथे गार्‍हाणे होऊन धुळवड परत मागे फिरून झाडगाव सहाणेजवळील झाडगावकर यांच्या कंपाउंडमध्ये दुपारी बारा वाजता येईल व धुळवडीचा कार्यक्रम संपेल.

२२ ते २४ मार्चला दुपारी एक वाजेपर्यंत श्रीदेव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न असेल. २२, २३ व २४ मार्चला रात्री १० नंतर प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीने पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. २४ मार्चला दुपारी १२ वाजता श्रीदेव भैरीची पालखी मुरुगवाड्यात ग्रामप्रदक्षिणेसाठी सहाणेवरून उठेल व झाडगाव मार्गे श्री देवी जोगेश्वरी मंदिर येथून खालची आळी, भैरी मंदिर मार्गे दांडा फॅक्टरीच्या मागील बाजूने मुरुगवाड्यातून पंधरा माडापर्यंत जाऊन परत मागे फिरेल व रात्री साधारण ८.३० वाजेपर्यंत झाडगाव सहाणेवर येईल. त्यानंतर सहाणेवर रात्री पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल.

२५ मार्चला (फाल्गुन पंचमी) रंगपंचमीच्या दिवशी श्री देव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी एक वाजता सहाणेवरून उठेल व पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्र सलामी घेऊन झाडगाव श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरातून झाडगाव नाक्यावरून गाडीतळ येथे ३.३० वाजेपर्यंत येईल. पुढे श्रीदेवी नवलाई पावणाई मंदिरात सायंकाळी ४.३० वाजता आणि तेथून पुढे शहर पोलीस ठाण्यात पोहचेल. पुढे धनजी नाक्यावरून, राधाकृष्ण नाक्यावर सायंकाळी ६.३० वाजता येईल. पुढे राम नाका, राम मंदिर येथे सायंकाळी सात वाजता, तर मारुती आळी, गोखले नाक्यावरून, ढमालणीच्या पारावर रात्री नऊ वाजता पालखी येईल. तेथून विठ्ठल मंदिर, हॉटेल प्रभा, काँग्रेस भुवन, मुरलीधर मंदिर येथे रात्री १० वाजता पालखी येईल. पुढे खालची आळी मार्गे पालखी श्रीदेव भैरी मंदिराच्या प्रांगणात रात्री ११.३० वाजेपर्यंत येईल. रात्री १२ वाजता पालखी श्रीदेव भैरी मंदिरात स्थानापन्न होईल. नंतर धुपारती व गावाचे गार्‍हाणे होऊन शिमगा उत्सवाची सांगता होईल.

‘श्रीदेव भैरीचा शिमगोत्सव पूर्वापार परंपरेनुसार शांततेत पार पडणार असून, सर्वांनी सहकार्य करावे,’ असे आवाहन देवस्थान ट्रस्टतर्फे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search