Next
काळ-काम-वेगाची नव्याने उकल
प्रसन्न पेठे (Prasanna.pethe@myvishwa.com)
Wednesday, April 04, 2018 | 05:04 PM
15 0 0
Share this story

‘आपलं आयुष्य कायमस्वरूपी नाही’ हा साक्षात्कार ज्याला वेळेवर होतो त्यालाच वेळेचं महत्त्व आणि हाताशी असणाऱ्या वेळेचा सदुपयोग कसा करावा ते समजतं. प्रत्येक तास, मिनिट आणि सेकंदाचा व्यवस्थित उपयोग केला नाही तर तो गेलेला क्षण पुन्हा फिरून कधीच मिळणार नाही, त्यामुळे हाताशी असणाऱ्या वेळेचं व्यवस्थापन का आणि कसं करावं ते डॉ. यान यागर यांनी ‘पुट मोर टाइम ऑन युअर साइड’ या पुस्तकातून सांगितलं आहे. त्याचा अनुवाद वृषाली कुलकर्णी यांनी ‘डिजिटल युगात वेळेचे व्यवस्थापन’ या नावाने आपल्यासमोर आणला आहे. त्या पुस्तकाचा हा परिचय...

.............. 

आपल्यापैकी कित्येकांना आयुष्य जगत असताना, आपण वेळ कसा घालवतोय किंवा वाया घालवतोय याची जाणीवही नसते. यशस्वी व्हायचं असेल तर उपलब्ध वेळेत अधिकाधिक कामं आणि तीही योग्य प्रकारे करण्याची गरज वाढते आहे. बदलत्या काळात वेळ वाचवण्याची अनेक साधनं हाताशी आली असली तरी वेळेचं व्यवस्थापन किवा योग्य नियोजन करणं ही गोष्टसुद्धा अधिकाधिक महत्त्वाची ठरत चालली आहे, ज्यामुळे कामासाठीच नव्हे तर आरामासाठीही आपण वेळ देऊ शकू.

दिवसाकाठी जास्तीत जास्त दहा तास काम आणि सहा दिवसांचा आठवडा, अशी शिफारस करणाऱ्या रॉबर्ट ओवेनने पुढे जाऊन ‘आठ तास काम, आठ तास करमणूक आणि आठ तास झोप’ असं सूत्र जगासमोर मांडलं होतं. 

डॉ. यान यागर यांनी वेळेच्या व्यवस्थापनासंदर्भात प्रत्येकाने सुरुवातीला, दिवसाच्या अखेरीस आपण दिवसभरात काय काय कामं केली याचा अहवाल लिहून पाहावा असा सल्ला दिला आहे. त्याचा फायदा आपल्याला आपली उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी होऊ शकतो. 

वेळेच्या व्यवस्थापनामध्ये सर्वांत महत्त्वाच्या असणाऱ्या काही संकल्पना किंवा तत्त्वं अशी आहेत. - १) आपलं ध्येय निश्चित करा. वेळात वेळ काढून ज्या गोष्टींची पूर्तता व्हायलाच हवी, अशा गोष्टी आधी निश्चित करा. २) स्वतःला समजून घ्या. आपण सर्वांत जास्त क्रियाशील केव्हा असतो ते जाणून घ्या आणि कामाची आखणी करा. ३) कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. ४) पसाऱ्यामुळे कामांचा वेग मंदावतो. पसारा टाळा. ५) आपल्याला आवडणारंच काम आपण करतो आहोत का, हे जाणून घ्या. केवळ उदरनिर्वाहासाठी एखादं काम स्वीकारलं असल्यास त्यात बदल करण्यासाठी काय करता येईल याचा विचार आणि त्याप्रमाणे कृती करा. ६) कामाचा वेग ठरवा. सुरुवात कुठून केली आहे याची नोंद ठेवा. ७) मोठ्या कामाची लहान आणि आटोपशीर कामांत विभागणी करा. ८) परेटो अॅनालिसिस वापरा. ९) प्रत्येक काम तुम्ही करू शकत नाही. त्याची गरज नसते. त्यामुळे कामाची विभागणी करून काही कामं दुसऱ्यांना द्या. १०) दररोजच्या कामांचं मूल्यमापन करा. ११) सातत्याने कामावर फोकस ठेवून स्वतःला त्याची आठवण देत रहा. १२) प्रत्येक दिवस आपला ‘पृथ्वीतलावरचा शेवट दिवस आहे’ असं समजून सर्वांशी वागा. प्रत्येक यशाबद्दल स्वतःला बक्षीस द्या.

पुस्तकाच्या शेवटी काही परिशिष्टं दिली आहेत. कामाच्या दिवसांबरोबरच सुट्टीच्या दिवसाचंही नोंदणीपत्रक करा आणि प्रामाणिकपणे भरा म्हणजे आपण किती वेळ काम करतो आणि कुठे वेळ वाया जातो हे समजून त्याप्रमाणे दुरुस्ती करता येऊ शकेल, असं त्यात म्हटलं आहे. 

डॉ. यागर यांनी ACTION म्हणजे (Assess) ठरवा, (Control) नियंत्रण करा, (Target) उद्दिष्टाला चिकटून राहा, (Innovative) नवीन कल्पना वापरा, (Organise) आखणी करा, (Now!) आत्ता करा - असा मंत्र दिला आहे. तसंच प्रत्येक दिवसासाठी PIEचा (Prioritize) प्राधान्यक्रम, (Initiate) आरंभ, (Evaluate) मूल्यमापन यांचा वापर करावा असंही सांगितलं आहे. 

वृषाली कुलकर्णी यांनी अनुवाद करताना मूळ इंग्लिश प्रणाली समजून घेऊन त्यानुसार अनुवादाची भाषा ठेवली आहे. त्यामुळे पुस्तक प्रवाही झालं आहे. मराठीमध्ये रुळलेल्या काही इंग्लिश शब्दांना मुद्दाम ओढूनताणून मराठी प्रतिशब्द न देता, मूळ माहिती असणारा इंग्लिश शब्द कायम ठेवल्यामुळे पुस्तक समजायला खूपच सोपं जातं, हे त्याचं यश.

पुस्तक : डिजिटल युगात वेळेचे व्यवस्थापन

अनुवादक : वृषाली कुलकर्णी    

प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन्स, बुधवार पेठ, पुणे ४११००२    

संपर्क : (०२०) २४४४८९८९    

पृष्ठे : ११८     

मूल्य : १९० ₹ 

(‘डिजिटल युगात वेळेचे व्यवस्थापन’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link