Next
हसले मनी चांदणे...
BOI
Tuesday, May 16, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, नाट्यगीतं, ख्याल, ठुमरी... असे गाण्याचे कितीतरी प्रकार माणिकताईंच्या स्वरांनी सजलेले आहेत. आज, १६ मे, माणिक दादरकर अर्थात माणिक वर्मा यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’च्या आजच्या भागात माणिक वर्मा यांनी गायलेल्या ‘हसले मनी चांदणे...’ या गीताबद्दल...
..............
१६ मे १९२६ हाच तो दिवस...भूतलावरील रत्नभांडारात अवतरलं एक माणिक आणि दादरकर कुटुंबात आनंदोत्सवच नाही, तर स्वरोत्सव सुरू झाला. या स्वरोत्सवात अवघा महाराष्ट्र कितीतरी वर्षे मंत्रमुग्ध होत राहिला. माणिक दादरकर अर्थात माणिक वर्मा यांचा आज जन्मदिन. माणिक वर्मा यांनी गायलेली कितीतरी गाणी कानामनात रुंजी घालताहेत. भावगीतं, भक्तिगीतं, चित्रपटगीतं, नाट्यगीतं, ख्याल, ठुमरी...असे गाण्याचे कितीतरी प्रकार माणिकताईंच्या स्वरांनी सजलेले...तो स्वर...नुसता स्वर नाही, तर ‘पुलं’नी म्हटल्याप्रमाणे ‘सोज्वळ मोहकतेने सुंदर’ असा माणिकताईंचा स्वर होता. असा एक आवाज, ज्या आवाजात घरंदाज मोहकता होती, प्रासादिकता होती, तुळशी वृंदावनापुढे तेवणाऱ्या निरांजनाची स्निग्धता होती, चांदण्याची शीतलता होती. खरं म्हणजे ‘होती’ असं कसं म्हणायचं? माणिकताईंचा आवाज आजही आपल्याबरोबर आहेच ना...त्यांच्या ध्वनिमुद्रिकांमधून आजही आपण ते स्वरचांदणं अनुभवू शकतो ना..खरं सांगू, हे लिहिता लिहिता माझ्या कानात ते गाणं वाजूही लागलंय...

हसले मनी चांदणे,
जपून टाक पाऊल साजणे
नादतील पैंजणे...हसले मनी चांदणे।

किती गोड असावं गाणं! नुसतं गोड नाही, तर भाग्यवान किती? या गाण्याला लाभला माणिकताईंचा आवाज आणि महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा स्वरसाज! हो, स्वरसाजच म्हणावंसं वाटतं. कारण राजा बढे यांनी लिहिलेलं गीत आणि ‘पुलं’चं संगीत म्हणजे स्वरमाणिकात घडवलेला एक मौल्यवान दागिनाच...महाराष्ट्रात दागिन्याला साजही म्हणतात. हा साज मराठी भावसंगीतशारदेच्या गळ्यात किती शोभून दिसतो नाही?

काव्यगायन हा ‘पुलं’चा आवडता छंद. या छंदापायी कितीतरी कवितांना चाली लावून त्यांनी काव्यमैफली सजवल्या. गीतकार गंगाधर महांबरे यांनी बेचाळीस-त्रेचाळीसच्या काळात फर्ग्युसन महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात ‘पुलं’चं काव्यगायन ऐकलं होतं. महाविद्यालयातील ऐन तारुण्याच्या बहरातला श्रोतृवृंद, ‘पुलं’नी सादर केलेली राजा बढे यांची कविता ‘हसले मनी चांदणे’ आणि त्याला मिळालेली उत्स्फूर्त दाद! ही सुरेल आठवण गंगाधर महांबरे यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिली  आहे. त्या काळी ‘पुलं’चं पेटीवादन आणि काव्यगायन हा अर्थार्जनाचा एक भाग होता; पण पुढे त्यांच्यातला एक उत्कृष्ट संगीतकारही महाराष्ट्रानं अनुभवला. गदिमा आणि सुधीर फडके या स्वरसंगमावरची गीतशिल्पं रसिकांना मंत्रमुग्ध करत होती. ही जोडी त्या काळातल्या स्वरोत्सवाची प्रणेती होती. असं सांगताना ‘पुलं’नी म्हटलं आहे, की ‘या जोडीची ती स्वरसज्ज गीतं घरोघरी पोहोचवणारा सोज्वळ, मोहकतेने सुंदर असा एक आवाज होता तो माणिकचा...’

माणिक वर्मा यांच्याकडून कितीतरी गाणी ‘पुलं’नी गाऊन घेतली. आता या क्षणी रसिकांना ती आठवतीलही... ‘कबिराचे विणतो शेले,’ ‘जा मुली शकुंतले सासरी आवरी डोळ्यांमधल्या सरी’ किंवा ‘सुवर्ण द्वारावतीचा राणा श्रीहरी, विदुराघरी पाहुणा...’ अशी कितीतरी गाणी आणि त्या स्वरमाधुर्यानं नटलेल्या आठवणी!! आता या क्षणी ‘पुलं’च्या संगीतप्रेमाबद्दल लिहावं की माणिकताईंच्या लडिवाळ गाण्याबद्दल लिहावं अशी मनाची अवस्था झाल्यावर पुन्हा पुन्हा खुणावतंय स्वरांच्या चांदण्यात भिजलेलं राजा बढे यांचं गीत ‘हसले मनी चांदणे...’ ‘पुलं’नी या कवितेतल्या प्रत्येक शब्दातील भाव माणिकताईंच्या आवाजातून असा काही व्यक्त केलाय, की जाईच्या फुलाची कोमलता आणि चांदण्याची शीतलता रसिकांना अनुभवता यावी...ती किती नाजूक? तर जाईची फुलंही तिला बोचतील, चांदण्यांनीही तिचे नाजूक पाय पोळतील! अशी ती नाजूक अभिसारिका प्रियकराच्या भेटीसाठी आतुर...

पानांच्या जाळीत लपोनी, चंद्र पाहता गडे
सांग कुणाच्या भेटीसाठी जीव सारखा उडे!

ही जिवाला लागलेली ओढ आणि तिची थट्टामस्करी करणाऱ्या तिच्या मैत्रिणी. त्यांच्याबद्दलचा लटका राग माणिकताईंनी आपल्या स्वरांमधून असा काही व्यक्त केला आहे, की अहाहा! लाजवाब!!

का गं अशा पाठीस लागता मिळून साऱ्या जणी
आज लाभला मला माझिया सर्वस्वाचा धनी ।

राजा बढे यांच्या कवितेला ‘पुलं’नी चंद्रकंस रागाचे स्वर दिले आणि माणिकताईंच्या शास्त्रीय संगीताची तालीम असलेल्या गळ्यातून असे काही सहज साकारले, की आजही त्या स्वरचांदण्याच्या बरसातीत रसिक न्हाऊन निघतात... 

माणिक वर्मा यांच्या गाण्याला विदुषी हिराबाई बडोदेकरांचा आशीर्वाद आणि अभिजात गायकीचा संस्कार लाभला याचा प्रत्यय रसिकांना सदैव येत राहतो. बालगंधर्वांनी माणिकताईंचं गाणं ऐकलं आणि त्यांना चांदीचा पेला बक्षीस दिला होता. माणिकताईंच्या बालपणीची ही अशी एक आठवण सांगितली जाते. ‘पुलं’नी म्हटलंय, की मंगळागौर जागवायला जावं इतक्या सहजतेनं गाण्याच्या बैठकींना मराठी समाजातल्या स्त्रिया जायला लागल्या, ही पुण्याई बालगंधर्व आणि हिराबाईंची. त्यांनी पंडितांचे आणि उस्तादांचे गाणे प्रासादिक स्वरूपात लोकांपुढे नेले.....ही पुण्याई माणिकताईंनाही लाभली असं वाटतं. ‘सावळाच रंग तुझा,’ ‘घननीळा लडिवाळा,’ ‘सुजन कसा मन चोरी’ किंवा गीतरामायणामधली त्यांनी गायलेली गाणी, यातला भक्तीभाव असो की लडिवाळपणा, ताना असोत की हरकती, बालगंधर्वांच्या गाण्यातल्या जागांची आठवण जाणकारांना हमखास येतेच. हसले मनी चांदणे या गीतातल्या शेवटच्या कडव्यातल्या

किती किती गं भाग्याची
भलतीच ओढ ही कामसुंदराची, नव्हे गं श्यामसुंदराची.... 

या ओळी माणिकताईंनी इतक्या सुंदरतेनं गायल्या आहेत, की त्या लडिवाळ सुरांना काय उपमा द्यावी ते सुचत नाही. कवी राजा बढे यांनी लिहिलेली प्रीतीची भावना व्यक्त करणारी कविता शेवटी इतक्या उंचीवर जाऊन पोहोचते, की श्यामसुंदराची ओढ लावणाऱ्या उदात्त प्रेमभावनेत ती रूपांतरित होते. 

आकाशवाणीसाठी पुरुषोत्तम मंगेश लाड यांनी ‘पुलं’ची केलेली नियुक्ती रसिकांसाठी पर्वणी ठरली. ‘पुलं’नी स्वरबद्ध केलेली आणि माणिकताईंनी गायलेली गाणी रसिकांसाठी प्रसारित करताना आम्हीही भाग्यवान आहोत अशी जाणीव होते. आज माणिक वर्मा यांच्या जन्मदिनी ‘पुलं’चेच शब्द आठवताहेत... ‘गाणे हा तिचा भक्तीचा विषय आहे. त्यामुळे कुणाचेही चांगले गाणे ऐकले, की ती रसिक श्रोत्यांच्या भूमिकेतून त्या गाण्याचा आनंद घेऊ शकते. गाणारी माणसे चांगली ऐकणारी असतातच असे नाही. बहुधा नसतात. माणिक नुसती चांगले गाणारी नाही, तर चांगले ऐकणारीही आहे.’

रसिकहो चांगलं ऐकणं आपल्या हातात आहे. अभिजात गाणं आकाशवाणीनं जपलं आहे. ही अभिजातता जोपासण्याचं काम रसिकांना करायचंय. माणिकताई आज आपल्यात नाहीयेत; पण त्यांच्या स्वरांचं चांदणं सदैव फुलतच राहणार, हसतच राहणार...या स्वरचांदण्याला सहस्र सलाम !

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
मधुकर राईलकर कोथरूड About
हा लेख रसिकाची शबदारती गायिकेचया सुराना वाचकाचिया भावले मना ,धनयवाद तुमहास!
1
1
Arun solanki About
No words to appreciate dr.pratima.thanks for your vision to start such series of article
1
1
नारायण गद्रे About
अती सुंदर
1
0
Sonali Rao About
Swarchandanyala shabdasumanancha ha salam sundar 💐
2
0

Select Language
Share Link
 
Search