Next
गुंफण साहित्य संमेलन रविवारी कावळेवाडी येथे
अनंत मनोहर साहित्य नगरीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
BOI
Wednesday, February 06, 2019 | 01:26 PM
15 0 0
Share this article:

सातारा : ‘सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमी व कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील जिव्हाळा साहित्य अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वे गुंफण सद्भावना साहित्य संमेलन रविवारी, दहा फेब्रुवारी २०१९ रोजी सीमाभागातील निसर्गरम्य अशा कावळेवाडी येथे होत आहे. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे आहेत,’ अशी माहिती अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, सीमाभागातील समन्वयक गुणवंत पाटील व जिव्हाळा साहित्य अकादमीचे अध्यक्ष प्रा. आर. के. ओऊळकर यांनी दिली. 

‘यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, कावळेवाडीत संमेलनाची जय्यत तयारी सुरू आहे. साहित्य नगरीला ‘ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर साहित्य नगरी’ असे नाव दिले असून, व्यासपीठाला ‘स्व. पुष्कराज बबन पोतदार व्यासपीठ’ असे नाव देण्यात आले आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता कावळेवाडीतील विठ्ठल मंदिरापासून संमेलन स्थळापर्यंत पारंपरिक पध्दतीने भव्य ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर साडेनऊ वाजता गोवा विधानसभेचे माजी सभापती राजेंद्र आर्लेकर, गोव्यातील माजी आमदार विनायक नाईक, डॉ. प्रशांत वरुटे यांच्या हस्ते व संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे दिमाखदार उद्घाटन होणार आहे. या वेळी स्व. प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सीए दिलीप गुरव, कवयित्री चित्रा क्षीरसागर (गोवा), ज्येष्ठ ग्रामीण कथाकार बबन पोतदार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे,’असेही त्यांनी सांगितले.

‘सकाळी ११.४५ वाजता कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवीसंमेलन होणार असून, त्यामध्ये कविता फडके, प्रा. अशोक अलगोंडी, भरमा कोळेकर (बेळगाव), स्वाती चेणगे-बाजारे (मसूर), प्रकाश क्षीरसागर, दीपा मिरिंगकर (पणजी, गोवा), विजय सातपुते, सुजित कदम, रवींद्र वेदपाठक (पुणे) हे सहभागी होणार आहेत. दुपारी दोन वाजता मराठवाड्यातील हिंगोली येथील साहित्यिक नरेंद्र नाईक यांचे ‘हिंदवी स्वराज्याचा उदय आणि मराठा मावळ्यांचे योगदान’ या विषयावर आणि दुपारी तीन वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांचे ‘सध्याची शेती शेतकऱ्यांना परवडते का?’ या विषयावर व्याख्यान होणार आहे,’ असेही चेणगे यांनी स्पष्ट केले.

‘सायंकाळी चार वाजता गुंफण पुरस्कार वितरण व संमेलनाचा समारोप समारंभ होणार असून, कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून खासदार राजू शेट्टी, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे, आमदार आनंदराव पाटील, ग्रामीण कथाकार बबन पोतदार व प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख सिद्धेश्वर पुस्तके उपस्थित राहणार आहेत. रामदास केळकर(पणजी), महेंद्र बाजारे (महुद बुद्रुक, जि. सोलापूर), डॉ. दादासाहेब चौगुले (बेळगाव), जयश्री घुले (पुणे) व मधुकर खरे (भुर्इंज, जि. सातारा) यांना गुंफण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे,’ असेही चेणगे यांनी सांगितले.

‘सीमाभागात मराठी भाषा, साहित्य, संस्कृतीला बळ देण्याच्या उदात्त भावनेतून हे संमेलन होत असून, ते भव्यदिव्य स्वरूपात साजरे व्हावे यादृष्टीने विविध समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. संमेलनाची जोरदार तयारी केली जात असून, साहित्यिक व साहित्य रसिकांच्या स्वागताला सीमाबांधव सज्ज झाले आहेत,’ असे आयोजकांनी सांगितले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search