Next
बॅडमिंटनमधील उगवता ‘तारा’
BOI
Friday, November 09, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

तारा शहाबॅडमिंटन या खेळात दिवसेंदिवस अनेक खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करताना दिसत आहेत. साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांच्यापासून प्रेरणा घेऊन आज शेकडो मुली या खेळाकडे वळत आहेत. केवळ वळत आहेत असे नव्हे, तर राज्याचे, देशाचे प्रतिनिधित्व करता यावे, यासाठी धडपडत आहेत. पुण्याची तारा शहा ही अशीच एक गुणी खेळाडू... ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या बॅडमिंटनपटू तारा शहाबद्दल...
...................
पाटणा, बिहार येथे झालेल्या अखिल भारतीय सबज्युनिअर गटाच्या बॅडमिंटन स्पर्धेत बारा वर्षांच्या तारा शहाने पंधरा वर्षांखालील गटात विजेतेपद मिळवले आणि आपण मानांकित खेळाडूंबरोबरही आत्मविश्वासाने खेळी करू शकतो, असा विश्वास उपस्थितांना दिला. या स्पर्धेत ताराला दुसरे मानांकन होते. अंतिम सामन्यात तिने उत्तर प्रदेशची चौथी मानांकित तनिशा सिंग हिच्यावर २१-१९, २१-८ असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. ताराने ऑगस्टमध्ये झालेल्या अखिल भारतीय स्पर्धेतील अंतिम सामन्यातही आपलेच वर्चस्व सिद्ध करून विजेतेपद मिळवले. जुलै महिन्यात नागपूरमध्ये झालेल्या स्पर्धेत तनिशा सिंगने ताराला पराभूत केले होते. यंदा मात्र ताराने त्या पराभवाचा वचपा काढला.

वयाच्या सहाव्या वर्षी बॅडमिंटनची रॅकेट हातात घेऊन ताराने सरावाला सुरुवात केली. सध्या ती निखिल कानिटकर बॅडमिंटन अकादमीत सराव करते. दर वर्षी ती साधारण आठ ते दहा स्पर्धां खेळते. या सर्व स्पर्धा मोठ्या स्तरावरील असतात. सध्याच्या घडीला तारा राष्ट्रीय मानांकन यादीत पहिल्या पाच खेळाडूंत गणली जाते. यामागे केवळ तिची मेहनतच कारणीभूत नसून तिला मिळत असलेले निखिल कानिटकर यांचे योग्य मार्गदर्शनही महत्त्वाचे ठरत आहे. आता तिला खेळाबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीवरही भर द्यावा लागणार आहे. 

सध्या तारा केवळ बारा वर्षांची असून पुढील काळात तिला खुल्या गटात आणखी मातब्बर खेळाडूंविरुद्ध खेळावे लागणार आहे. कारण या स्तरावर केवळ खेळ किंवा त्यातली गुणवत्ताच महत्त्वाची नसून मानसिक आणि शारीरिक तंदुरुस्तीदेखील महत्त्वाची ठरते. शिवाय तिला घरच्यांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे ड्रॉप आउट होण्याची अजिबात शक्यता नाही. ती विद्या व्हॅली स्कूलमध्ये शिकत असून, खेळाबरोबरच शिक्षणातही अग्रेसर आहे.  

तेरा वर्षांखालील गटात आज ती महाराष्ट्र चॅम्पियन आहे. त्याचबरोबर १६४७ रेटिंग गुण तिच्या खात्यावर जमा असून, ती राज्यात पहिल्या स्थानावर आहे. २०१८ हे वर्ष तिच्यासाठी स्वप्नवत ठरत आहे. जयपूर आणि आंध्र प्रदेश येथे झालेल्या अखिल भारतीय स्पर्धांमध्ये तिने विजेतेपद मिळवले व बॅडमिंटनमधील जाणकारांना आपली दखल घ्यायला लावली.  कोईमतूर आणि गोवा येथे झालेल्या स्पर्धेत तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले; मात्र तिने या मानसिकतेतून बाहेर पडून पाटणा येथे झालेली स्पर्धा जिंकून ती उणीव भरून काढली. तिचे प्रशिक्षक निखिल कानिटकर स्वतः ताराच्या खेळाबाबत बोलताना तिचे खूप कौतुक करतात. तिची हीच कामगिरी पंधरा वर्षांखालील गटानंतर खुल्या गटातही कायम राहिली, तर साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांची वारसदार म्हणून ती नावारूपाला येऊ शकते इतकी अफाट गुणवत्ता तिच्यात आहे.  

वयाच्या सहाव्या वर्षी रॅकेट हातात धरून बॅडमिंटनमध्ये उतरलेली तारा केवळ सहा वर्षांतच दोन आंतरराष्ट्रीय पदकांची मानकरी ठरली. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास, अशी कामगिरी खूप कमी खेळाडूंना जमली आहे. साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू याच तिच्या आदर्श असून या दोघींप्रमाणेच आपणही देशाचे प्रतिनिधित्व करावे व आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन क्षेत्रात यश मिळवावे हेच ध्येय तिने ठेवले आहे. 

अकादमीतील रोजचा सराव, तंदुरुस्तीसाठी आवश्यक असणारा व्यायाम आणि प्रशिक्षकांचे बहुमोल मार्गदर्शन, यामुळे तारा एक परिपूर्ण खेळाडू म्हणून भरारी घेत आहे. ताराने आतापर्यंत पुणे आणि राज्य स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवले आहे. खुल्या गटात जेव्हा ती आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटवेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय तोडीची बॅडमिंटनपटू मिळेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ सदरातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna gramopadhye About 228 Days ago
Best Wishes for.the. Future
0
0
Megha more About 340 Days ago
Excellent Artical
0
0

Select Language
Share Link
 
Search