Next
गणितज्ञाचा ‘रूपेरी’ गौरव
BOI
Thursday, October 05 | 03:45 PM
15 1 0
Share this story


भारतीय गणितज्ञ एस. रामानुजन यांचा वारसा चालवणारे बिहारमधील गणितज्ञ आणि ‘सुपर ३०’ अभिनव उपक्रमाचे जनक आनंदकुमार यांचे कार्य आता रूपेरी पडद्यावर येणार आहे. त्या निमित्ताने आनंदकुमार आणि त्यांच्या कार्याबद्दल...
.......... 

गणितज्ञ आनंदकुमार यांच्यावर येणाऱ्या चित्रपटाचे नाव ‘सुपर ३०’ असे असून, या चित्रपटात हृतिक रोशन त्यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आनंदकुमार यांनी त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. आपला जीवनप्रवास चित्रपटाच्या माध्यमातून बघण्यासाठी ते उत्सुक आहेत. विकास बहल हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून, अलीकडेच त्यांनी हृतिक रोशनसह आनंदकुमार यांची भेट घेतली.

बिहारस्थित आनंदकुमार यांनी आपल्या अपार बुद्धिमत्तेने देश-परदेशात नावलौकिक कमावला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील गणित विषयातील जर्नल्समध्ये त्यांचे लेख, संशोधन प्रबंध नियमितपणे प्रसिद्ध होत असतात. आयआयटी जेईई परीक्षेला बसू इच्छिणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ते पाटण्यात ‘सुपर ३०’ नावाचा मोफत मार्गदर्शन उपक्रम राबवतात. २००२मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात २०१७पर्यंत ४५० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ३९६ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

 डिस्कव्हरी वाहिनीने याची दखल घेऊन मार्च २००९मध्ये आनंदकुमार यांच्यावरील एक माहितीपट प्रसारित केला. आनंदकुमार यांना मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, हार्वर्ड विद्यापीठ, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया, टोकियो युनिव्हर्सिटी आणि स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये या उपक्रमाबद्दल माहिती देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ‘दी न्यूयॉर्क टाइम्स’मध्येही त्यांच्या या उपक्रमाची माहिती प्रसिद्ध झाली होती. माजी जपान सुंदरी आणि अभिनेत्री नोरिका फुजिवारा हिने पाटण्याला भेट देऊन एक माहितीपट तयार केला. ‘बीबीसी’वरदेखील अनेक कार्यक्रमांमध्ये आनंदकुमार यांना आमंत्रित करण्यात आले होते. ‘टाइम मॅगझिन’ने ‘बेस्ट ऑफ आशिया २०१०’मध्ये आनंदकुमार यांच्या ‘सुपर ३०’ उपक्रमाची दखल घेतली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही याची नोंद झाली आहे. आनंदकुमार यांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड डॉक्युमेंटेशन’तर्फे जुलै २०१०मध्ये ‘एस. रामानुजन’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. याशिवायही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कॅनडास्थित मानसोपचारतज्ज्ञ बिजू मॅथ्यू यांनी आनंदकुमार यांच्या जीवनावर एक पुस्तक लिहिले आहे.

एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या आनंदकुमार यांना दुर्बल आर्थिक स्थितीमुळे चांगल्या खासगी शाळेऐवजी हिंदी माध्यमाच्या सरकारी शाळेमध्ये शिक्षण घ्यावे लागले; मात्र तिथेच त्यांना गणिताची गोडी लागली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘नंबर थिअरी’ नावाचा शोधनिबंध सादर केला आणि तो ‘मॅथेमॅटिकल स्पेक्ट्रम आणि मॅथेमॅटिकल गॅझेट’मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांना केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळाला; मात्र दरम्यान त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि आर्थिक परिस्थिती प्रतिकूल होती. त्यामुळे ते तिथे जाऊ शकले नाहीत. 
घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी आनंदकुमार सकाळी गणिताचा अभ्यास करत आणि संध्याकाळी पापड विकण्याचा व्यवसाय करत; तसेच गणिताच्या शिकवण्यादेखील घेत. त्यांना हवी असलेली परदेशातील पुस्तके पाटणा विद्यापीठात मिळत नसल्याने ते सुट्टीच्या दिवशी सहा तासांचा प्रवास करून वाराणसीला जात. तिथे त्यांचा लहान भाऊ एन. राजम यांच्याकडे व्हायोलीन शिकत असे. तो हॉस्टेलमध्ये राहत असते. त्याच्या खोलीत शनिवार, रविवारी थांबून बनारस हिंदू विद्यापीठातील सेंट्रल लायब्ररीमध्ये जाऊन अभ्यास करत आणि सोमवारी घरी परत येत. 

१९९२मध्ये त्यांनी एक जागा भाड्याने घेऊन रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स सुरू केले. दोन विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या गणित वर्गाला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एका वर्षातच ३६वर पोहोचली. तीन वर्षांनंतर त्यांच्या या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ५०० झाली होती. २०००च्या सुमारास त्यांनी ‘आयआयटी जेईई’साठी मार्गदर्शन सुरू केले. त्यासाठी ते अत्यंत माफक शुल्क आकारत; पण एका गरीब विद्यार्थ्याला तेही भरणे परवडत नव्हते. त्यामुळे त्याने मोफत मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा आनंदकुमार यांच्याकडे व्यक्त केली. यातूनच आनंदकुमार यांना ‘सुपर ३०’ हा अभिनव उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळाली. २००२पासून त्यांनी हा उपक्रम राबवायला सुरुवात केली. दर वर्षी मे महिन्यात ‘रामानुजन स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स’तर्फे एक स्पर्धा परीक्षा घेतली जाते. त्यातून गरीब, पण हुशार, होतकरू अशा ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाते. त्यांची वर्षभर राहण्याची, अभ्यासाची, वह्या-पुस्तकांची सर्व सोय केली जाते. आनंदकुमार यांच्या आई जयंतीदेवी स्वतः या सर्व मुलांसाठी जेवण बनवतात, तर त्यांचा भाऊ प्रणवकुमार सर्व व्यवस्थापन पाहतो.

२००३ ते २०१७ दरम्यान त्यांच्याकडे शिकलेल्या ४५० पैकी ३९१ विद्यार्थ्यांची ‘आयआयटी’मध्ये निवड झाली आहे. २००८ ते २०१०पर्यंत दर वर्षी त्यांचे सर्वच्या सर्व तीसही विद्यार्थी आयआयटी जेईई परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर या प्रमाणात दर वर्षी अगदी अल्प प्रमाणात घसरण झाली; पण २०१७मध्ये पुन्हा ३० पैकी ३० विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.

‘सुपर ३०’ उपक्रमासाठी आनंदकुमार यांना सरकारकडून किंवा कोणत्याही खासगी संस्थेकडून मदत मिळत नाही. कोणतीही देणगीही ते घेत नाहीत. रामानुजन इन्स्टिट्यूटमधून मिळणाऱ्या उत्पन्नामधूनच ते हा खर्च करतात. ‘सुपर ३०’च्या लक्षणीय यशानंतर त्यांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या, तसेच सरकारकडूनही आर्थिक मदतीची विचारणा झाली; पण त्यांनी त्याला नकार दिला. स्वबळावरच ते हा उपक्रम राबवत आहेत. 

त्यांच्या या कार्याची दखल घेऊन गेल्या दोन सप्टेंबर रोजी प्रसारित झालेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमातही त्यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. आता चित्रपट तयार होणार असल्यामुळे त्यांचे कार्य अधिक प्रकाशात येण्यासाठी आणि आणखी अनेकांना प्रेरणा मिळण्यासाठी मदत होणार आहे.

(आनंदकुमार यांच्याबद्दलच्या एका कार्यक्रमाचा व्हिडिओ https://youtu.be/tVSzJsNEBtU या लिंकवर पाहता येईल.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link