Next
माणदेशी एक्स्प्रेस : ललिता बाबर
BOI
Friday, February 16 | 06:45 AM
15 0 0
Share this story


‘माणदेशी एक्स्प्रेस’ या नावाने ओळखली जाणारी धावपटू ललिता बाबर ही सुवर्णकन्या पी. टी. उषानंतरची पहिलीच दीर्घ पल्ल्याची धावपटू आहे, जी तब्बल ३२ वर्षांनंतर अॅथलेटिक्स ‘ट्रॅक अँड फिल्ड’मध्ये ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली. ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख धावपटू  ‘ललिता बाबर’बद्दल...
....................
ललिता बाबरसाताऱ्याची ललिता बाबर भारताची आजवरची सर्वांत यशस्वी दीर्घ पल्ल्याची धावपटू (लॉंग डिस्टन्स रनर) आहे. ‘रिओ ऑलिम्पिक’मध्ये ललिताला पदकाने जरी हुलकावणी दिली असली, तरी तिच्या खेळाने रिओ ऑलिम्पिकमधीलच नव्हे, तर जागतिक क्रीडाक्षेत्राची मने जिंकली. २८ वर्षांची विवाहित ललिता आज आपल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत आगामी ‘टोकिओ ऑलिम्पिक’साठी तयारी करत आहे. खरे तर तिचे वय पाहता, ही तिला पदक मिळविण्याची अखेरची संधी ठरू शकते.

पी. टी. उषा‘माणदेशी एक्स्प्रेस’ या नावाने ओळखली जाणारी ललिता बाबर ही सुवर्णकन्या पी. टी. उषानंतरची पहिलीच दीर्घ पल्ल्याची धावपटू आहे, जी तब्बल ३२ वर्षांनंतर अॅथलेटिक्स ‘ट्रॅक अँड फिल्ड’ प्रकारात ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली. याआधी १९८४मध्ये उषाने अशी कामगिरी केली होती. अर्थात या दोघींमध्ये समान गोष्ट एकच, की दोघींनाही थोड्याच वेळेतील फरकाने पदकाने हुलकावणी दिली. ललिता सध्या निकोलाय सेनसेरेव यांच्याकडे सराव करत असून ‘अँग्लियन मेडल हंट’ ही कंपनी तिला प्रायोजित करते आहे.

ललिता बाबरज्या गावात वयाची अठरा वर्षं पूर्ण झाली, की मुलींचे विवाह लावून दिले जातात, अशा गावातून आलेली ललिता धाडस करून क्रीडा क्षेत्रात उतरली. तशा जिद्दीने ती खेळतही आहे. तिची आई निर्मला आणि वडील शिवाजी यांनी तिला यामध्ये सर्वतोपरी सहकार्य केले. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या ललिताला धावण्याचे आकर्षण शालेय जीवनापासूनच होते. घरापासून शाळा तशी लांब होती आणि उशीर झाला, की धावतच शाळा गाठायची. तिची हीच सवय पुढे जाऊन अडथळा शर्यतपटू (स्टीपलचेस रनर) म्हणून कारकीर्द घडवणारी ठरली.  

ललिता जेव्हा पुण्यात आली, तेव्हा धावण्याचे बूट घेण्यासाठी तिच्याकडे सहाशे रुपयेही नव्हते. २००७मध्ये तिची कामगिरी पाहून तिला भारतीय रेल्वेने नोकरी दिली. या नोकरीच्या पहिल्या पगारातून तिने ब्रँडेड कंपनीचे बूट विकत घेतले होते. २००५मध्ये पुण्यात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत अडथळा शर्यत प्रकारात प्रथमच सहभागी झालेल्या ललिताने सुवर्णपदकाला गवसणी घातली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. विवाहानंतर आलेल्या सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असतानाही तिच्यातील जिद्द कमी झालेली नसून, २०२०मधील टोकिओ ऑलिम्पिक हेच आता तिचे लक्ष्य आहे.

दीर्घ पल्ल्याची धावपटू म्हणून ललिताची कामगिरी अत्यंत सातत्यपूर्ण आहे. तिने २०१२, २०१३ आणि २०१४ या तीनही वर्षी भारतीय गटात मुंबई मॅरेथॉन जिंकून हॅटट्रिक पूर्ण केली.  २०१४च्या आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतही पदक मिळवले. २०१५मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत ललिताने आठव्या क्रमांकावर अंतिम फेरी गाठली होती व रिओ ऑलिम्पिक पात्रता फेरीच्या निकषातही ती बसली होती. अशी कामगिरी करणारी ती तेव्हा पहिलीच भारतीय ठरली. त्यानंतर २०१६च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये २.३८.२९ अशी वेळ देत ‘रिओ’चा अंतिम निकष पूर्ण करून ती पात्र ठरली होती. रिओ ऑलिम्पिकमध्येदेखील तिने ९.१९.७६ अशी वेळ देत अंतिम फेरी गाठली होती; मात्र तरीही तिला पदकाने हुलकावणी दिली. तिच्या याच कामगिरीचे जागतिक स्तरावर प्रचंड कौतुक झाले. महाराष्ट्राबरोबरच हरियाणा सरकारनेही रोख पुरस्कार देऊन तिचा गौरव केला होता. 

दिल्लीत नुकत्याच झालेल्या फेडरेशन करंडक स्पर्धेत तिने ९.२७.०९ अशी विक्रमी वेळ नोंदवली. हा स्पर्धा विक्रम ठरला, तो आजही अबाधित आहे. शिवाय यंदा तिला अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले, तसेच वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटूचाही पुरस्कार तिला मिळाला. ‘इंडियन स्पोर्टस् अवॉर्ड २०१५’चा विशेष पुरस्कारही तिलाच मिळाला. ‘इंचिऑन आशियाई’ स्पर्धेत तिने २०१४मध्ये मिळवलेले रौप्यपदक आणि २०१५मध्ये वुहान येथील स्पर्धेत आशियाई विजेती बनण्याचा मान तिच्या कारकिर्दीचा कळसाध्याय ठरला आहे. इंचिऑनमध्ये तिने ९.३५.३७ अशी वेळ दिली होती, काही सेकंदांनी तिचे सुवर्णपदक हुकले होते. त्याची कसर भरून काढताना तिने वुहानला आशियाई सुवर्ण पटकावले.

पी. टी. उषाखरे तर अॅथलेटिक्स ही सर्व खेळांची जननी मानली जाते. उषानंतर लांब उडी प्रकारात अंजू बॉबी जॉर्जचा अपवाद वगळता आपल्याकडे त्या दर्जाचा खेळाडूच नव्हता, ही खूपच लाजिरवाणी गोष्ट होती. ललिताने तीन हजार मीटर अडथळा शर्यतीमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत ही उणीव भरून काढली. आता टोकिओत पदक मिळविण्याची तिला अखेरची संधी आहे.

ललिताचे पती डॉ. संदीप भोसले हे भारतीय महसूल विभागात सेवेत आहेत. ललिताला आणि तिच्या कारकिर्दीला त्यांचा पूर्ण पाठिंबा आहे. केवळ चूल आणि मूल यात न अडकता ललिताने कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करावे व सध्या तरी टोकिओ ऑलिम्पिकची तयारी करावी, असेच त्यांनाही वाटते. स्वतःच्या अकादमीतही ललिता नवनवीन खेळाडू तयार करत आहे. शिवाय दुसरीकडे टोकिओसाठी तयारीही करत आहे.

टोकिओ स्पर्धेला आणखी दोन वर्षं बाकी आहेत आणि त्यापूर्वी होणाऱ्या सर्व पात्रता स्पर्धांमध्ये ललिताला सरस कामगिरी करून पात्रता मिळवावी लागणार आहे. हे सर्व वरवर दिसते तेवढे सोपे नाही; पण जिद्दी ललिता हे सगळे निकष पूर्ण करेल असा विश्वास तिची आजवरची कामगिरी देते. खेळाडूला त्याचा अनुभव इथेच कामी येतो आणि त्यातूनच इतिहास घडत असतो. असाच इतिहास घडविण्यासाठी ललिता सज्ज होत आहे आणि आपणही या घटनेचे साक्षीदार होण्यासाठी आतुर आहोत.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Umesh Zirpe About 303 Days ago
Extremely inspiring . Must read by all aspiring athletes Thanks Amitji for all wonderful , energetic articles...
0
0

Select Language
Share Link