Next
महर्षी धोंडो केशव कर्वे
BOI
Wednesday, April 18, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this story

१९व्या शतकाच्या शेवटच्या दशकात त्या वेळच्या रुढी, परंपरांवर घणाघाती प्रहार करून, स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवणाऱ्या आणि त्यांचं शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाहासारखं उदात्त कार्य करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा १८ एप्रिल हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी.....
......
१८ एप्रिल १८५८ रोजी कोकणातील मुरुडमध्ये (ता. दापोली, जि. रत्नागिरी) जन्मलेले धोंडो केशव ऊर्फ महर्षी अण्णासाहेब कर्वे हे महिलांच्या कल्याणासाठी, शिक्षणासाठी आणि विधवा-पुनर्विवाहाच्या कार्यासाठी जगद्विख्यात झालेलं आदरणीय आणि पूजनीय व्यक्तिमत्त्व! 

स्त्रियांना पुरुषांप्रमाणेच मानाने जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला. समानतेने जगण्याचा हक्क मिळवून दिला. आपली पत्नी निर्वतल्यावर त्यांनी गोदूताई (आनंदीबाई कर्वे) या विधवेशी समाजाचा रोष पत्करून लग्न करून एक नवीन धाडसी पायंडा पाडला होता. अण्णासाहेबांनी विधवा-विवाहाला विरोध करणाऱ्या प्रतिगामी प्रवृत्तींना आवर घालण्यासाठी विधवा विवाह प्रतिबंध निवारक मंडळाची स्थापना केली. तसंच बालविवाह, जरठ-कुमारी विवाह, केशवपन यांसारख्या अन्याय्य रूढींत अडकलेल्या अनेक स्त्रियांना मोकळा श्वास मिळावा म्हणून इ. स. १८९६मध्ये त्यांनी सहा विधवा महिलांसह अनाथ बालिकाश्रम काढला. विधवा विवाहोत्तेजक मंडळाचीही त्यांनी स्थापना केली. 

पुण्यातील हिंगणे (कर्वेनगर) इथल्या माळरानावर त्यांनी हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची (महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था) सुरुवात अक्षरशः एका झोपडीतून केली. त्या कार्यामुळे त्या वेळच्या कर्मठ, सनातन पुणेकरांचा रोष त्यांना पत्करावा लागला होता. संस्था चालविण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्यामुळे कित्येक वर्षं त्यांना हिंगणे ते फर्ग्युसन कॉलेजपर्यंत पायी प्रवास करावा लागत होता. आपल्या संस्थांसाठी कुणाकडे देणगी मागायला गेल्यावर कित्येक वेळा त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूकही मिळत होती. तरीही अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने त्यांनी आपलं कार्य चालू ठेवलं. पुण्यामध्ये त्यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. 

अनेक भारतीय विद्यापीठांनी त्यांना डी. लिट. देऊन सन्मानित केलं होतं. त्या काळच्या रूढी, परंपरांवर घणाघाती प्रहार करून, स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याच्या त्यांच्या क्रांतिकारी, अतुलनीय कार्याची दाखल घेऊन भारत सरकारने त्यांना १९५५ साली पद्मविभूषण आणि लगोलग १९५८ साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब देऊन त्यांचा उचित सन्मान केला होता. 

नऊ नोव्हेंबर १९६२ रोजी वयाच्या १०४व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

(महर्षी कर्वे यांच्याबद्दलची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/1dP1X1 या लिंकवर क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Parashuram Babar About 337 Days ago
Very very nice
0
0

Select Language
Share Link