Next
रोलर स्केटिंगची नवी राणी!
BOI
Friday, May 18 | 06:45 AM
15 0 0
Share this story

जिया बैजलरोलर स्केटिंग आणि आइस स्केटिंग या क्रीडा प्रकारांवर वर्चस्व गाजवणारे देशातील खेळाडू मोजकेच आहेत. श्रुती कोतवाल हे या प्रकारातील गाजलेले नाव. आता पुण्यातील जिया बैजल ही छोटी खेळाडूदेखील या प्रकारात चांगली नावारूपाला येत आहे. एकाच वेळी रोलर स्केटिंग, आइस स्केटिंग आणि धावणे या तिन्ही क्रीडा प्रकारांत नाव कमवायचे ध्येय तिने निश्चित केले आहे. ‘क्रीडारत्ने’ सदरात या वेळी पाहू या जिया बैजलबद्दल...
..............
रोलर स्केटिंग किंवा त्याच्या जोडीला आइस स्केटिंग या क्रीडा प्रकारांत वर्चस्व गाजवणारे भारतीय खेळाडू मोजकेच आहेत. त्यातही महाराष्ट्रात हे प्रमाण कमीच होते; मात्र आता पुण्यातून जिया बैजल हिच्या रूपाने या क्रीडा प्रकारात वर्चस्व गाजवणारी नवी गुणवत्ता नावारूपाला येत आहे.

भारताची आंतरराष्ट्रीय आइस स्केटिंग खेळाडू व प्रशिक्षक श्रुती कोतवाल आणि राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक हर्षल मुंढपन यांच्याकडे जिया बैजल वयाच्या चौथ्या वर्षापासून रोलर स्केटिंग आणि पाठोपाठ आइस स्केटिंगचे धडे गिरवायला लागली. रोलर स्केटिंगसाठी पुण्यात बालेवाडी, महेश विद्यालय, मोरवाडी, सिम्बायोसिस आणि विमाननगर येथील ट्रॅकवर ती रोज चार तास सराव करते. ट्रॅकचे ठिकाण बदलले, तरी जियाची एकाग्रता कायम असते. तिचा ‘पिकअप, ब्रेक आणि कंट्रोल’ अफलातून आहे. ती सध्या विखे-पाटील शाळेत चौथ्या इयत्तेत शिकत असून, रोलर स्केटिंगमध्ये तिचे नाव पदार्पणापासूनच गाजत आहे. अलीकडेच विरार येथे झालेल्या रोलर स्केटिंग स्पर्धेत जियाने आठ ते १० वर्षांखालील गटात रौप्यपदक पटकावले.

रोलर स्केटिंग हा खेळ वाटतो तितका स्वस्त नाही. उच्च दर्जाच्या स्पर्धेत नामांकित कंपनीचे स्केटिंग किट घ्यायला किमान पन्नास हजार रुपये खर्च येतो. जे रोलर स्केटिंगबाबत आहे, तेच आइस स्केटिंगबाबत आहे. या स्पर्धेसाठी जिया मुंबईतील एस्सेल वर्ल्ड येथील आइस ट्रॅकवर सराव करते. पुण्यात काही जिल्हा, राज्यस्तरीय स्पर्धाही होतात त्यातही ती सातत्याने सहभागी होते. आइस स्केटिंगच्या मानांकन स्पर्धा दिल्ली, सिमला येथे होतात आणि त्यातील स्पर्धांत जियाने आजवर पदकांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. या उन्हाळी मोसमात आंतरराष्ट्रीय स्तरावरचे सराव शिबिर होणार असून, त्यात श्रुती कोतवाल स्वतः मार्गदर्शन करणार आहेत. रोलर स्केटिंगचे शिबिर पुण्यात होणार असून, आइस स्केटिंगचे शिबिर मुंबई, दिल्ली आणि सिमला येथे टप्प्याटप्प्याने होणार आहे. यातूनच जियाला मोठ्या, नामांकित खेळाडूंबरोबर सराव करण्याची संधी मिळणार आहे.

या वर्षी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत जियाने ब्राँझपदक पटकावले होते. ती राष्ट्रीय पात्रता स्पर्धा होती आणि या आठ ते १० वर्षांखालील स्पर्धेत जिया सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू ठरली. यंदाच्या मोसमात होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने कोणतेही पदक मिळवले, तर ती राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल. हा टप्पा असा आहे, की तिने राष्ट्रीय स्पर्धेतही चमक दाखवली, तर तिला एकदम आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे व्यासपीठ खुले होईल. त्यासाठी तिला एप्रिल आणि मे महिन्यातील सराव शिबिरात खूपच मेहनत करावी लागणार आहे. स्किल डेव्हलपमेंट, शारीरिक तंदुरुस्ती आणि स्टॅमिना वाढवण्यावर भर द्यावा लागणार आहे. त्यासाठी हर्षल मुंढपन विशेष लक्ष देत आहेत. शिवाय तिचे पालक तिची कारकीर्द घडविण्यासाठी तिच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत. या खेळाचा समावेश अद्याप ऑलिंपिकमध्ये झाला नसला, तरी यंदापासून हा खेळ ज्युनिअर ऑलिंपिकमध्ये खेळला जातो. त्यामुळे या खेळात पुढे किती ‘स्कोप’ आहे, याबद्दल खेळाडू आणि पालकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर झाला आहे. 

या खेळात तंदुरुस्ती टिकविण्यासाठी धावण्याचा व्यायाम करणे सर्वांत महत्त्वाचे असते. म्हणूनच जियाने धावण्याच्या एका शर्यतीत सहभाग घेतला होता. ८० मीटरची ही धावण्याची स्पर्धा जियाने केवळ अकरा सेकंदांत पूर्ण केली. आता भविष्यात धावण्याच्या शर्यतींतही सहभागी होण्यासाठीची तयारी तिने सुरू केली आहे. एकाच वेळी रोलर स्केटिंग, आइस स्केटिंग आणि धावणे या तिन्ही क्रीडा प्रकारांत नाव कमवायचे ध्येय तिने निश्चित केले आहे. याचा तिला दुहेरी फायदा होणार आहे. एक तर धावण्याच्या स्पर्धेत सहभागी झाल्याने स्टॅमिना वाढणार आणि दुसरे म्हणजे तिला स्केटिंग अधिक वेगवान करण्यासाठी त्याचा लाभ होणार आहे.

यंदाच्या मोसमात चौदा वर्षांखालील गटातही तिचा समावेश होणार असल्याने तिचे प्रशिक्षक तिच्यासारखेच आशावादी आहेत. भारताबाहेरील किंवा देशातीलच वरिष्ठ गटातील स्पर्धेत पदक जिंकले, तर जिया ज्युनिअर ऑलिंपिकलादेखील पात्र ठरेल. यासाठी येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या फेडरेशन करंडक स्पर्धेत तिला सरस कामगिरी करावी लागणार आहे. तरच ती वरिष्ठ गटात पात्र ठरेल. एकदा का जियाने हा टप्पा पार केला, तर ती केवळ आंतरराष्ट्रीय खेळाडू बनेल असे नव्हे, तर श्रुती कोतवालनंतर भारताची आणखी एक स्केटिंग खेळाडू म्हणून नावारूपाला येऊ शकेल.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शुक्रवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘क्रीडारत्ने’ या त्यांच्या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
शिवकुमार बैजल About 242 Days ago
जिया बैजल तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा। दादाजी
0
0

Select Language
Share Link