Next
‘....वेगळा मुलगा ही माझी तेव्हापासूनची ओळख’
BOI
Friday, May 05, 2017 | 06:45 AM
15 3 0
Share this article:

तन्वीर नाट्यधर्मी पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्रदीप मुळ्ये यांची प्रसन्न मुद्रा.कमर्शिअल आर्टिस्ट, अभिनेते, कलादिग्दर्शक, दिग्दर्शक, नेपथ्य-वेशभूषा-प्रकाश योजनाकार, प्रकाश-रंग-रसशास्त्राचे अभ्यासक असे बहुपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रदीप मुळ्ये. नेपथ्यकार द. ग. गोडसेंचा शिष्य असण्याचा अभिमान बाळगणारे प्रदीप मुळ्ये यांनी पं. सत्यदेव दुबे, दामू केंकरे, अरविंद देशपांडे, गुरू पार्वतीकुमार, पुरुषोत्तम बेर्डे, मंगेश कदम, विजय केंकरे ते अद्वैत दादरकर अशा भिन्न प्रवृत्तींच्या चार पिढ्या आणि सुमारे ७५ दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. महिंद्र नटराज, मुंबई मराठी साहित्य संघ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, तन्वीर सन्मान यांसह महाराष्ट्र सरकारचे तब्बल २५ पुरस्कार प्रदीप मुळ्ये यांना मिळाले आहेत. तसेच झी पुरस्कार, मटा सन्मान, मिफ्ता अशाही अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. असे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व असलेले प्रदीप मुळ्ये यांच्याशी ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मंगेश कदम आणि ‘रंगवाचा’चे संपादक मंडळ यांनी केलेल्या संवादाचे प्रसाद घाणेकर यांनी केलेले हे शब्दांकन. तीन भागांतल्या या मुलाखतीचा हा पहिला भाग.
..................

- प्रदीप, तुमच्या घरातलं, शाळेतलं, परिसरातलं वातावरण कलावंत म्हणून वाढ होण्यासाठी कितपत पोषक होतं?
- आमच्या घरात आई आणि माझे तीन मोठे भाऊ यांच्याकडे कलेचा वारसा आहे. (मोठा भाऊ ‘जेजे’चा सुवर्णपदक विजेता, दुसरा जाहिरात क्षेत्रात, तिसरा पंच ऑपरेटरची नोकरी करून फाइन आर्टस् शिकत होता.) वडील संसार चालवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कष्टांनीच मेटाकुटीस येत. त्यामुळे त्यांना यात फारसं स्वारस्य असल्याचं स्मरत नाही; पण माझी आई ही आताचा शब्द वापरायचा तर ‘अफलातून बाई’ होती. भाजी चिरायच्या विळीवर (कारण घरात कात्री असण्याएवढी सुबत्ता नव्हती) चोळीसाठीचं कापड कापून ती हातशिलाईनं चोळी शिवत असे. त्या वेळी ‘संत सखू’ सिनेमातील नायिकेची चोळी ही फॅशन होती. बरोबर तशीच चोळी घरी शिवून आई वापरत असे. त्यामुळे आमच्या चाळीत तिला ‘सखूबाई’ असंच नाव पडलं होतं. (तिचं मूळ नाव सुंदराबाई). आपण ज्याला हल्ली ‘फॅशन सेन्स’ म्हणतो ना, तो माझ्या आईकडे खूप चांगला होता. मी नववीत असल्यापासून तिनं मला वेगळ्या पद्धतीचे कपडे घालायला, केस वाढवायला प्रोत्साहन दिलं. मला तिनं जॅकेटही शिवून दिलं होतं. अशा वेश-केशभूषेमुळे अगदी तेव्हापासून ‘वेगळा मुलगा’ ही माझी ओळख बनली. हा आत्मविश्वास मला आईकडून मिळाला. 

मी माझ्या मोठ्या भावांचा तर हरकाम्या मदतनीस होतो. त्यांच्या रंगांच्या बाटल्यांची बुचं लावणं, त्या नीट ठेवणं, वेगवेगळ्या प्रकारचे ब्रश धुऊन ठेवणं, त्यांच्या असाइनमेंट, प्रोजेक्टसाठी काही वेळा पूर्ण, तर काही वेळा अंशत: मदत करणं ही कामे मी अगदी लहानपणापासून केली आहेत. मी शिरोडकर हायस्कूलचा विद्यार्थी. माझं अक्षर चांगले असल्यामुळे मला चिटणीस सरांनी इंटरमीजिएट ड्रॉइंगच्या परीक्षेला बसवलं. माझी चित्रकला माझ्या भावांइतकी चांगली नव्हती. तरीही सरांनी मेहनत घेतली आणि आणि मी पासही झालो ही परीक्षा. आमची शाळा अभ्यासाव्यतिरिक्तही इतर सर्व कला स्पर्धा, खेळ, सण यांत हिरीरीने भाग घेत असे. त्यात मी रात्र-रात्रभर रमत असे. आम्ही भाऊ राज्य नाट्य स्पर्धेतील सगळी नाटकं बघायचो. दिवाळी अंक वाचायचो. त्यातली दलालांची चित्रं नंतर मी जमा केली होती. माझ्याकडे दलालांच्या सुमारे २०० चित्रांचा संग्रह होता. या सगळ्याचा माझ्या जडणघडणीत मोठा सहभाग आहे. त्या वेळी अकरावीला चित्रकलेचा पेपर २०० मार्कांचा असे. ९०० मार्कांची एकूण परीक्षा. त्यामुळे मी हा धोका न पत्करता चित्रकला विषय घेतला नाही; पण माझा भाऊ ‘करिअर पॉलिटेक्निकमध्ये’ ‘फाइन आर्टस्’चा कोर्स करत होता. त्याचा प्रभाव पडल्यामुळे असेल, पण मी ‘जेजे’ला प्रवेश घ्यायचं ठरवलं. 

त्या वेळी प्रवेशासाठी अकरावीच्या परीक्षेला हा विषय घेतलेला असणं अनिवार्य होते. त्यामुळे मला प्रवेश मिळाला नाही. ‘करिअर पॉलिटेक्निक’ बंद पडलं होतं. मी दादरच्या मॉडर्न आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. तिथे ‘जेजे’पेक्षा वेगळ्या अभिव्यक्तीचे शिक्षक होते. तिथे शिल्पकाम, फाइन आर्टस् याचं प्रशिक्षण दिलं जायचं. इथं पहिल्या वर्षी मी गुणवत्ता यादीत १७वा आल्यामुळे मला दुसऱ्या वर्षी ‘जेजे’ला प्रवेश मिळाला; पण इथं आल्यावर लक्षात आलं, की इथली मुलं आपल्यापेक्षा फारच हुशार दिसतायत. म्हणजे मला आठवतंय, की मी आईकडे येऊन रडलो, की मी ‘जेजे’त नापासच होणार; पण माझी आई म्हणजे एकदम आत्मविश्वासाचा झराच. ती मला म्हणाली, ‘तुला सगळं उत्तम येतंय, तू पहिला येशील’ आणि खरंच पहिल्या आठवड्यात माझ्या सातही असाइनमेंट्स बोर्डावर लागल्या. नंतर मात्र मी मागे वळून पाहिलं नाही. दर वर्षी मी टॉपर. फ्री-शिप, स्कॉलरशिप यावर मी माझं शिक्षण पूर्ण केलं. ‘कमर्शिअल डिप्लोमा’चा मी गोल्ड मेडलिस्ट आहे; पण हा कोर्स करत असतानाच माझ्या लक्षात आलं होतं, की माझा कल ‘फाइन आर्टस्’कडे जास्त आहे.

- मग ‘नाटक’ या विषयाकडे तुम्ही कधी वळलात?
गिरणगावात बालपण गेलं असल्यामुळे नाटकाचं गारुड माझ्या मनावर होतंच. त्यात शाळेपासून ‘जेजे’पर्यंत माझा वर्गमित्र असलेला संजय पवार यानं आम्हाला ‘जेजे’मध्ये सीनिअर असलेला पुरुषोत्तम बेर्डे हौशी कलावंत शोधतोय असं सांगितलं. मग मी या मंडळींना जाऊन भेटलो. मला अभिनयात फार रस नव्हता; पण तंत्राच्या बाजूंकडे माझा कल होता. त्या वेळी दुर्मीळ असलेलं यंत्र म्हणजे टेपरेकॉर्डर. माझ्या एका मैत्रिणीनं ‘तो केवळ मीच वापरायचा आणि काम झालं की परत आणून द्यायचा,’ अशी अट घालून आम्हाला एकांकिकेसाठी उपलब्ध करून दिला. तो मी बहुधा चांगला हाताळला असणार. कारण ती एकांकिका चांगली झाली. हा माझा नाट्यक्षेत्रातला प्रवेश. मग मी तालमींना नियमित उपस्थित राहायला लागलो. रंगमंच झाडून ठेवणं, पुढे-पुढे तर लादीसुद्धा मी पुसून ठेवत असे. स्वच्छतेची ही माझी आवड अजूनही आहे. मंगेशसारखे अनेक मित्र त्यामुळे घाबरतात. अशा रीतीनं मी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘या मंडळी सादर करू या’ या संस्थेत दाखल झालो. 
‘जेजे’तलं शिक्षण संपल्यावर मला पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यात रस नव्हता. मला वेगळं काही तरी शिकायचं होतं. म्हणून मी फिल्मसिटीकडे वळलो. तीन वर्षे मी फिल्मसिटीत काढली. ‘जेजे’मध्ये मी फाउंडेशन कोर्सला जे ज्ञान मिळवलं, तेवढं पुढील अभ्यासक्रमात मिळवू शकलो नाही; पण त्याहीपेक्षा अधिक ज्ञान फिल्मसिटीत मिळालं. माझं तिथलं शिक्षण प्रत्यक्ष शिकण्यापेक्षा निरीक्षणातून झालं. ते निरीक्षण आज मला अनेक ठिकाणी उपयोगी पडलं आहे. उदाहरणार्थ, तेव्हा ‘शान’ या हिंदी सिनेमासाठी काही परदेशी तंत्रज्ञ आले होते. त्यांची कामाची पद्धत बघून मी खूप काही शिकलो.

- पण मग त्या क्षेत्रातच पुढे जावं, असं नाही का वाटलं?
असिस्टंट डायरेक्टर होणं हे काही माझं ध्येय नव्हतं आणि माझा कल बघून मला या क्षेत्रातल्या ज्येष्ठांनी स्पष्ट सांगितलं, की असं करून तू तुझ्या कलात्मक आयुष्याची मोलाची वर्षं फुकट घालवतो आहेस. त्यांचा सल्ला प्रमाण मानून मी पुढे जाहिरातीतल्या फोटोग्राफी क्षेत्रात शिरलो. त्यामुळे मला कलात्मक आनंद व भरपूर पैसे कमवणं दोन्ही गोष्टी सहज शक्य झाल्या.

- ‘अलवरा डाकू’मध्ये तुम्ही खूप वेगवेगळे प्रयोग केलेत. त्याविषयी थोडं सांगा.
आता मागे वळून बघतो तेव्हा आम्ही यात गिमिक्सच जास्त केल्या, असं मला वाटतं. आम्ही त्यात छान रमलो आणि जे जे करून पाहावंसं वाटत होतं, ते सगळं आम्ही करून पाहिलं; पण एकदा ‘बावनखणी’ नाटकाचा पडदा उघडल्यावर द. ग. गोडसे यांनी उभारलेला सेट पाहिला आणि लख्ख जाणवलं, की असं काही काम आपल्या हातून व्हायला पाहिजे. द. ग. गोडसे आमच्या कॉलेजचे व्हिजिटिंग लेक्चरर होते; पण ते जे इलस्ट्रेशन शिकवत, तो माझा विषय नसल्यामुळे मी त्यांच्या तासाला तेव्हा बसत नसे. ते खूप छान शिकवायचे, अशी मित्रांच्यात चर्चा असे; पण त्यांना मी गुरुस्थानी मानतो. कारण त्यांच्या अखेरच्या काळातली काही वर्षं मी त्यांच्या सान्निध्यात घालवलेली आहेत. त्यांच्या थेट शिकवण्याचा, मार्गदर्शनाचा जरी मला लाभ झाला नाही, तरी त्यांचे विचार मला घडवण्यास कारणीभूत ठरले. त्यांची शिकवण मोलाची ठरली. ‘तुम्ही तुमचे विचार वापरून सेट डिझाइन केलात, तरच तुमचं सेट डिझायनिंग अर्थपूर्ण होऊ शकेल. नाही तर तुम्ही फक्त डेकोरेटरच व्हाल,’ ही दृष्टी मला त्यांच्यामुळे मिळाली. हा फरक त्यांच्यामुळे घडू शकला.

- महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा खूप प्रतिष्ठेची मानली जाते. ७० ते ८० या दशकात तर त्यातले यश म्हणजे व्यावसायिक नाटकांसाठीची संधी मानली जात असे. या स्पर्धेबाबत तुमचा काही अनुभव?
१९८३ साली ‘कोळीष्टक’ या नाटकाचा सेट मी केला होता. यात गॅरेजचा सेट होता आणि नाटक झाल्यावर टिचक्या मारून, हा खरंच पत्रा वापरलाय की काय हे बघायला प्रेक्षक, रंगकर्मी आत आल्याचं मला आठवतं. त्याआधी १९८२मध्ये ‘आविष्कार’च्या ‘दुर्गा झाली गौरी’ची वेशभूषा व नेपथ्याचे काम पुरुषोत्तम बेर्डेंमुळे माझ्याकडे आले. यात नृत्यमय हालचालींसाठी मोकळा रंगमंच मिळू शकेल असा सेट बनवण्याची गरज होती. हे माझे पहिलेच काम; पण या वेळची एक घटना मला नेपथ्य यशस्वी होण्यासाठी ते उभारण्याचा बॅकस्टेजच्या हातांचा अनुभव किती मोलाचा असतो, हे शिकवणारी ठरली. यात मी वरून एक गोल मच्छरदाणी सोडली होती आणि नंतरचा प्रवेश सुरू होताना ती मच्छरदाणी हळूहळू वर जाते, असे दाखवले होते. छबिलदासच्या रंगमंचावर (खरं म्हणजे तो फक्त ‘शाळेचा हॉल’) ही मच्छरदाणी वर कशी न्यायची, हे मला सुचत नव्हतं. माझी अस्वस्थता बघून सीताराममामा (‘आविष्कार’चा अगदी स्थापनेपासूनचा बॅकस्टेज कार्यकर्ता) मला म्हणाला, ‘अरे, त्यात काय एवढं? तू काळजी करू नकोस. प्रयोगाच्या वेळी मी तुला मच्छरदाणी बरोबर वर नेऊन दाखवतो.’ मला ते काही केल्या पटेना आणि माझं समाधान झालं नाही, की मी फार अस्वस्थ असतो. बाकीच्या थिएटर्समध्ये आम्ही ती तशीच हळूहळू वर घ्यायचो. छबिलदासच्या हॉलमध्ये तसं करायला वर कुठे जागाच नव्हती; पण सीताराममामाच्या अनुभवी नजरेनं त्यात एक युक्ती शोधली. तिथं ती सरळ वर नेण्याऐवजी ९० अंशात आडवी करून त्यानं ती हळूहळू वर नेली. तेव्हापासून मी एक गोष्ट मनाशी पक्की केली आहे, की आपण कितीही उत्कृष्ट नेपथ्य केलं तरी ते यशस्वी होण्यासाठी सीताराममामा आणि असंख्य बॅकस्टेजर्सचा अनुभव आणि सुसूत्रतेची गरज आहे.

 ‘दुर्गा झाली गौरी’च्या वेशभूषेचा विचार करताना कोळी मंडळी जो परंपरागत पोषाख घालतात, तसंच इतर मंडळी जे पोषाख घालतात, वस्तू वापरतात त्यांचा सर्रास वापर मी केला. उदा. कोळ्यासाठी मासा, दूधवाल्यासाठी मातीची भांडी आणि त्या-त्या व्यवसायासाठी संबंधित विशिष्ट वस्तू यांचा वापर केला. ‘दुर्गा झाली गौरी’ची प्रकाशयोजना चंदर होनावर करत. त्यांनी तपस सेन या विख्यात प्रकाशयोजनाकाराकडे प्रशिक्षण घेतलेले होते. मी प्रकाशचित्रणाचा (फोटोग्राफी) अभ्यास केलेला असल्यामुळे मला रंगसिद्धांत, प्रकाशविज्ञान याची माहिती होती. चंदर होनावर यांच्याबरोबर काम करताना मला खूप शिकायला मिळालं. मुलांच्या स्वप्नातलं जग मला या निमित्तानं रंगमंचावर साकारता आलं. १९८७मधल्या अरविंद देशपांडे स्मृती महोत्सव या राज्य पातळीवरच्या महोत्सवानं आणि नंतर १९८८मध्ये विजय तेंडुलकर नाट्यमहोत्सवात मला खूप काम करायला मिळालं. या काळात मी महिन्यात २७ नाटकं केली.

- नेपथ्यकारानं प्रकाशयोजना व वेशभूषा करावी का?
प्रकाश, नेपथ्य व वेशभूषा यांचा एकत्रित विचार करणं ह नाटकाच्या दृष्टीनं उपकारकच असतं. प्रकाशयोजना ही केवळ काही सीन्सपुरती मर्यादित नसते. त्याचा संपूर्ण नाटकाच्या दृष्टीने विचार केला जातो. नेपथ्य व प्रकाशाचा वापर एकमेकांना मारक ठरणार नाही, याची काळजी घेता येते. हेच पोशाखाच्या बाबतीतही म्हणता येईल.

मुलाखतीचा दुसरा भाग : ‘संहिता वाचताना नेपथ्य व्हिज्युअलाइझ व्हावं लागतं’

या मुलाखतीचे सर्व भाग एकत्रितरीत्या या लिंकवर उपलब्ध होतील.
..................

रंगवाचा त्रैमासिक
ही मुलाखत ‘रंगवाचा’ या केवळ रंगभूमीला वाहिलेल्या त्रैमासिकाच्या फेब्रुवारी २०१७च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. कणकवलीतील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘रंगवाचा’ हे त्रैमासिक प्रसिद्ध केले जाते. रंगभूमीशी संबंधित वैविध्यपूर्ण विषय या अंकात समाविष्ट असतात. एक हजार रुपये भरून या अंकाचे आजीव पालक होता येते. या अंकातील निवडक लेख दर पंधरा दिवसांनी, शुक्रवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर वाचता येतील. 

संपर्क : वामन पंडित, संपादक (रंगवाचा) - ९४२२० ५४७४४. 
वेबसाइट : http://www.acharekarpratishthan.org/
 
15 3 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search