Next
सुराविष्कारात दंगले रसिकजन
‘सवाई’च्या दुसऱ्या दिवशी रसिकांची अलोट गर्दी
BOI
Friday, December 14, 2018 | 01:53 PM
15 0 0
Share this story


पुणे : रसिकांच्या अलोट गर्दीत, डॉ. रीता देव यांच्या सुश्राव्य गायनाने ६६ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाला सुरुवात झाली. देव यांचे बहारदार गायन आणि त्यास खुलवणारी तबला व हार्मोनियमची रंगलेली साथ यांना श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर सादर झालेले सौरभ साळुंखे यांचे दमदार गायन, राहुल शर्मा यांनी छेडलेले संतूरचे मधूर सूर आणि पं. अजय पोहनकर यांची परिपक्व गायकी अशा वैविध्यपूर्ण स्वराविष्काराने रसिक दंग झाले होते. 

रीता देव

रीता देव यांनी आपल्या गायनाची सुरुवात राग मधुवंतीने केली. त्यानंतर त्यांनी बनारस गायकीची वैशिष्ट्ये असलेली ‘साजन तुम काहे को नेहा लगाएं’ ही मिश्र तिलंगमधील ठुमरी सादर केली. त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम), भरत कामत (तबला) आणि अनुजा भावे व वैशाली कुबेर (तानपुरा) यांनी साथसंगत केली.

सौरभ साळुंखे

देव यांच्यानंतर पतियाळा घराण्याचे युवा गायक सौरभ साळुंखे यांचे गायन झाले. त्यांनी राग पुरिया कल्याणने आपल्या गायनास सुरुवात केली. त्यांनी ‘बरसन लागे सावन बुंदिया राजा’ हा दादरा आणि पं. भीमसेन जोशी यांनी गायलेला ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ हा अभंग सादर केला. त्यांना अविनाश दिघे (हार्मोनियम), प्रशांत पांडव (तबला), गंभीर महाराज अवचार (पखावज), मुकुंद बादरायणी आणि गौरव साळुंखे (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.

राहुल शर्मा

यानंतर दुसरे सत्र रंगले ते प्रसिद्ध संतूरवादक राहुल शर्मा यांच्या संतूर वादनाने. राहुल शर्मा यांनी राग ‘गोरख कल्याण’ने आपल्या वादनास सुरुवात केली. आलाप, तसेच मत्त ताल व दृत तीनतालातील त्यांनी सादर केलेल्या रचनांना रसिकांनी भरभरून दाद दिली. राग पहाडीमधील रचनेने त्यांनी आपल्या वादनाचा समारोप केला. त्यांनी संतूरवर तरलपणे सादर केलेल्या या पहाडी काश्मिरी धूनद्वारे रसिकांना काश्मिर खोऱ्याची सफर घडवून आणली. त्यांना पं. मुकुंदराज देव यांनी तबल्याची साथ केली.

पं. अजय पोहनकर

त्यानंतर पं. अजय पोहनकर यांच्या सुमधुर गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सांगता झाली. त्यांनी राग कौशी कानडा सादर केला. कौशी कानडा रागाचे अंतरंग समर्थपणे दाखवत त्यांनी आपल्या परिपक्व आणि रसदार गायकीने रसिकांना तृप्त केले. ‘सजनवा तुम क्या जानो प्रीत’ आणि ‘याद पियाकी’ या त्यांनी गायलेल्या ठुमरीलाही रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यांना पं. मुकुंदराज देव (तबला), सुधीर नायक (हार्मोनियम), धनंजय जोशी व संजय सोनार (गायनसाथ), सुरंजन खंडाळकर व अथर्व कुलकर्णी (तानपुरा) यांनी साथसंगत केली. 

(दुसऱ्या दिवसाच्या सादरीकरणाची झलक दर्शविणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link