पुणे : भारताचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘द हार्टफुलनेस वे’ या पुस्तकाचे प्रकाशन १८ जानेवारी २०१८ रोजी करण्यात आले. हार्टफुलनेस अर्थात् अनुकंपा या तंत्रावर आणि तत्त्वावर आधारित हे पुस्तक दाजी नावाने परिचित असलेले कमलेश पटेल यांनी लिहिले आहे.
हार्टफुलनेस या विषयावरील ते चौथे जागतिक मार्गदर्शक असून; त्यांचा विद्यार्थी जोशुआ पोलॅक हार्टफुलनेस व्यावसायिक आणि प्रशिक्षक आहे. ज्या लोकांना ध्यान-धारणेत रुची आहे आणि यामुळे आपल्या दैनंदिन आयुष्यात कसे बदल घडून येतात हे जाणून घेण्याची जिज्ञासा असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक म्हणजे एक वैचारिक मेजवानी आहे.

या पुस्तकावर भाष्य करताना आदरणीय अध्यात्मिक गुरू दाजी म्हणाले, ‘ज्ञान असणे ही चांगली गोष्ट आहे, पण अनुभव त्यापेक्षा श्रेष्ठ असतो. या पुस्तकामध्ये एक व्यावहारिक दृष्टीकोन आहे. आपण भूतकाळातील महान व्यक्तीमत्त्वांशी ज्याप्रकारे जोडलेले असतो, त्या सहज सुलभ अस्तित्वाचा अनुभव हे पुस्तक आपल्याला देऊ
करते. हार्टफुलनेस वे अनुभवा आणि समृद्ध व्हा.’
द हार्टफुलनेस वे या पुस्तकाने अमेझॉनवर सर्वोत्कृष्ट विकले जाणारे पुस्तक म्हणून, प्रथम क्रमांक पटकावला आहे. या वेबसाईटवर आणि ‘हिंदुस्तान टाईम्स’ व ‘नेल्सन बुक स्कॅन सर्विस चार्ट’मध्ये या पुस्तकाच्या मागणीसाठी रीघ लागली आहे.

‘वेस्टलँड पब्लिकेशन्स’चे (अॅमेझॉन कंपनी) मुख्य कार्यकारी अधिकारी गौतम पद्मनाभन या पुस्तकाच्या भारतातील अनावरणाप्रसंगी म्हणाले, ‘या पुस्तकाशी आमचा संबंध आहे, ही कल्पनाच आमच्यासाठी रोमांचकारी आहे. लोकांना उत्कर्षाचा मार्ग दाखवणारे हे पुस्तक प्रकाशित करणे, ही आमच्यासाठी गौरवास्पद बाब आहे. मला खात्री आहे की, हे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवेल आणि जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत पोहोचेल.’
हार्टफुलनेस मेडिटेशन (www.heartfulness.org) हे स्वतःचा विकास करण्याचे तंत्र असून, जगभरातील कोट्यवधी लोक यामध्ये सहभागी आहेत. या तंत्राचा वापर करून आजच्या धावपळीच्या जीवनातदेखील आपण अंतर्बाह्य शांतता आणि स्थैर्य अनुभवू शकतो. जगभरात सर्वत्र ही ध्यान-धारणा सत्रे मोफत घेतली जातात. विभिन्न संस्कृती, धार्मिक संकल्पना आणि आर्थिक स्तर यांच्या पलीकडे जाऊन, १५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कोणत्याही व्यक्तीला ही सहजपणे आत्मसात करता येणारी पद्धत स्वीकारणे सोपे जाते.
हार्टफुलनेस विषयी:हार्टफुलनेस ही राजयोग ध्यानाची एक पद्धत आहे. यालाच ‘सहज मार्ग’ किंवा ‘नैसर्गिक पथ’ असे देखील म्हटले जाते. भारतात औपचारिक रीतीने १९४५मध्ये श्रीरामचंद्र मिशनची स्थापना झाल्यावर, विसाव्या शतकाच्या उत्तराधार्थ या पद्धतीचा उगम झाला. हजारो शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हार्टफुलनेस मेडिटेशन प्रशिक्षण सुरू असून, जगभरातील कंपन्या, सरकारी आणि गैर-सरकारी संस्थांमधील एक लाखांहून अधिक व्यावसायिक हे ध्यान करतात. हार्टफुलनेसची पाच हजारपेक्षा अधिक केंद्रे असून, त्यांना ‘हार्टस्पोर्ट’ नावाने ओळखले जाते. एकशे ३० देशांमधील या केंद्रांमध्ये हजारो प्रशिक्षित स्वयंसेवक आपली सेवा देऊ करतात.