Next
‘शेतकऱ्यांचा आवाज वाढला पाहिजे’
प्रेस रिलीज
Tuesday, January 30 | 02:57 PM
15 0 0
Share this story

कोल्हापूर येथे शेतीप्रगती मासिकाच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत, शेजारी व्यासपीठावर सुरेश पाटील, प्रभारी कुलगुरू डी. टी. शिर्के, आनंद कोठाडिया, रावसाहेब पुजारी, राहुल वडके, अरूण नरके, सुहास शेला

कोल्हापूर : ‘आज आपण सत्तेत घुसलो नाही, तर शेतकऱ्यांची गाऱ्हाणी तिथे कोण मांडणार आहे. शेतीची धोरणे सहजासहजी बदलत नाहीत. त्यासाठी संघर्ष करावाच लागतो. यासाठी प्रयोगशील, पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यांनी आपला आवाज वाढविला पाहिजे. प्रस्थापित धोरण बदलण्यासाठी तुमची भाषा बोलणारे लोक सत्तेत वाढले पाहिजेत. यासाठीच आपण जाणीवपूर्वक काम करतो आहोत. पाशा पटेलांना कृषीमूल्य आयोगावर पाठविल्यानंतर अनेक धोरणात्मक निर्णय घेतले. यातून आता शेतीत परिवर्तन सुरू झालेले आहे,’ असे प्रतिपादन कृषि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले.

शेतीप्रगती मासिकाचा तेरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे ते बोलत होते. अध्य़क्षस्थानी शिवाजी विद्यापीठांचे प्रभारी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के होते.

खोत म्हणाले, ‘शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरची लढाई आणि धोरणात्मक निर्णय प्रक्रिया दोन भिन्न टोकाच्या आहेत. एका बाजूला आपल्याला रस्त्यावरची लढाईही लढली पाहिजे आणि सत्तेत घुसून धोरणात्मक निर्णयही घेण्यास भाग पाडले पाहिजे. यासाठी सत्तेत शेतकऱ्यांचा आवाज वाढला पाहिजे. बाजार कमिट्यांचा निर्णय असेल, कांदा चाळीला अनुदानाचा विषय असेल किंवा ठिबक सिंचनाचा विषय असेल सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा देणारे निर्णय घेतले गेले. कृषीमाल प्रक्रियेमध्ये आपण खूप कमी पडतो आहोत. हे लक्षात घेऊन ५० लाखांपर्यंत अनुदानाची योजना सुरू केली. ही योजना राज्यात एक जानेवारीपासून लागू झाली आहे. यातून कृषी क्षेत्रात परिवर्तन सुरू झालेले आहे.’

खोत पुढे म्हणाले, ‘मीही एक पाक्षिक दोन अडीच वर्षे चालविले होते. फार खडतर काम आहे. यासाठी मला दोन जर्शी गायी विकाव्या लागल्या. रावसाहेब पुजारी अतिशय नेटाने सलग १४ वर्षे शेतीप्रगती मासिक चालवितात, ही बाब माझ्यासारख्यासाठी खुप प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याला मी सलाम करतो. केवळ मासिकच नाहीतर ते कृषीविषयक पुस्तकाचे प्रकाशन करतात, प्रत्यक्ष शेतात राबणाऱ्यांना सपत्नीक शेतीप्रगती कृषीभूषण पुरस्काराने गौरवितात. कृषी क्षेत्रातील मोती वेचण्याचे हे फार मोठे काम आहे.’

प्रारंभी शेतीप्रगती मासिकाचे संपादक रावसाहेब पुजारी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यानंतर शेतीप्रगती मासिकाच्या ‘कृषी आयडॉल्स’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले; तसेच तेजस पब्लिकेशनचे प्रकाशित केलेल्या ‘देशी गाय आणि सेंद्रिय शेती’ (लेखक रावसाहेब पुजारी), ‘शेतकरी आजोबाचा बटवा’ (उद्यान पंडित पी. व्ही. जाधव) आणि ‘बायोगॅस संयंत्र – उभारणी व देखभाल’ (विजय आजगेकर) या पुस्तकांचे प्रकाशन खोत व इतर पाहुण्यांच्या हस्ते झाले. या नंतर तेजस प्रकाशनच्या वेबसाईटचे उद्घाटन झाले. या वेळी राजेश शिंदे, कुणाल पाटील, आलोक जत्राटकर, नेताजी खाडे यांचा सत्कार करण्यात आला.

या नंतर शेतीप्रगती मासिकासाठी स्तंभलेखन करणारे लेखक डॉ. बाळकृष्ण जमदग्नी (नरसोबाचीवाडी), डॉ. व्ही. एन. शिंदे (कोल्हापूर), डॉ. वसंतराव जुगळे (सांगली), दशरथ पारेकर (कोल्हापूर), डॉ. प्रा. नितीन माळी वायसीएसआरडी), कृष्णा लाटवडे, डॉ. महावीर अक्कोळे, अजित नरदे (सर्व जयसिंगपूर) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला; तसेच शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर निवड झाल्याबद्दल प्रयोगशील शेतकरी, लेखक प्रताप चिपळूणकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. ‘द हिंदू’चे विशेष प्रतिनिधी राहुल वडके यांचाही या वेळी खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या वेळी ‘शेतीप्रगती कृषीभूषण २०१८’ पुरस्कारचे वितरण करण्यात आले. भरत पाटील (कोथळी), सुरेश कबाडे (कारंदवाडी), महावीर पाटील (जयसिंगपूर), एल. डी. कुंभार (शिरदवाड), एस. बी. पाटोळे (चिंचवाड), भारती पाटील (शिवडे-कराड), किरण डोके (कंदर, ता. करमाळा), विवेकराव सावंत (माचाळ, ता. लांजा), संजय डफळापूरे (गणेशवाडी), प्रवीण भाट (इचलकरंजी), महेंद्र घाटगे (माणगाव-शाहुवाडी), वसंतराव धुरी (कोल्हापूर) यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

या वेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अहिल्यादेवी रावसाहेब पुजारी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रयत कृषी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पाटील, सुभाष आर्वे, सुरेश गुळवणी, सतीशचंद्र नलावडे, अशोक घसघसे, डी. एस. गुरव, पद्माकर पाटील यांसह कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, बेळगाव जिल्ह्यांतून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्पित होते.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link