Next
रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन
BOI
Monday, November 13 | 04:00 AM
15 0 0
Share this story

खजिन्याच्या बेटावर गेलेला जिम हॉकिन्स, बोटीवरचा क्रूर लंगडा कॅप्टन जॉन सिल्व्हर, त्याच्या खतरनाक सहकारी चाच्यांचं गाणं ‘यो हो हो अँड ए बॉटल ऑफ रम..’ यांच्या साहसाची ‘ट्रेझर आयलंड’ ही आणि अशा अनेक कादंबऱ्या लिहिणाऱ्या रॉबर्ट लुई स्टीव्हन्सनचा १३ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्याच्याविषयी....
.....
१३ नोव्हेंबर १८५० रोजी एडिंबरामध्ये जन्मलेला रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन हा एकाहून एक सरस आणि अद्भुत कादंबऱ्यांमुळे लोकप्रिय असणारा ब्रिटिश कादंबरीकार. 

समुद्री चाच्यांच्या पार्श्वभूमीवर आधारलेली खजिन्याच्या शोधाची कथा मांडणारी ‘ट्रेझर आयलंड’ ही त्याची कादंबरी म्हणजे अशा प्रकारच्या शोधमोहिमांची जणू मुकुटमणी ठरेल अशी उत्कंठावर्धक कादंबरी आहे. छोट्या जिम हॉकिन्सच्या घरच्या खानावळीत आलेल्या एका अनाहूत पाहुण्याकडून एका खजिन्याच्या बेटाचा नकाशा मिळतो आणि पुढे बोटीतून त्या बेटावर गेल्यावर काय संकटं येतात आणि त्यांना जिम आणि त्याचे साथीदार कसं तोंड देतात ते या कादंबरीमध्ये रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन याने ज्या प्रकारे रंगवलं आहे त्याला तोड नाही. १८८३ साली लिहिली गेलेली ही कादंबरी अजूनही आपलं गारुड टिकवून आहे. लंगडा कॅप्टन जॉन सिल्व्हर आणि त्याच्या खतरनाक सहकाऱ्यांचं ते गाणं ‘यो हो हो अँड ए बॉटल ऑफ रम..’ कोण विसरेल? या कादंबरीची अनेक भाषांमध्ये अगणित भाषांतरं झाली आहेत आणि त्यावर अनेक सिनेमेही बनले आहेत.

‘दी स्ट्रेंज केस ऑफ डॉक्टर जेकल अँड मिस्टर हाइड’ ही त्याची दुसरी तुफान लोकप्रिय कादंबरी. डॉक्टर जेकलने एक असं रसायन बनवलेलं असतं, की ते प्यायल्यावर त्यांच्या अंगातली सुप्त दुष्ट, खलप्रवृत्ती बाहेर येऊन ती शक्ती अंगी बाणलेल्या डॉक्टर मिस्टर हाइड या वेगळ्या अवतारात तो काही अचाट दुष्कृत्यं करतो आणि शहरभर एकच खळबळ माजते. हाइडचा शोध सुरू होतो. एरव्ही शांत, सौम्य असणाऱ्या डॉक्टर जेकलवर आळ येणं शक्यच नसतं. शेवटी डॉक्टर स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतो; पण पोलिसांना प्रत्यक्षात मिस्टर हाइडचा मृतदेह मिळतो. मग डॉक्टर जेकलचं काय होतं? तो कुठे असतो? ...अत्यंत उत्कंठेने भारलेली ही १८८६ सालची कादंबरी रॉबर्ट लुई स्टीव्हन्सनच्या लेखणीची कमाल दाखवणारी. याही कादंबरीची अनेक भाषांत भाषांतरं झाली आणि त्यावर अनेक सिनेमे बनले. स्पेन्सर ट्रेसी, इंग्रिड बर्गमन आणि लाना टर्नर यांचा १९४१ सालचा सिनेमा विशेष गाजला होता. प्रसिद्ध अभिनेते संजीवकुमार यांचा या कादंबरीवर आधारित ‘चेहरे पे चेहरा’ हा हिंदी सिनेमाही आला होता. 

‘किडनॅप्प्ड’ ही त्याची आणखी एक तुफान गाजलेली कादंबरी. डेव्हिड बाल्फर या मुलाला ‘किडनॅप’ करून एका जहाजावरून पळवून नेण्यात येतं, तेव्हा पुढे काय काय होतं हे अतिशय रंजक पद्धतीनं सांगणारी ही कादंबरी. याचेसुद्धा अनेक अनुवाद झाले आणि यावर सिनेमे निघाले. ‘वॉल्ट डिझ्नी फिल्म्स’ने यावर काढलेला सिनेमा बच्चे कंपनीचा आवडता होता. 

‘दी ब्लॅक अॅरो’ ही त्याची आणखी एक अफलातून कादंबरी. याशिवाय मास्टर ऑफ बॅलॅन्त्रे, ट्रॅवेल्स विथ ए डॉन्की, प्रिन्स ओटो, दी रेकर, अॅन इन लँड व्हॉएज अशी त्याची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

तीन डिसेंबर १८९४ रोजी त्याचा मृत्यू झाला.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link