मुंबई : ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुलचे बोर्ड लागत होते... ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते... ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती, असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रूपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर ‘आणि .... काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, वायकॉम १८ मोशन पिक्चर्सने त्याची निर्मिती केली आहे.
हे जबरदस्त व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारत आहे सगळ्यांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे. एका वेगळ्या भूमिकेत आणि वेगळ्या रूपात तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनाली कुलकर्णी, सुमित राघवनही त्याच्यासोबत असणार आहेत. हा सिनेमा सात नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
डॉ. काशिनाथ घाणेकर यांची प्रभावशाली संवादफेक, जरब बसवणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची शैली अद्वितीय होती. रायगडाला जेंव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास या चित्रपटाद्वारे रूपेरी पडद्यावर येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजित देशपांडे यांनी केले आहे.