Next
संगीत स्पर्धा : भाग दोन
BOI
Tuesday, May 21, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


संगीत स्पर्धेच्या यशापयशात स्पर्धकाबरोबरच ‘आयोजक’, ‘परीक्षक’ आणि ‘श्रोते’ हे घटकदेखील कारणीभूत असतात, याचा उल्लेख मी मागच्या लेखात केला होता. याच गोष्टींशी संबंधित, गेल्या चाळीस वर्षांच्या माझ्या अनुभवावरून काही गोष्टी सांगाव्याशा वाटतात. स्पर्धकाविषयी मागील लेखात आपण पाहिलं. आता पुढचे काही घटक पाहू या... ‘सूररंगी रंगले’ सदरात या वेळी मधुवंती पेठे सांगत आहेत, संगीताच्या स्पर्धेतील उर्वरित महत्त्वाच्या घटकांबद्दल...
...................................
आयोजक
ज्या ज्या संस्था दर वर्षी, विशिष्ट प्रकारच्या स्पर्धा सातत्यानं आयोजित करत असतात, त्या एक प्रकारे संगीताच्या प्रसाराचं आणि प्रचाराचं फार मोठं कार्य करत असतात. समाजातील नवनवीन कलाकार श्रोत्यांसमोर आणण्याचं मोठं काम त्या संस्था करत असतात. अशा प्रकारे जिथे नियमितपणे, उच्च दर्जा राखून शास्त्रीय, सुगम, नाट्यसंगीत यांच्या स्पर्धा होतात, त्या ठिकाणी स्पर्धेत भाग घेणं आणि बक्षीस मिळवणं हे नवोदित कलाकारांना नेहमीच आव्हानात्मक आणि प्रतिष्ठेचं वाटत असतं. परंतु सर्वच संस्था अशा प्रकारे स्पर्धा आयोजित करतातच असं नाही. स्पर्धेचं आयोजन म्हणजे एक जबाबदारीनं करण्याची गोष्ट आहे. तसंच स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात, निकोपपणे कशा होतील, याकडे आयोजकांना लक्ष द्यावं लागतं. 

आयोजकांनी जाहीर केलेल्या पत्रकात सर्व नियमांचा उल्लेख स्पष्टपणे असणं आवश्यक आहे. जसे, स्पर्धेचा प्रकार - शास्त्रीय (बडा ख्याल - छोटा ख्याल), सुगम संगीत (भक्तिगीत, भावगीत, फिल्मी, नॉन फिल्मी, गझल, नाट्यसंगीत) इत्यादी. स्पर्धेसाठी दिलेल्या वेळेचा स्पष्टपणे उल्लेख असावा. स्पर्धेमध्ये स्पर्धकांना वेळ काटेकोरपणे पाळावी लागणार असेल, तर वार्निंग बेल देणं, वेळ संपल्याची बेल देणं यांचीही व्यवस्था करणं आवश्यक असतं. स्पर्धकानं किमान स्वर-तालाची साथ घेणं आवश्यक असतं. तसा उल्लेख नियमांत असावा. त्यामुळे साथसंगतकार आणि वाद्यांची सोय आयोजक संस्थेनं करायची असते. प्रसंगी स्पर्धकांना त्यांचे स्वत:चे साथीदार घ्यायलाही परवानगी देता येते. किती आणि कोणती साथ घेता येईल याचाही खुलासा करणं आवश्यक असतं. म्हणजे सुगम संगीतासाठी किमान हार्मोनिअम आणि तबला साथ हवी, शास्त्रीय संगीतासाठी स्पर्धकांना स्वत: तंबोरा वाजवून गाणं अपेक्षित आहे का, हार्मोनिअम साथ चालेल का नाही, याचा स्पष्ट उल्लेख माहितीपत्रकात असावा. 

स्पर्धेचा कार्यक्रम दिलेल्या वेळेनुसार सुरू करण्याची काळजी संस्थेनं घ्यावी. कित्येक ठिकाणी दिलेल्या वेळेपेक्षा तास-दीड तास उशीरानं स्पर्धा सुरू केल्या जातात. अशी प्रतीक्षा स्पर्धकांना कंटाळवाणी ठरते आणि त्याचा परिणाम सादरीकरणावर होऊ शकतो. तसेच एका दिवशी जास्तीत जास्त स्पर्धकांना प्रवेश देऊन, सादरीकरण पूर्ण न ऐकता, स्पर्धकाला मधेच थांबवणं, हेदेखील योग्य नाही. वेळेचं काटेकोर नियोजन आधीच करणं आवश्यक असतं.

माहितीपत्रकात संस्थेनं जाहीर केलेले नियम, सर्व स्पर्धकांच्या बाबतीत सारखेच पाळले जातील हेदेखील पाहणं आवश्यक असतं. ज्या प्रकारची स्पर्धा असेल, त्या त्या क्षेत्रातील जाणकार परीक्षक संस्थेनं आमंत्रित करावेत आणि त्यांच्या निर्णयाला योग्य तो मान दिला जावा. त्यांनी दिलेला निर्णयच प्रमाण मानला जावा. तो त्यांनाच जाहीर करायला सांगावा. म्हणजे स्पर्धेतील संस्थेबद्दलची विश्वासार्हता टिकून राहते. 

परीक्षक
स्पर्धेतील पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे परीक्षक. तसं पाहिलं तर स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून काम करताना, दर वेळी जास्तीत जास्त नवीन शत्रू निर्माण होत असतात, असं आम्ही गमतीनं म्हणतो. कारण ज्यांना बक्षीस मिळत नाही त्यांच्याकडून, विशेषत: त्यांच्या पालकांकडून किंवा पाठीराख्यांकडून परीक्षकावर पक्षपातीपणाचा आरोप केला जातो. पण समंजस स्पर्धकांनी जर सर्व स्पर्धकांचं सादरीकरण ऐकलं, तर त्या दिवशी भाग घेतलेल्या इतरांच्या तुलनेत आपण कुठे कमी पडलो, ते त्यांचं त्यांनाही कळू शकतं. 

खरं तर तज्ञ परीक्षकाला, पहिल्या मिनिटभरांतच स्पर्धकाची कुवत कळून चुकते. तरीही समोर आपली कला सादर करत असलेल्या स्पर्धकाला नाउमेद न करता, प्रोत्साहन देत ऐकणं परीक्षकाकडून अपेक्षित असतं. तसंच ऐकलेल्या कलेचं मूल्यमापन गुणांच्या स्वरुपात करण्याची सवय परीक्षकाला असावी लागते. सर्व परीक्षकांसमोर विशिष्ट गोष्टींसाठी, विशिष्ट गुण देण्यासाठी तक्ता असतो. त्यानुसार प्रत्येक स्पर्धकाचं मूल्यमापन करणं आणि काही रिमार्क देणं अपेक्षित असतं. त्याआधारे शेवटी क्रमांक वर-खाली ठरवताना उपयोग होत असतो. जेव्हा एकाच गटात पन्नास-साठ स्पर्धंक एका मागोमाग गाऊन जातात, तेव्हा हे विचारपूर्वक दिलेले गुण आणि रिमार्क्स, निकाल ठरवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरतात. 

एकाच वेळी दोन-तीन परीक्षक जर काम करत असतील आणि त्यापैकी एकाला जरी या पद्धतीने गुण देण्याची कला अवगत नसेल, तर निकाल मोठ्या फरकाने बदलू शकतो. काही वेळेस सहपरीक्षक काहीच नोंदी करत नाहीत, पण निकालाच्या वेळी मात्र, यालाच नंबर दिला पाहिजे असा आग्रह धरतात. तेव्हा प्रामाणिकपणे काम करणाऱ्या परीक्षकाची फारच पंचाईत होते. अशा वेळी स्पर्धकांनी आणि आयोजक संस्थेने परीक्षकांवर दाखवलेला विश्वास पणाला लागतो. 

स्पर्धेनंतर परीक्षकांनी स्पर्धेविषयी आपलं मत नोंदवणं, टीकाटिप्पण्णी करणं गरजेचं असतं. विजयी झालेल्या स्पर्धकांनी स्पर्धेत काय विशेष पाहिलं, कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष दिलं आणि बक्षीस न मिळालेल्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं, याबाबत परीक्षकांचं मत जाणून घेण्यात सर्वांनाच रस असतो. श्रोत्यांनी उगाचच डोक्यावर घेतलेल्या स्पर्धकामध्ये जर दोष असतील, तर कोणत्याही दबावाला बळी न पडता, योग्य तो निकाल देणं आणि त्याबाबत स्पष्ट खुलासा करणं या दोन्ही गोष्टीं खरं तर कठीण पण आवश्यक असतात. 

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, परीक्षकांनी सर्वांशी संवाद साधताना, त्यांच्या वयोगटानुसार आणि समजेल अशा साध्या भाषेत बोलणं आवश्यक असतं. सध्या आपण पाहतो, की वाहिन्यांवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये काही परीक्षक अशा काही अलंकारिक भाषेत बोलतात, की त्यांना नक्की काय म्हणायचं आहे, ते समजत नाही आणि स्पर्धकांना त्याचा खुलासा विचारण्याची हिंमत होत नाही. काही परीक्षक चांगुलपणा मिळवण्याच्या नादात, कोणी कसेही गायला, तरी त्याला मोठमोठी विशेषणं देऊन मिसगाईड करतात. हेही स्पर्धकाच्या दृष्टीनं हानीकारक असतं. 

स्पर्धकांची तुलना त्यांनी सादर केलेल्या गाण्यांच्या मूळ गायक-गायिकांशी करणं हे कधीही योग्य नाही. ज्यांनी आपलं आयुष्य कलासाधनेत घालवलंय, त्यांच्याशी नवोदितांची तुलना करणं बरोबर नाही. तसंच प्रत्येकाला सगळ्या प्रकारची गाणी गाता आली पाहिजेत, हा अट्टाहास परीक्षकांनी ठेवता कामा नये. प्रत्येकानं आपल्या आवाजाची जात, रेंज आणि कुवत ओळखूनच गाणी निवडावीत, असं माझं मत आहे. म्हणूनच स्पर्धा या स्पर्धकांसाठी ‘तारक का मारक’ हे ठरण्यामध्ये परीक्षकांची भूमिका मोलाची आणि जबाबदारीची असते.

- मधुवंती पेठे
ई-मेल : madhuvanti.pethe@gmail.com

(लेखिका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार आहेत. ‘सूररंगी रंगले’ हे सदर दर १५ दिवसांनी मंगळवारी प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/ANhKXW या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
H.N.POTDAR About 119 Days ago
फारच योग्य आणि महत्वपूर्ण सल्ला
0
0

Select Language
Share Link
 
Search