Next
‘विजयी भारत!’
लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा ऐतिहासिक विजय; फिर एक बार मोदी सरकार
BOI
Thursday, May 23, 2019 | 05:47 PM
15 0 0
Share this article:नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीमध्ये ऐतिहासिक यश मिळवले आहे. मोदींनी घेतलेल्या नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी यांसारख्या धाडसी निर्णयांनंतरही भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षाही अधिक उज्ज्वल यश मिळाले आहे. ‘सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी विजयानंतर केले आहे. 

आतापर्यंत जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भाजपचे सहा उमेदवार विजयी घोषित झाले असून, २९२ जागांवर भाजप आघाडीवर आहे. भाजप आणि मित्रपक्षांची राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ३२१ जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस आणि मित्रपक्षांची संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) ८६ जागांवर आघाडीवर आहे. २०१४मध्ये ‘एनडीए’ला ३३६, तर ‘यूपीए’ला ६० जागा मिळाल्या होत्या. ‘एनडीए’मध्ये भाजपला गेल्या वेळी २८२ जागा मिळाल्या होत्या. यंदा त्यात १० जागांची वाढ झाल्याचे दिसत आहे. 

परदेशातून काळा पैसा परत आणला, तर प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करता येऊ शकतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१४च्या निवडणूक प्रचारावेळी सांगितले होते. तोच मुद्दा उचलून धरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी या वेळी प्रचारात भाजपला लक्ष्य केले होते. त्यातच नीरव मोदी, विजय मल्ल्या यांसारखे घोटाळेबाज देशातून पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यावरूनही विरोधकांनी रान माजवले. पुढे भारताच्या प्रयत्नांमुळे नीरव मोदीला अटक झाली. नंतर विजय मल्ल्यापुढील अडचणीही वाढल्या आहेत.

नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी हे मोदी सरकारने घेतलेले धाडसी निर्णय. त्यावरून सरकारला काही प्रमाणात जनक्षोभही स्वीकारावा लागला. विरोधी पक्षांनी प्रचंड टीका आणि आंदोलने केली. मात्र याचा दीर्घकालीन फायदा होऊ शकेल, हा मुद्दा कदाचित लोकांना भावला असावा. राफेल विमानांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोपही करण्यात आला; मात्र घोटाळा खरोखरच झाला असल्याचे सिद्ध होऊ शकले नाही. पाच वर्षांच्या कालावधीच्या अखेरच्या वर्षात घेतलेल्या ‘सर्जिकल स्ट्राइक’सारख्या धाडसी निर्णयाचे नागरिकांनी प्रचंड कौतुक केले. एकंदरीतच ठाम निर्णय घेणारे नरेंद्र मोदींचे नेतृत्व लोकांना आवडले. त्यांच्या परदेश दौऱ्यांवर खूप टीका झाली; मात्र त्यामुळे परदेशात भारताची प्रतिमा उंचावण्यात हातभार लागला, असा विचार करणारेही अनेक जण होते. या सगळ्या गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडल्या.

‘सबका साथ, सबका विकास’ हे मोदींनी केलेले आवाहनच लोकांना भावल्याचे दिसत असून, त्यामुळेच मोदींनी आता ‘विजयी भारत’ असे ट्विट केले आहे. ‘सर्वांनी एकत्र येऊन कणखर आणि सर्वसमावेशक भारत घडवू या,’ असे आवाहन मोदींनी नव्या ट्विटमध्ये केले आहे. 

काँग्रेसला गेल्या निवडणुकीत ४४ जागा मिळाल्या होत्या. त्या वेळपेक्षा जागांमध्ये वाढ झाली असली, तरी ती समाधानकारक नाही. राहुल गांधींच्या मदतीला प्रियांका गांधीही आल्यामुळे चित्रात काही फरक पडेल, असे अनेकांना वाटले होते; मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. महाराष्ट्रातही काँग्रेसचा दारूण पराभव झाला असून, अवघ्या एका जागेवर काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. गेल्या वेळी मोदी लाटेत टिकून राहिलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हेही या वेळी पराभूत झाले आहेत. तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्येही ४२पैकी १८ जागांवर आघाडी मिळवून भाजपने तृणमूल काँग्रेसचा घोर वाढवला आहे. तृणमूल काँग्रेसला २३ जागा मिळाल्या आहेत. 

केंद्रातील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हणतात. उत्तर प्रदेशातील ८०पैकी ६० जागांवर भाजप आघाडीवर आहे. त्यामुळे निकालात खूप मोठा फरक पडला आहे. या वेळी सुप्त मोदी लाट असल्याचे भाकीत काही राजकीय तज्ज्ञांनी केले होते. तसेच, स्वतःही मोदींनीही या वेळी सरकारविरोधी नव्हे, तर सरकारच्या बाजूने लाट आहे, असे म्हटले होते. तेच खरे ठरले. ७२ हजार रुपये देणारी ‘न्याय’ योजनाही काँग्रेसचा प्रभाव पाडू शकली नाही. काँग्रेससह समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तेलुगू देसम पक्ष अशा सर्वच विरोधी पक्षांना लोकांनी नाकारले असल्याचे निकालावरून दिसते आहे.

विधानसभांमध्ये प्रादेशिक पक्षांचा वरचष्मा
दुसरीकडे,  आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांचेही निकाल आज जाहीर झाले. त्यात मात्र प्रादेशिक पक्षांचेच वर्चस्व दिसून आले. अरुणाचल प्रदेशमध्ये ६०पैकी २२ जागांवर भाजप आघाडीवर आहे. हा अपवाद वगळता अन्य तिन्ही राज्यांत प्रादेशिक पक्षांचाच वरचष्मा राहिला आहे. आंध्र प्रदेशात १७५पैकी १४८ जागांवर वायएसआर काँग्रेस आघाडीवर आहे. ओडिशामध्ये १४६पैकी १०८ जागांवर बिजू जनता दल आघाडीवर आहे. सिक्कीममध्ये २०पैकी ११ जागांवर सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर आहे. लोकसभा निवडणुकीचा राष्ट्रीय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

राज्यनिहाय निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्राचा सविस्तर निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search