Next
पितात सारे गोड हिवाळा
BOI
Monday, March 05 | 08:30 AM
15 1 0
Share this storyगोड, हवाहवासा वाटणारा हिवाळा नुकताच सरला आहे. या हिवाळ्याच्या आणि माघ महिन्यातल्या सुंदर अशा प्रातःकाळाच्या आठवणी जागवायच्या असतील, तर बा. सी. मर्ढेकरांच्या शब्दांना पर्याय नाही. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमांतर्गत ‘पितात सारे गोड हिवाळा’ ही मर्ढेकरांची कविता सादर केली आहे रत्नागिरीतील पत्रकार अनघा निकम-मगदूम यांनी ...
............
न्हालेल्या जणू गर्भवतीच्या, सोज्वळ मोहकतेने बंदर
मुंबापुरीचे उजळीत येई, माघामधली प्रभात सुंदर

सचेतनांचा हुरूप शीतल, अचेतनांचा वास कोवळा
हवेत जाती मिसळून दोन्ही, पितात सारे गोड हिवाळा

डोकी अलगद घरे उचलती, काळोखाच्या उशीवरूनी
पिवळे हंडे भरून गवळी, कावड नेती मान मोडुनी

नितळ न्याहारीस हिरवी झाडे, काळा वायु हळुच घेती
संथ बिलंदर लाटांमधुनी, सागरपक्षी सूर्य वेचती

गंजदार पांढऱ्या नि काळ्या, मिरवीत रंगा अन् नारंगी
धक्क्यावरच्या अजून बोटी, साखरझोपेमधे फिरंगी

कुठे धुराचा जळका परिमल, गरम चहाचा पत्ती गंध
कुठे डांबरी रस्त्यावरचा, भुऱ्या शांततेचा निशिगंध

या सृष्टीच्या निवांत पोटी, परंतु लपली सैरावैरा
अजस्र धांदल क्षणात देईल, जिवंततेचे अर्घ्य भास्करा

थांब जरासा वेळ तोवरी, अचेतनांचा वास कोवळा
सचेतनांचा हुरूप शीतल, उरे घोटभर गोड हिवाळा

- बा. सी. मर्ढेकर

(बा. सी. मर्ढेकर यांच्याबद्दलचे लेख वाचण्यासाठी https://goo.gl/MGE7Bj येथे क्लिक करा. मर्ढेकर यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी https://goo.gl/RXKLd8 येथे क्लिक करा. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Yashashri Purohit About 287 Days ago
खूपच छान उपक्रम!!
0
0

Select Language
Share Link