Next
सीने में सुलगते है अरमाँ...
BOI
Sunday, June 24, 2018 | 06:45 AM
15 1 0
Share this story

प्रेम धवन हे जुन्या काळातील एक प्रतिभासंपन्न गीतकार! अनेक चित्रपटांसाठी आशयसंपन्न गीते लिहिलेल्या या गीतकाराचा जन्मदिन नुकताच (१३ जून) होऊन गेला. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या प्रेम धवन यांनी लिहिलेल्या ‘सीने में सुलगते है अरमाँ...’ या गीताचा...
...........
गीतकार प्रेम धवन ही व्यक्ती केवळ कवी, शायर नव्हती! प्रेम धवन हे व्यक्तिमत्त्व अनेक कलांमध्ये पारंगत होते. ते संगीतकार, नर्तक, नृत्य दिग्दर्शक होते. १३ जून १९२३ ही त्यांची जन्मतारीख! हरियाणामधील अंबाला गावी त्यांचा जन्म झाला. बालपणापासून त्यांना काव्याची आवड होती. पदवीधर झाल्यानंतर ते मुंबईच्या ‘इप्टा’ या नाट्यसंस्थेत सहभागी झाले. तेथील व्यासपीठावर काव्यवाचन करताना त्यांची चित्रपट क्षेत्रातील अनेकांशी ओळख झाली. १९४६मध्ये ‘इप्टा’नेच ‘धरती के लाल’ हा चित्रपट निर्माण केला होता. त्यात प्रेम धवन यांनी लिहिलेले गीत घेण्यात आले होते. तिथूनच प्रेम धवन यांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.

त्यानंतर १९४८मध्ये त्यांनी ‘जिद्दी’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या ‘जादू कर गए किसी के नैना....’ या लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्याने लोकप्रियता मिळवली. १९४९मध्ये ‘जीत’ चित्रपट आला. त्यामध्ये प्रेम धवननी लिहिलेले गीत त्यांच्या चित्रपटसृष्टीतील वाटचालीबद्दल स्वतःलाच आश्वस्त करणारे होते, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कारण त्या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळीचे शब्द होते. ‘चाहे कितनी कठिन डगर हो, हम कदम बढाते जाएंगे!’

या गाण्यांनी प्रेम धवन गीतकार म्हणून प्रसिद्धीला आले. संगीतकार अनिल विश्वास यांच्याबरोबर त्यांनी सात-आठ चित्रपट केले. त्यातील अनिलदांचे संगीत कर्णमधुर होतेच; पण त्या गीतांमधील आशयसंपन्न शब्द रसिकांना भावले. १९४९ ते १९५३च्या या काळानंतर संगीतकार रवी यांच्यासाठीही प्रेम धवन यांनी गीते लिहिली. संगीतकार रवी यांचा पहिला चित्रपट ‘वचन’! त्याची गीते प्रेम धवन यांनीच लिहिली होती. त्यानंतर एक साल, चिराग कहाँ रोशनी कहाँ, नयी राहें, अपना घर प्यार का सागर, दस लाख, एक फूल दो माली, धडकन (१९७२) या चित्रपटांना रवी यांनी संगीत दिले होते व त्यांची गीते प्रेम धवन यांनी लिहिली होती.

संगीतकार रवी यांच्याप्रमाणेच संगीतकार चित्रगुप्त! या दोघांना अनेक चित्रपट समीक्षक संगीतकार मानत नाहीत; पण वास्तव तसे नव्हते. या दोन्ही संगीतकारांनी अनेक मधुर गीते दिली आहेत. या दोघांमधील समान दुवा म्हणजे या दोघांच्या अनेक चित्रपटांची गीते प्रेम धवन यांनी लिहिलेली होती. १९५९चा गेस्ट हाउस १९६०चा चाँद मेरे आजा, १९६१चा बडा आदमी व जबक, १९६२चा बेजुबान, अशा अनेक चित्रपटांना चित्रगुप्त यांचे संगीत होते व प्रेम धवनने गाणी लिहिली होती. 
मनोजकुमारने जेव्हा आपल्या ‘शहीद’ या चित्रपटाकरिता प्रेम धवन यांना गीत लिहिण्यास आमंत्रित केले, तेव्हा प्रेम धवन शहीद भगतसिंग यांच्या आईला भेटले. त्यांच्याशी बोलले व त्यांच्या अनुभव कथनातून जे कळले, जाणवले, त्यावरून त्यांनी ‘शहीद’ची गाणी लिहिली.

पन्नासच्या दशकात ‘इप्टा’ संस्थेचे काही प्रतिनिधी रशियाला गेले होते त्यामध्ये प्रेम धवन होते. तेथे त्यांनी मातृभूमीच्या आठवणीतून एक गाणे लिहिले. ते गीत वाचून दिग्दर्शक विमल रॉय एवढे प्रभावित झाले, की त्यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाकरिता प्रेम धवन यांना गीत लिहिण्यासाठी बोलावले. तो चित्रपट होता ‘काबुलीवाला’! त्या चित्रपटातील ‘ए मेरे प्यारे वतन’ हे ते गीत, जे प्रेम धवन यांच्या अलौकिक प्रतिमेचे दर्शन घडवते.

‘जागते रहो’ हा राज कपूरचा कलात्मक चित्रपट! शैलेंद्र त्याचा आवडता गीतकार! परंतु भांगडा गीतासाठी प्रेम धवनला पाचारण केले गेले! भारतातील सद्य परिस्थिती, चित्रपटाच्या कथानकात दाखवलेले लोकांचे बाह्यरंग व अंतरंग या सर्वांचा विचार करून प्रेम धवनची लेखणी कसे वार करते बघा... ‘सच्चे फाँसी चढते देखे झूठा मौज उडाये...’ हे गाणे म्हणजे भावुक प्रेमगीते लिहिणाऱ्या प्रेम धवनच्या लेखणीचा वेगळा आविष्कार!

प्रेम धवन यांनी शहीद (१९६५), पवित्र पापी, वीर अभिमन्यू, वीर अमरसिंह राठौड (१९७०), फर्ज और खून (१९७८) याशिवाय अनेक पंजाबी चित्रपटांना संगीत दिले होते. त्यांनी पंडित रविशंकर यांच्याकडून संगीताचे ज्ञान घेतले होते, तर उदयशंकर यांच्याकडून नृत्याचे शिक्षण घेतले होते. प्रेम धवन यांनी ‘दो बीघा जमीन,’ ‘नया दौर’ आणि ‘गूँज उठी शहनाई’ या चित्रपटांकरिता नृत्यदिग्दर्शक म्हणून काम केले होते.

भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरविले होते.तेरी दुनिया से हो के मजबूर चला या आपणच ‘पवित्र पापी’ चित्रपटासाठी लिहिलेल्या ओळीच जणू म्हणत सात मे २००१ रोजी हा कलावंत हे जग सोडून गेला. त्यांच्या नुकत्याच होऊन गेलेल्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या एका ‘सुनहऱ्या’ गीताचा आस्वाद घेऊ या. चित्रपट – १९५१ सालचा ‘तराना’, संगीतकार अनिल विश्वास, गायक तलत मेहमूद व लता मंगेशकर. दिलीपकुमार व मधुबाला नायक-नायिका!

ये आज तेरी दुनिया से हमें तकदीर कहाँ ले आयी है

(मी बघितलेली प्रीतीची) सुंदर स्वप्ने (माझ्या या) अंत:करणातच पेटलेली आहेत (जळून जात आहेत) (स्वप्न असफल झाल्याने माझ्या या) लोचनांमध्ये उदासवाणेपणा भरून राहिला आहे. (आणि) माझे हे (फुटके) नशीब तुझ्या प्राप्तीच्या जगापासून मला आज कोठे घेऊन आले आहे?

नायकाचे हे दु:ख, तर तिकडे नायिका म्हणते - 

कुछ आँख में आँसू बाकी है, जो मेरे गम के साथी है 
अब दिल है न दिल के अरमाँ है, बस मैं हूँ मेरी तनहाई है 

(प्रीतीतील या असफलतेमुळे अश्रू ढाळून झाल्यावर माझ्या या) नेत्रांमध्ये काही अश्रू शिल्लक आहेत, की जे आता माझ्या दु:खाच्या दिवसांत माझे साथीदार आहेत. (प्रीतीने न्हाऊन निघालेले माझे ते) हृदय आता राहिलेले नाही आणि त्याने बघितलेली ती स्वप्नेही आता राहिलेली नाहीत (ती स्वप्ने विरून गेलेली आहेत आणि आता) मी फक्त एकटी राहिले आहे. माझा एकांत, माझं एकाकीपण माझ्या संगतीला घेऊन! 

नायक असेही प्रेयसीला सांगू इच्छितो, की - 

ना तुझसे गिला कोई हमको, ना कोई शिकायत दुनिया से 
दो-चार कदम जब मंझील थी, किस्मत ने ठोकर खाई है 

(माझ्या या असफल प्रीतीबद्दल, हे प्रिये) तुझ्याविरुद्ध माझी काही तक्रार नाही आणि या जगाबद्दलही काही तक्रार नाही. (तक्रार करून काय उपयोग?) (माझे केवढे दुर्दैव बघा, की मला अपेक्षित असणारं माझं प्रीतीचं) ध्येय, ईप्सित दोन-चार पावलांवर उरले असताना (माझ्या) नशिबाला अशी ठेच लागली, की बस! (प्रीतीचे ते ध्येय कुठल्याकुठे राहिले व मी कोठे राहिलो.)

शेवटच्या कडव्यात प्रेयसी सांगते, की 

इक ऐसी आग लगी मन में जीने भी न दे मरने भी न दे 
चूप हो तो कलेजा जलता है, बोलू तो तेरी रुसवाई है 

(या प्रितीच्या अपयशामुळे माझे हे) मन एका अशा आगीत जळत आहे, (की जी आग मला) धड जगूही देणार नाही आणि धडपणे मरूही देणार नाही. (हे दुःख) मनातल्या मनात ठेवल्यामुळे माझे मन त्या दुःखामुळे अक्षरशः जळत आहे. (आणि म्हणून हे दुःख मी) बोलून व्यक्त करायचे ठरवले, तर (मला अशी भीती वाटते, की त्यामुळे) तुझी बदनामी होईल (म्हणून मी गप्प आहे.)

या गीताच्या सुरुवातीला व्हायोलिनचा उदास, हळवा स्वरमेळ मनाला गुंतवून ठेवतो व नंतर तलतचा मखमली स्वर कातर स्वरात हे दु:ख अंत:करणात घुसवतो. जोडीला नंतर स्वरसम्राज्ञी शब्दाच्या अर्थांना साजेसा न्याय आपल्या स्वराने देतात. ट्रॅजेडी किंग व दु:खी मधुबाला! सर्व काही दुःखांचा आविष्कार व्यक्त करणारे, तरीही सुनहरे! आणि त्यातील शब्दरचना. ती पाहता मनाला असा प्रश्न पडतो, की चित्रपटसृष्टीतील गीतकार म्हटल्यानंतर प्रेम धवन यांचे नाव सहजासहजी ओठावर येत नाही. तरीही या कवीच्या रचना किती आशयसंपन्न आहेत. ‘तराना’ चित्रपटातील त्यांचे हे एकच गीत नव्हे, तर अशी अनेक गीते आहेत. आँखो आँखों में उनसे प्यार हो गया’ (अदा - १९५१), ‘तराना’मधीलच नैन मिल नैन हुए बावरे हे गीत,  १९५५च्या ‘नकाब’मधील तेरा खयाल दिल को सताए तो क्या करे हे गीत आणि प्रेमिकांची लाडिक तक्रार करणारे १९५५च्याच ‘तांगेवाली’मधील हलके हलके चलो सावरे हे द्वंद्वगीत! प्रेमाची अशी असंख्य गीते... ‘दस लाख’मधीलगरिबों की सुनो ....’ हे भिकाऱ्याच्या तोंडी असणारे गीत व अजब तेरी कारीगरी रे कर्तार ....’ हे भक्तिगीत! ‘एक फूल दो माली’मधील एक पिता आपल्या मुलाबद्दलच्या भावना व्यक्त करतो, ते ‘तुझे सूरज कहूँ, या चंदा ....’ हे गीत! १९६०च्या ‘अपना घर’ चित्रपटातील ‘भारत के नौजवानों .....’ हे संदेशपर गीत... 

विविध भावभावनांची गीते प्रेम धवन यांनी लिहिली; पण त्यांचे नाव चित्रपटप्रेमींच्या ओठावर पटकन येत नाही! असते एकेकाचे नशीब! आणि हे बघूनच ‘त्या’ उपरवाल्याजवळ प्रेम धवनच्याच शब्दांत सांगावेसे वाटते - 

समज न आए माया तेरी, तेरे रंग हजार 
अजब तेरी कारीगरी रे कर्तार...

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
जनार्दन अनपट , सातारा रोड (सातारा) महाराष्ट्र फार About 236 Days ago
फारच छान,
0
0

Select Language
Share Link